PM Modi  Sarkarnama
मराठवाडा

PM Modi on Marathwada : 'मराठवाड्याला दुष्काळमुक्त करणारे सरकार हवे, की पाण्याच्या थेंबाला तरसवणारे काँग्रेस आघाडीचे?' ; मोदींचा सवाल!

PM Modi Rally in Chhatrapati Sambhajinagar News : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा छत्रपती संभाजीनगरमधील प्रचारसभेत जाहीर सवाल; जाणून घ्या,आणखी काय म्हणाले?

Jagdish Pansare

अVidhan Sabha Election 2024 : भविष्यात महाराष्ट्राला विकसित भारताचे नेतृत्व करायचे आहे, त्यासाठी राज्यात विकासाचे अनेक प्रकल्प वेगाने सुरू आहेत. नवे उद्योग येत आहेत, रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होत आहेत. शेतकऱ्यांच्या समस्यांवर ठोस उपाययोजना आखल्या जात आहेत, पायाभूत सुविधांच्या विकासाचा वेग वाढला आहे, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती संभाजीनगर येथील प्रचारसभेत केला.

मराठवाड्याला पाणी देऊन दुष्काळमुक्त करणारे महायुतीचे सरकार पाहिजे? की पाण्याच्या एक एक थेंबाला तरसवणारे काँग्रेस आघाडीचे? असा सवालही मोदी यांनी यावेळी केला. जिल्ह्यातील महायुतीच्या उमदेवारांच्या प्रचारार्थ मोंदीची आज(गुरुवार) शहरात सभा झाली. या सभेतून मोदींनी महाविकास आघाडी व काँग्रेस(Congress) पक्षावर टीका केली. तसेच, महाविकास आघाडीने सत्तेवर असताना प्रगतीची गती रोखून धरली. विकासाच्या विरोधात असलेली काँग्रेस आणि त्यांचे साथीदार महाराष्ट्राचे कधीच हित करणार नाहीत, म्हणून या निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवा आणि महायुतीला विजयी करा, असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde), रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, खा. डॉ. भागवत कराड, संदिपान भुमरे, महायुतीचे उमेदवार अतुल सावे, अब्दुल सत्तार, संजय शिरसाट, प्रशांत बंब, संतोष दानवे, प्रदिप जैस्वाल, अनुराधा चव्हाण यांची यावेळी उपस्थिती होती.

यावेळी मोदी(PM Modi) म्हणाले, औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामांतर करण्यास याच काँग्रेसने व त्यांच्या आघाडीने विरोध केला होता. संभाजी महाराजांच्या नावालाच ज्यांचा विरोध आहे, आणि संभाजी महाराजांची हत्या करणाऱ्यांना जे देवदूत मानतात, ते लोक महाराष्ट्राचे आणि मराठी स्वाभिमानाचे शत्रू आहेत. अशा लोकांना महाराष्ट्र कधीच स्वीकारणार नाही. भविष्यात भारत विकसित व्हावा हा भाजप आणि महायुतीचा संकल्प आहे आणि त्यासाठी आम्ही समर्पित भावनेने काम करत आहोत. यासाठीच राज्यात आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत.

तसेच समृद्धी महामार्गामुळे मराठवाडा मुंबईला जोडला गेला, मराठवाड्यात महामार्गांची कामे वेगाने सुरू आहेत. रेल्वेसेवेचा अत्याधुनिक विकास व विस्तार केला जात आहे. महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर देशातील एकूण विदेशी गुंतवणुकीतील सर्वाधिक गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे. 70 हजार कोटींहून अधिक गुंतवणुकीचे करार झाले आहेत, 45 हजार कोटींचे उद्योग आले, असल्याचे मोदी म्हणाले. भविष्यात अनेक मोठे उद्योग महाराष्ट्रात येणार असून त्यासाठी राज्यात सर्वात मोठे इंडस्ट्रियल पार्क उभे राहणार आहे. यातून रोजगाराच्या संधी वाढतील, असेही मोदी म्हणाले.

मराठी भाषेला अभिजात दर्जा भाजपने दिला -

पंतप्रधान मोदी म्हणाले 'राज्यात विकासाच्या या महायज्ञासोबत विठ्ठल दर्शनाच्या सुविधेसाठी पालखी मार्ग बांधला जात आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही मराठीजनांची कित्येक दशकांपासूनची मागणी आम्ही पूर्ण केली. मराठवाड्यात दीर्घकाळ पाण्याचे दुर्भिक्ष असतानाही काँग्रेसवाले हातावर हात ठेवून बसले होते. आमच्या सरकारने प्रथम दुष्काळमुक्तीचे ठोस कार्यक्रम सुरू केले. देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री असताना जलयुक्त शिवार योजना सुरू केली होती. यातून मराठवाड्याचे जलसंकट दूर होणार होते, पण मध्यंतरीच्या आघाडी सरकारने ती योजनाच बंद केली. महायुती सरकारने आता ते काम पुन्हा सुरू केले आहे. संभाजीनगरमध्ये पाणीपुरवठ्यासाठी महायुती सरकारने 1600 कोटींहून अधिक रक्कम दिली, पण आघाडीवाल्यांनी त्यालाही ब्रेक लावला.'

याशिवाय,'आता केंद्र सरकार आणखी 700 कोटी रुपये देणार आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. मराठवाड्याला पाणी देऊन दुष्काळमुक्ती देणारे सरकार हवे की योजना रोखणारे सरकार, याचा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे, अन्यथा थेंब थेंब पाण्यासाठी आघाडीवाले जनतेला वणवण करायला लावतील, अशी टीकाही मोदींनी केली. भाजपा(BJP) - महायुती आहे तर गती आहे, महाराष्ट्राची प्रगती आहे, अशी ग्वाही पंतप्रधानांनी यावेळी दिली. महायुतीसाठी शेतकरी हा अन्नदाता आहे. तो विकसित भारताचा आधारस्तंभ आहे. कापूस उत्पादकांचे उत्पन्न वाढविण्यासाठी आमचे सरकार अनेक उपाययोजना करत आहे असे सांगून पंतप्रधानांनी विविध योजनांची विस्ताराने माहिती दिली.

याचबरोबर 'कापूस उत्पादकांना साह्यभूत ठरेल असे टेक्स्टाईल पार्क महाराष्ट्रात होईल असे त्यांनी सांगितले. 2 कोटी 20 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 35 कोटींहून अधिक रक्कम जमा झाली आहे. महायुती सरकारच्या नमो शेतकरी योजनेमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले आहे. सोयाबीन शेतकऱ्यांकरिता किमान आधारभूत किंमत क्विंटलमागे सहा हजार करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फायदा येथील शेतकऱ्यांना मिळेल. येत्या काळात शेतकऱ्यांना विजेची चिंता असू नये यासाठी प्रत्येक शेतात सौर ऊर्जेद्वारे वीजपुरवठा करून प्रत्येक पंप सौर उर्जेवर चालविला जाईल. किसान क्रेडिट कार्डची सुविधाही मिळणार आहे. काँग्रेसवाल्यांचा मात्र, विकासावर नव्हे, तर भेद निर्माण करण्यावर विश्वास आहे. काँग्रेसने नेहमीच आरक्षणाच्या विरोधातच भूमिका घेतली, असा आरोपही मोदी यांनी केला. त्यांची पूर्वीपासून हीच भूमिका आहे, आणि त्यांचा खरा चेहरा जुन्या वर्तमानपत्रांतून पाहता येईल.', असे मोदी म्हणाले.

काँग्रेसची मानसिकता आजही आरक्षणविरोधीच.. -

याशिवाय काँग्रेसवर निशाणा साधताना मोदी म्हणाले, 'पूर्वी खुलेआम जाहिराती देऊन काँग्रेस आरक्षणाला देशविरोधी म्हणत होती. तीच काँग्रेसी मानसिकता आणि अजेंडा अजूनही कायम आहे, म्हणूनच गेल्या दहा वर्षांत ओबीसी समाजाचा पंतप्रधान त्यांना सहन होत नाही. त्यामुळे काँग्रेसचे शहजादे विदेशात जाऊन आरक्षण रद्द करण्याची घोषणा करतात. त्यांचा हा अजेंडा राबविण्यासाठी काँग्रेस व आघाडीवाले एससी, एसटी व अन्य लहान समुदायांत आपापसात संघर्ष रुजवत आहेत, असा आरोपही मोदी यांनी केला. काँग्रेस व त्यांच्या साथीदारांनी जम्मू काश्मीरात 370 कलम पुन्हा लागू करण्याचा प्रस्ताव आणला आहे.'

तसेच 'आम्ही हे कलम रद्द करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांनी संसदेतही विरोध केला, विरोधासाठी ते न्यायालयातही गेले. आता ते काश्मीरसाठी स्वतंत्र संविधान लागू करण्याकरिता प्रयत्न करत आहेत. बाबासाहेबांचे संविधान काश्मीरमधून हद्दपार करण्याचा काँग्रेसचा इरादा आहे, असा आरोप करून पाकिस्तानची भाषा बोलणारी काँग्रेस व त्यांच्या साथीदारांना या निवडणुकीत धडा शिकवा, असे आवाहन मोदी यांनी केले.

यावेळी 'एक है तो सेफ है, असा नारा मोदींनी दिला. ओबीसी समाज जातीजातीमध्ये विभागला जाईल तेव्हा त्यांची ताकद कमी होईल व त्याचा फायदा लाटता येईल, अशी काँग्रेसची भावना आहे. त्यासाठीच ते सत्तेवर येण्याचे मनसुबे आखत आहेत. सत्ता मिळताच ते एससी, एसटी ओबीसींचे आरक्षण रद्द करतील. म्हणून, सावध रहा, जागरूक होऊन एकतेचा मंत्र जपायचा आहे. एक है, तो सेफ है, याचा पुनरुच्चार मोदींनी सभेत केला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT