Pune News: निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बॅग तपासण्यात आली. याबाबतचा व्हिडिओ उद्धव ठाकरे यांनी शेअर करत तुम्ही सरकारमधल्या नेत्यांची बॅग चेक करणार का? असं सवाल केला होता.
त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), अजित पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासह अनेक सरकारमधील नेत्यांनी देखील आमच्याही बॅग चेक केल्या असल्याचे सांगत व्हिडिओ शेअर केले. तर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी माझी बॅग निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी चेक केली असल्याचं सांगितलं आहे.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून राज्यातील विविध भागात जाऊन ते भाजपा उमेदवारासाठी प्रचार करत आहेत. त्यांची आज(गुरुवार) पुण्यामध्ये देखील पत्रकार परिषद झाली. यावेळी बोलताना प्रमोद सावंत म्हणाले, महाराष्ट्र हा विकसित महाराष्ट्र करण्यासाठी महायुती सरकार राज्यात पुन्हा आले पाहिजे. सन 2014 मध्ये राज्यातील जनतेने भाजपला बहुमत दिले. 2019 मध्ये देखील जनतेने युतीला साथ दिली . पण उध्दव ठाकरे यांच्या स्वार्थामुळे वेगळी राजकीय परिस्थिती निर्माण झाली.
तसेच 'एकनाथ शिंदे आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत भाजप राज्यात चांगल्या प्रकारे काम करत आहे. मराठी भाषेमध्ये माझे शिक्षण झाले असून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा काँग्रेसकडून कधी दिला गेला नाही. पण भाजपच्या केंद्र सरकारने आता तो दर्जा दिला आहे. ही महाराष्ट्रासाठी गौरवाची बाब आहे.' असं त्यांनी म्हटलं.
याशिवाय, 'काँगेस (Congress) नेते राहुल गांधी कोणतेही बिनबुडाचे आरोप सातत्याने आदिवासी समाजाबद्दल करत असतात. आदिवासी यांचा सन्मान करण्याचे काम भाजपने प्रथम केले. काँग्रेसला 60 वर्षांत बिरसा मुंडा कधी आठवले नाही, पण भाजपने त्यांची राष्ट्रीय स्तरावर जयंती सुरू केली. समान नागरी कायदा हा सन 1964पासून गोवा राज्यात राबवला जात आहे आणि सर्व समाज योग्यप्रकारे राहत आहेत. मालमत्ता ही लग्नानंतर पुरुष आणि महिला यांच्यात समान वाटप होते.
याशिवाय राजकीय नेत्यांच्या निवडणूक आयोगाकडून होत असलेल्या बॅग तपासणीबाबत विचारला असता सावंत म्हणाले, 'माझी बॅग कराड आणि त्यानंतर कोल्हापूर एअरपोर्टवर उतरल्यानंतर चेक करण्यात आली. मी बॅगमधून पैसे घेऊन येत असेल असं कदाचित त्यांना वाटलं असेल. मी मुख्यमंत्री असल्याने मला पैसे कशाला हवेत, 10 ते 12 हजार रुपये घेऊन मी फिरत असतो.' असं सावंत म्हणाले.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.