Narendra Patil Warns Resignation sarkarnama
मराठवाडा

Narendra Patil : '...तर अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनाम देईल', नरेंद्र पाटलांचा निर्वाणीचा इशारा, नेमकं कारण काय?

Narendra Patil Warns Resignation : कर्ज मिळवण्यात मोठ्या अडचणी निर्माण होऊन मराठा समाजात सरकार विरोधातला रोष वाढतो आहे, असे नरेंद्र पाटील म्हणाले.

Jagdish Pansare

Annasaheb Patil Mahamandl : राज्यात मराठा आरक्षण, कुणबी प्रमाणपत्रांची वैधता यावरून राजकीय वातावरण पेटलेले असतानाच आता अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी नाराजी व्यक्त करत थेट अध्यक्ष पद सोडण्याचा इशारा दिला आहे.

महामंडाळाचे व्यवस्थापकीय संचालक यांच्या मनमानी कारभारामुळे मराठा तरुणांना कर्जपुरवठा करता येत नाही, एकतर त्यांना हटवा किंवा त्यांची बदली करा, नाहीतर मीच अध्यक्ष पद सोडतो, अशी निर्वाणीची भाषा पाटील यांनी केली.

छत्रपती संभाजीनगर येथे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी येणाऱ्या मंत्रीमंडळ बैठकीत आपण हा विषय मुख्यमंत्र्‍यांच्या कानावर घालणार आहोत. एमडी विजयसिंह देशमुख यांना बदलले जाणार नसेल तर हे शोभेचे पद आपल्याला नको, अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांनी कर्ज मंजूर करताना नाहक जाचक अटी टाकल्या आहेत. त्यामुळे कर्ज मिळवण्यात मोठ्या अडचणी निर्माण होऊन मराठा समाजात सरकार विरोधातला रोष वाढतो आहे. आपण ही बाब मुख्यमंत्र्यांच्याही कानावर टाकली होती, मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही.

हे असेच सुरू राहिल्यास हे पद आपल्याला सोडावे लागेल, असा इशारा नरेंद्र पाटील यांनी यावेळी दिला. गेल्या काही वर्षापासून लाभार्थ्यांना कर्ज मंजूर करण्यासाठी आवश्यक असणारे संमती पत्र दिले जात नाहीत. व्याज परताव्याची रक्कम वेळेत मिळत नाही. मिळालेल्या कर्जाच्या तुलनेत 1500 कोटी रुपये मिळणे आवश्यक होते पण केवळ 152 कोटी रुपये आतापर्यंत मिळाले आहेत.

व्यवस्थापकीय संचालकांचा मनमानी कारभार याला कारणीभूत असल्याचा आरोप पाटील यांनी केला. त्यांच्यावर कारवाई करावी किंवा त्यांची बदली व्हावी यासाठी आपण पत्रव्यवहार केला होता. मात्र यावर काहीच होताना दिसत नाहीये. आता यावरून मराठा समन्वयक आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचे नरेंद्र पाटील म्हणाले.

सरकारची प्रतिमा कोण खराब करतंय?

सरकारची प्रतिमा खराब व्हावी यासाठी व्यवस्थापकीय संचालकांना कोणी सांगत आहे का? असा मला संशय आहे. ती व्यक्ती नेमकी कोण? याचा सरकारने शोध घ्यावा, असे आवाहनही पाटील यांनी केले. लाभार्थ्यांमध्ये योजना मिळत नसल्याचा राग आहे. बेरोजगार तरुणांना चार चाकी वाहने घेऊन त्याचा व्यवसाय करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जात होते. आता वाहने खूप अधिक झाले आहेत म्हणून हे कर्ज देणे बंद करण्यात आले आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.

व्यवस्थापकीय संचालकांचा हस्तक्षेप

व्यवसाय कोणता निवडावा हेही व्यवस्थापकीय संचालक ठरवू लागले आहेत. मंगळवारी मराठा समाजाच्या विविध मागण्यांच्या अनुषंगाने उपसमितीची बैठक तसेच मंत्रिमंडळ बैठक होणार आहे. या बैठकीत हे दोन्ही प्रश्न पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घालू, असे नरेंद्र पाटील यांनी सांगीतले.

आतापर्यंत मराठवाड्यात अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत 4996 कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. व्याजाचा परतावा सुरू असणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या 47 हजार 289 एवढी आहे. आतापर्यंत 452 कोटी रुपयांचा व्याज परतावा देण्यात आल्याची माहिती नरेंद्र पाटील यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT