Beed Politics : बीडमध्ये माजी आमदार बाळासाहेब आजबे आणि भीमराव धोंडे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या जलहक्क जन आक्रोश मोर्चातून वेगळ्याच राजकारणाला सुरुवात झाली आहे. माजी आमदार बाळासाहेब आजबे यांनी या मोर्चात केलेल्या भाषणातून भाजपचे आष्टी- पाटोद्याचे विद्यमान आमदार सुरेश धस यांच्या पत्नी प्राजक्ता धस यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करत वादातील जमिनी खरेदीचा आरोप केला होता.
साहेब मॅडमला जरा आवरा, अशा भाषेत आजबे यांनी काही गावातील विवादित जमिनींच्या खरेदीचा त्यांच्याकडून सपाटा सुरू आहे असा आरोप आजबे यांनी केला होता. त्याला प्राजक्ता धस यांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिले. तसेच अब्रू नुकसानीचा दावा ठोकण्याचा इशाराही दिला. यानंतर हे प्रकरण शांत होण्याऐवजी अधिकच चिघळले.
बाळासाहेब आजबे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यात सुरुवात तुम्ही केली, आता शेवट मी करणार असे म्हणत दंड थोपटले. आता यावर पुन्हा प्राजक्ता धस यांनी आजबे यांच्या अब्रूनुकसानीच्या दाव्याचे स्वागतच आहे असे म्हणत त्यांना डिवचले आहे. खोटं बोल पण रेटून बोल हेच
आष्टी-पाटोदा मतदारसंघातील राजकीय वातावरण देवस्थानच्या जमिनी आणि परस्पर आरोपांमुळे चांगलेच तापले आहे. माजी आमदार बाळासाहेब आजबे यांनी आमदार सुरेश धस यांच्या कुटुंबावर देवस्थानच्या जमिनी बळकावल्याचा गंभीर आरोप करत अब्रू नुकसानीचा दावा ठोकण्याचा इशारा दिला होता. यावर आमदार सुरेश धस यांच्या पत्नी प्राजक्ता धस यांनी आष्टी येथे पत्रकार परिषद घेऊन आजबेंच्या आरोपांना उत्तर दिले.
तत्पूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बाळासाहेब आजबे यांनी बीडच्या जन आक्रोशमोर्चात आपण कोणाचे नाव घेतले नव्हते. साहेब जरा मॅडमला आवरा, असे फक्त आपण म्हणालो होतो. प्राजक्ता धस यांनी ते अंगावर ओढून का घेतल? असा सवाल केला. श्रीराम ट्रस्ट दादेगाव यांची शिराळ येथील ७०० एकर जमिनीपैकी ३५० एकर जमीन आजबे कुटुंबाने बळकावल्याचा खोटा आरोप आमदार धस माझ्यावर करत आहेत. प्रत्यक्षात आमच्याकडे फक्त ३ हेक्टर जमीन असून १७०५ पासूनचे पुरावे आणि शेतसारा भरल्याच्या पावत्या उपलब्ध आहेत.
याउलट पिंपळेश्वर, विठोबा आणि मायंबा देवस्थानच्या वर्ग-२ च्या शेकडो एकर जमिनी अधिकाऱ्यांवर दबाव आणून प्राजक्ता धस यांनी स्वतःच्या नावे केल्याचा आरोप आजबेंनी केला. पिंपळेश्वरच्या जमिनीवर अनिषा ग्लोबल शाळा कशी उभारली, असा सवाल करत आजबेंनी अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला.
आजबेंच्या या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी लगोलग प्राजक्ता धस यांनीही पत्रकार परिषद घेतली. देताना आजबेंनी पत्रकार परिषदेत दाखवलेले कागदपत्रे पूर्णपणे चुकीचे आणि दिशाभूल करणारे आहेत. आष्टीतील सर्वे नंबर १७६ आणि १७७ या जमिनी पूर्वीपासूनच वर्ग-१ मधील असून रीतसर खरेदी केलेल्या आहेत.
तसेच राघापूर येथील जमिनीबाबत कुळांकडे नियम ३२ ‘ग’चे प्रमाणपत्र नसल्याने ती जमीन मालकांकडून नियमानुसार खरेदी केली आहे. पिंपळेश्वर देवस्थानबाबत उत्तर देताना त्या म्हणाल्या, अनिषा ग्लोबल शाळा ही पिंपळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या मालकीची आहे, आमच्या कुटुंबाची नाही. अज्ञानापोटी आरोप करण्यापूर्वी आजबेंनी माहिती घ्यावी.
दादेगावच्या रामदास स्वामीकालीन प्रभू रामचंद्र देवस्थानच्या शेकडो एकर जमिनीवर आजबे व शिराळचे शेतकरी बेकायदेशीर कब्जा करून बसले आहेत आणि चुकीच्या मार्गदर्शनामुळे देवस्थानला एक रुपयाही देणगी देत नाहीत. तुम्ही बाजारातून आला नाहीत, तर अदृश्य हातांमुळे आमदार झाला होतात.
पण पाच वर्षांत काहीच काम न केल्याने १ लाख मते गायब झाली, असा टोलाही त्यांनी लगावला. माझ्यावर बदनामीचा आणि अब्रू नुकसानीचा दावा करणाऱ्या आजबेंच्या त्या दाव्याचे मी मनापासून स्वागतच करेन, असेही त्या म्हणाल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.