

Gokul Election News: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याआधीच कोल्हापूरच्या राजकारणात ‘मल्टीस्टेट’चा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आणि माजी दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी गोकुळ दूध संघाला मल्टीस्टेट करण्यासाठी आपल्याला 200 कोटी रुपयांची ऑफर होती, असा आरोप करत खळबळ उडवून दिली. 2014 ते 2019 या काळात राज्याच्या दुग्धविकास आणि पशुसंवर्धन खात्याची जबाबदारी आपल्याकडे असताना आपल्यावर दबाव आणला जात होता, असाही आरोप त्यांनी केला.
त्यांच्या या दाव्यानंतर काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली, तर मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्याला प्रत्युत्तर देत हा मुद्दा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा उपस्थित करण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मात्र, जानकरांच्या आरोपामुळे आता केवळ 200 कोटींच्या ऑफरचा प्रश्न उपस्थित झालेला नाही, तर गोकुळच्या मल्टीस्टेटच्या जुन्या राजकारणातील तत्कालीन सत्ताधारी आणि आजच्या राजकीय समीकरणांवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.
जानकरांच्या या वक्तव्यावर आमदार सतेज पाटील यांनी त्यांना पाठिंबा देणारी भूमिका घेतली. तत्कालीन दुग्धविकास मंत्रीच असा दावा करत असतील तर त्याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे, असे पाटील यांनी म्हटले. “गोकुळ मल्टीस्टेट झाला नाही, म्हणून आज गोकुळची निवडणूक लागली आहे. गोकुळ मल्टीस्टेट झाला असता तर गोकुळची निवडणूक कधी झाली असती, हे दूध उत्पादकांनाही कळले नसते. आम्ही त्याविरोधात लढा दिला,” अशी भूमिका सतेज पाटील यांनी मांडली. त्यांनी पुढे गोकुळच्या कारभारात सरकारचा हस्तक्षेप असल्याचा आरोपही केला. तत्कालीन दुग्धविकास मंत्री असा दावा करत असतील तर त्याची चौकशी आणि सत्य समोर येणे आवश्यक असल्याचे पाटील यांनी म्हटले.
जानकरांच्या दाव्यानंतर मात्र गोकुळच्या मल्टीस्टेटचा मुद्दा नव्याने चर्चेत आला असला, तरी हा विषय अचानक समोर आलेला नाही. 2014 ते 2019 या काळात जानकर दुग्धविकास आणि पशुसंवर्धन मंत्री होते. त्याच काळात गोकुळमध्ये महादेवराव महाडिक आणि दिवंगत काँग्रेस नेते पी. एन. पाटील यांच्या गटाचे वर्चस्व होते. या काळातील अनेक संचालक नंतरच्या राजकीय समीकरणांमध्येही महत्त्वाची भूमिका बजावत राहिले.
सत्तांतरानंतर हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांच्या गटातील संचालक गोकुळच्या सत्तेत आले. विशेष म्हणजे, 2021 मध्ये कोरोना काळात झालेल्या गोकुळच्या निवडणुकीत मल्टीस्टेटचा मुद्दा हा प्रमुख प्रचाराचा विषय होता. मुश्रीफ आणि सतेज पाटील यांनी एकत्र येत गोकुळमध्ये सत्तांतर घडवून आणले. त्यामुळे आज जानकरांनी केलेल्या आरोपानंतर त्या काळातील राजकीय भूमिका आणि तत्कालीन संचालकांची भूमिका यावरही चर्चा सुरू झाली आहे.
याच पार्श्वभूमीवर आता काही प्रश्न उपस्थित होत आहेत. 2014 ते 2019 या काळात गोकुळमधील काही संचालक मल्टीस्टेट करण्यासाठी तत्कालीन दुग्धविकास मंत्री असलेल्या जानकरांकडे गेले होते का? गेले असतील तर ते संचालक कोण होते? त्यावेळी मल्टीस्टेटच्या बाजूने असलेले हेच संचालक नंतरच्या काळात सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्या राजकीय गटासोबत कसे आले? या प्रश्नांची उत्तरे जानकरांच्या 200 कोटींच्या आरोपानंतर पुन्हा चर्चेत आली आहेत. त्यामुळे केवळ आरोप करून न थांबता संबंधित संचालकांची नावे आणि त्या काळातील नेमकी राजकीय पार्श्वभूमीही जानकरांनी स्पष्ट करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
गोकुळ मल्टीस्टेट करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करत सतेज पाटील यांनी हा विषय दूध उत्पादकांच्या हिताशी जोडला. गोकुळ मल्टीस्टेट झाला असता तर दूध उत्पादकांच्या हातातील संघावरील नियंत्रणाचा प्रश्न निर्माण झाला असता, असा त्यांचा दावा आहे. त्यामुळे आपण त्याविरोधात लढा दिल्याचे पाटील यांनी सांगितले. तत्कालीन दुग्धविकास मंत्रीच 200 कोटींच्या ऑफरचा दावा करत असतील, तर हा प्रकार गंभीर असल्याचे पाटील यांनी म्हटले. गोकुळ कोणाच्यातरी घशात घालण्याचा प्रयत्न सुरू होता, असा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, मंत्री हसन मुश्रीफ यांनी जानकरांच्या वक्तव्यावर आश्चर्य व्यक्त केले. इतक्या वर्षांनंतर जानकरांनी हा दावा का केला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “इतक्या दिवसानंतर ते असं वक्तव्य कशासाठी करत आहेत? आधीच त्यांनी वक्तव्य करायला हवं होतं. आता वक्तव्य केलंच असेल तर त्याची स्पष्टता त्यांनीच द्यायला हवी,” अशी भूमिका मुश्रीफ यांनी मांडली. निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा हा मुद्दा उपस्थित करून वातावरण तापवण्याचा प्रयत्न आहे का, असाही सवाल मुश्रीफ यांनी उपस्थित केला. गोकुळसारख्या मोठ्या दूध संघाला सरकारशी समन्वय ठेवावा लागतो. संघाचा विस्तार आणि विकास करण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी संबंध ठेवावे लागतात. आता पक्षपातळीवर निवडणूक होत असल्याने समन्वयाची भूमिका मुख्यमंत्री घेत असल्याचे स्पष्टीकरणही मुश्रीफ यांनी दिले.
गोकुळच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महादेव जानकरांनी केलेला 200 कोटींच्या ऑफरचा दावा, सतेज पाटील यांनी त्याला दिलेली जोड आणि हसन मुश्रीफ यांनी केलेला प्रतिवाद यामुळे ‘मल्टीस्टेट’चा जुना मुद्दा पुन्हा तापला आहे. एकीकडे तत्कालीन दुग्धविकास मंत्री म्हणून जानकरांचा दावा आहे, तर दुसरीकडे त्याच काळातील गोकुळच्या संचालकांच्या भूमिका आणि नंतर बदललेली राजकीय समीकरणेही चर्चेत आली आहेत.
त्यामुळे आता प्रश्न फक्त ‘200 कोटींची ऑफर कुणी दिली?’ एवढाच राहिलेला नाही; ‘मल्टीस्टेटचा घाट नेमका कुणाचा होता आणि त्या काळात त्यासाठी कोण कोण प्रयत्नशील होते?’ याची उत्तरेही गोकुळच्या निवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापुरात शोधली जात आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.