Nanded NCP Political News Sarkarnama
मराठवाडा

NCP News : राष्ट्रवादीचे प्रवेश सोहळे जोरात; पण खतगावकर, हंबर्डे, पोकर्णा, घाटे यांचा कस लागणार!

As NCP hosts joining events in Nanded, former MLAs are expected to demonstrate their political influence in the upcoming local self-government elections. : महाविकास आघाडीची जिल्ह्यात नाजुक परिस्थिती झाली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या माजी आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पर्याय स्वीकारला.

Jagdish Pansare

लक्ष्मीकांत मुळे

Nanded Political News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात एकापाठोपाठ होत असलेल्या प्रवेश सोहळ्याने नांदेड जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. अशोक चव्हाण विरुद्ध प्रताप पाटील चिखलीकर या महायुतीतील भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दोन दिग्गज नेत्यांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू झाली आहे. काँग्रेसच्या चार माजी आमदारांना पक्षात प्रवेश देत राष्ट्रवादीने बाजी मारली असली तरी या नेत्यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आपला प्रभाव दाखवावा लागणार आहे.

राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या या माजी आमदारांचे आपापल्या मतदारसंघात अजूनही वजन आहे. अशोक चव्हाण यांचे मेहुणे माजी मंत्री भास्कर पाटील खतगावकर, (Bhaskarrao Patil) माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, मोहन हंबर्डे आणि अविनाश घाटे ही जिल्ह्याच्या राजकारणातील मोठी नावं आहेत. आता चार महिन्यांनी होऊ घातलेल्या महापालिका, जिल्हा परिषद, नगरपरिषदांच्या निवडणुकीत या सर्व नेत्यांना आपली ताकद दाखवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यश मिळवून द्यावे लागणार आहे. तरच हा पक्ष नंबर एकचा ठरू शकतो.

विधानसभा निवडणुकीत महायुतीचे सर्व उमेदवार निवडून आल्याने महाविकास आघाडीची जिल्ह्यात नाजुक परिस्थिती झाली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या माजी आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (NCP) पर्याय स्वीकारला आहे. याचा फायदा निश्चितच येणाऱ्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत होईल असे चित्र आहे. नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात विधानसभा निवडणुकीनंतर खूप मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत.

राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर नांदेड जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचा पर्याय निवडला आहे. जिल्ह्याच्या राजकारणात आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर व माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांचे वर्चस्व राहिले आहे. हे वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी दोन्ही नेत्यांमध्ये स्पर्धा लागली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत या दोन्ही नेत्यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे.

नाव मोठं, कामगिरीही तशीच हवी..

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भास्करराव पाटील खतगावकर यांनी त्यांच्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या सोबत माजी आमदार अविनाश घाटे, ओमप्रकाश पोकर्णा, नांदेड शहरातील काही माजी नगरसेवकांनी प्रवेश केला आहे. माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांचे नांदेड शहरातील काही भागात चांगले काम व संपर्क आहे. नांदेड वाघाळा महानगरपालिका निवडणुकीत त्यांना याचा फायदा पक्षाला यश मिळवून देण्यात होणार आहे.

आमदार, खासदार, मंत्री राहिलेल्या भास्करराव पाटील खतगावकर यांना मानणारा एक मोठा वर्ग संपूर्ण जिल्ह्यात आहे. देगलूर, बिलोली, नायगाव, मुखेड, उमरी, धर्माबाद या भागात खतगावकर यांचा मोठा संपर्क व कार्यकर्त्यांचे जाळे आहे. आता त्यांना मुखेडचे माजी आमदार अविनाश घाटे, शेषराव चव्हाण, स्वप्निल चव्हाण यांची ही साथ मिळणार आहे. या तालुक्यात भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार डॉ. तुषार राठोड, बिलोलीचे जितेश आंतापूरकर, नायगावचे राजेश पवार यांच्याशी राष्ट्रवादी काँग्रेसला दोन हात करावे लागणार आहेत.

चिखलीकरांवर भरोसा..

या भागात भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तुल्यबळ लढत होऊ शकते. कंधार- लोहा या विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे कायम वर्चस्व राहिले आहे. ते कोणत्याही पक्षात गेले तरी मतदार आणि कार्यकर्त्यांनी त्यांची साथ कधी सोडली नाही. या भागातुन त्यांचे जिल्हा परिषद सदस्य निवडून आले आहेत. जिल्ह्याचा नेता कोण? हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील जय पराजयातून सिद्ध होणार आहे.

नांदेड वाघाळा महानगरपालिका निवडणुकीत सर्वच पक्षांची कसोटी लागणार आहे. ‌ शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नसले तरी भास्करराव पाटील खतगावकर, ओमप्रकाश पोकर्णा, मोहनआण्णा हंबर्डे यांचे वास्तव्य नांदेड शहरातच आहे. या तिन्ही नेत्यांनी शहराचे नेतृत्व केले असल्याने शहराच्या राजकारणात त्यांची पकड आहे. माजी आमदार मोहन हंबर्डे यांनी काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. या तिन्ही नेत्यांनी काँग्रेसच्या पारंपरिक मतदारांना राष्ट्रवादी काँग्रेससोबत आणले तरच शहरात पक्षाचा जम बसू शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT