Jaisingh Solanke Sarkarnama
मराठवाडा

Prakash Solanke news : मोठी बातमी : राष्ट्रवादीच्या आमदाराची निवृत्तीची घोषणा, पुतण्याला विधानसभेची उमेदवारी केली जाहीर

Jaisingh Solanke, Prakash Solanke retirement, Jaisingh Solanke candidacy : जयसिंह सोळंके हे बीड जिल्हा परिषदेच्या बांधकाम व अर्थ समितीचे सभापती होते. तसेच लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष आहेत.

सरकारनामा ब्यूरो

Majalgaon Assembly constituency : बीड जिल्हा आणि माजलगाव विधानसभा मतदारसंघात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजलगावचे विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यांनी २०२९ मधील निवडणुकीसाठी पुतणे जयसिंह सोळंके यांना आपला राजकीय वारसदार म्हणून पुढे केले आहे. जयसिंह यांना उमेदवारी दिली जाईल, असे त्यांनी भरसभेत जाहीर केले.

माजलगावमध्ये विकासकामाच्या भूमिपूजन तथा शुभारंभप्रसंगी बोलत असताना आमदार सोळंकेंनी उपस्थितांसमोर ही घोषणा केली. आगामी विधानसभा निवडणुकीत मी स्वतः उमेदवार म्हणून तुमच्यासमोर भिडणार नाही, तर माझा पुतण्या जयसिंग सोळंके यांना आमच्या कुटुंबाकडून व पक्षाकडून उमेदवारी दिली जाईल, असे जाहीर करत त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाच्या उत्तरार्धाची दिशा स्पष्ट केली आहे. त्यांच्या या विधानामुळे अवघ्या बीड जिल्ह्यासह राज्यभरात खळबळ उडाली असून, माजलगावच्या राजकारणात आता चर्चांना उधाण आले आहे.

जयसिंह हे बीड जिल्हा परिषदेच्या बांधकाम व अर्थ समितीचे सभापती होते. तसेच लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष आहेत. आता त्यांना पुढील निवडणुकीत उमेदवारी देणार असल्याचे सोळंके यांनी जाहीर केले आहे. त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहनही सोळंके यांनी केले.

वर्षानुवर्षे माजलगावच्या राजकारणावर आणि सहकार क्षेत्रावर आपली मजबूत पकड निर्माण करणारे आमदार प्रकाश सोळंके यांच्या या निर्णयामुळे राजकीय समिकरणात मोठा बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. सोळंके यांनी प्रकृतीचे कारण असो वा नव्या पिढीला संधी देण्याचा मानस, स्वतः बाजूला होत आपल्या कुटुंबातील युवा नेतृत्व म्हणून पुतण्या जयसिंग सोळंके यांच्या हातात माजलगावची धुरा सोपवण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

आगामी काळात माजलगावच्या राजकारणात जयसिंग सोळंके यांच्या नेतृत्त्त्वाखाली एक नवीन राजकीय इनिंग सुरू होणार का, याकडे संपूर्ण बीड जिल्ह्याचे लक्ष लागले असून विरोधकांचेही डोळे या घडामोडींवर असेल. राष्ट्रवादी काँग्रेसचे आक्रमक आणि अनुभवी नेते म्हणून प्रकाश सोळंके यांची ओळख आहे. अशा स्थितीत त्यांनी स्वतः निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

एका बाजूला जुन्या जाणत्या नेत्याने पुतण्यावर विश्वास दाखवत वारसदार घोषित केला असला, तरी आगामी निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीच्या गोटात या निर्णयामुळे काय समीकरणे बदलतात, हे पाहणे रंजक ठरणार आहे. जयसिंग सोळंकेंच्या खांद्यावर आता घराण्याचा आणि पक्षाचा वारसा टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT