Parbhani NCP Politics News Sarkarnama
मराठवाडा

Parbhani NCP Politics News : डीपीडीसीत `दादागिरी`, शिंदे सेनेच्या पदरी पुन्हा उपेक्षाच...

Ajit Pawar News : राज्याच्या सत्तेत उशिरा येऊनही अजित पवारांनी महत्त्वाची खातं मिळवली होती.

Prasad Shivaji Joshi

Marathwada Political News : महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसैनिकांवर अन्याय होत असल्याची तक्रार नेहमीच होत होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार स्थापन झाले. त्यामुळे आतातरी शिवसैनिकांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा असताना पुन्हा अपेक्षाभंग होताना दिसत आहे. (Parbhani NCP Politics) जिल्हा नियोजन समितीच्या अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या जाहीर झाल्या असून, यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) गटाचे वर्चस्व दिसून आले आहे.

एकूण नऊ सदस्यांपैकी चार सदस्य राष्ट्रवादी (NCP) कॉंग्रेसचे, तीन सदस्य भाजपचे आणि आमदार रत्नाकर गुट्टे व शिवसेना शिंदे गटाच्या प्रत्येकी एका सदस्याला स्थान मिळाले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटातून माजी आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे, संतोष देशमुख, शंकर भागवत, पंकज जाधव, भाजपचे अनंता पारवे, रंगनाथ सोळंके, सुरेश भुमरे यांचा समावेश आहे.

तर गुट्टे मित्रमंडळाचे प्रल्हाद मुरकुटे व शिवसेना (Shivsena) शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख व्यंकट शिंदे यांना स्थान देण्यात आले आहे. 2019 च्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मते मिळालेले राजेश विटेकर अजित पवार यांच्यासोबत गेले. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या जागावाटपात परभणी लोकसभा मतदारसंघ मिळावा, यासाठी अजित पवार गटाकडून निरंतर प्रयत्न केले जात आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्याचाच एक भाग म्हणून परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संजय बनसोडे यांची नियुक्ती केली गेली. शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व एकमेव आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी अजित पवार गटात प्रवेश केला. ज्या ठिकाणी पक्षाची ताकद आहे त्या ठिकाणी पक्षाचे उमेदवार उभे करण्याचे सुतोवाच कर्जत येथे झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले होते. या पार्श्वभूमीवर जिल्हा नियोजन समितीमध्ये पक्षाच्या चार सदस्यांना स्थान देऊन पक्षाने कार्यकर्त्यांना बळ दिले आहे.

मात्र एकनाथ शिंदे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी असतानाही शिवसेना शिंदे गटाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. निधी वाटपा मध्येही शिवसेना कार्यकर्त्यांना न्याय मिळत नसल्याची तक्रार परभणी महानगर अध्यक्ष प्रवीण देशमुख यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यानंतर त्या निधीवाटपास स्थगितीसुद्धा देण्यात आली होती. मात्र पुन्हा `येरे माझ्या मागल्या` असा प्रकार सुरू झाला आहे.

राज्याच्या सत्तेत उशीरा येऊनही अजित पवारांनी महत्वाची खाती मिळवली होती. शिंदे गटाच्या मंत्र्यांना त्यासाठी आपली खाती सोडावी लागली होती. यावरून शिंदे गटामध्ये नाराजी असतांना आता तोच प्रकार जिल्हा पातळीवरील अशासकीय नियुकत्यांमध्येही घडतांना दिसतो आहे. जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी नियुक्त्या करताना राष्ट्र्वादी कॉंग्रेस अजित पवार गटाने बाजी मारली असून लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने तयारीचे आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. मात्र यामुळे शिंदे गट नाराज होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT