Rohit Pawar Sarkarnama
मराठवाडा

Rohit Pawar News : रोहित पवारांचे ईडीला आव्हान; चूक केलेली नाही, झुकणारही नाही...

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar : बारामती अॅग्रोच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड येथील साखर कारखान्यावर ईडीने जप्तीची कारवाई केली. त्याच जप्त केलेल्या कारखान्यासमोर आज आमदार रोहित पवार (Rohit Pawar News) यांनी लोकांशी संवाद साधत थेट ईडी कारवाईलाच आव्हान दिले. मी काही चुकीचे केलेले नाही, त्यामुळे कोणासमोर वाकणारही नाही. माझ्या आई-वडिलांची ही शिकवण आहे, असे म्हणत पवार यांनी आपण ईडीच्या कारवाईला तोंड देणार असल्याचे ठणकावून सांगितले.

कन्नड येथील सहकारी साखर कारखाना काही वर्षांपूर्वी बारामती अॅग्रोने (Baramati Agro) चालवायला घेतला आहे. याच कारखान्यावर ईडीने कारवाई करत जप्ती आणली. ऐन लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) तोंडावर ही कारवाई करण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का समजला जात आहे. रोहित पवार यांनी आज कारखाना परिसरात लोकांशी संवाद साधत आपण ईडीसमोर झुकणार नसल्याचे स्पष्ट केले. हीच भूमिका त्यांनी पत्रकारांशी बोलतानाही घेतली.

माझ्या आई-वडिलांनी शिकवलं आहे, की काही चुकीचं केलं नसेल तर कुणासमोर वाकायचं नाही. मग मी यांच्यासमोर का वाकू? ईडीच्या कारवाईने (ED Action) माझी पत्नी घाबरली आहे, तिला वाटतं मला जेलमध्ये टाकतील. मी तिला समजावण्याचा प्रयत्न करतो आहे. एवढ्या मोठ्या नेत्यांविरोधात मी सातत्याने बोलतो, म्हणूनच ही कारवाई करून मला तुरुंगात डांबण्याचा सरकारचा डाव आहे की काय? अशी भीती पत्नीला सातत्याने सतावत असल्याचे पवार म्हणाले.

सत्ताधाऱ्यांसाठी मी अडचणीचा ठरतोय, त्यामुळेच तातडीने कारवाई केली गेली. मी थांबलो नाही, तर मला जेलमध्येही टाकतील, यापेक्षा मोठी आणखी कुठली कारवाई ते करू शकतात? माझं संपुर्ण कुटुंब या कारवाईने तणावात आहे, मी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतोय. मी अजिबात घाबरणार नाही, कारण हा संपूर्ण महाराष्ट्रंच माझं कुटुंब आहे, असंही पवार यांनी स्पष्ट केलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आपल्या विरोधकांना दाबण्यासाठी ईडीचा गैरवापर केला जातोय, अनेकांना तुरुंगात टाकलं जातंय. काहीजण या भीतीपोटी त्यांना शरणही जाताहेत, भूमिका बदलताहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल शरण येत नाहीत म्हटल्यावर त्यांनाही नोटिसा पाठवल्या जात आहेत. माझ्याबाबतीतही हाच प्रयोग आणि ईडीची कारवाई सुरू असल्याचा आरोपही रोहित पवार यांनी केला.

गेल्या काही महिन्यांत माझ्या कारखान्यावर कारवाई केली गेली. कारवाई करणाऱ्यांना असे वाटले घाबरून जाऊ. जे कुणी घाबरणारे होते ते गेले, आम्ही लढणारे आहोत, घाबरणारे नाही, असा इशाराही रोहित पवार यांनी दिला. जिथे काळा पैसा वापरला जातो तिथे तशी नोटीस दिली जाते. पीएमएलए ॲक्टमध्ये हा विषय येत नाही, असे सांगून काढण्यात आलेली प्रेस नोट चुकीची असल्याचा दावाही रोहित पवार यांनी केला. मला रोखण्याचे कितीही प्रयत्न केले तरी मी जिथे जिथे माझी पक्षाला गरज भासेल तिथे प्रचाराला जाणारच, असेही पवार यांनी सांगितले.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT