Parbhani News : काय आदेश द्यावेत, हे राज्याच्या गृहमंत्र्यांना कळायला हवे. माझ्या अंगावर जेसीबीतून फुले टाकली; म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आणि ते जेसीबी ताब्यात घेण्यासाठी स्वतः पोलिस अधीक्षक जाऊन बसले. एवढी नीच वृत्ती आणि मराठ्यांविषयी द्वेष फडणवीस यांच्या मनात नसला पाहिजे, असा घणाघाती आरोप मनोज जरांगे पाटील यांनी परभणी जिल्ह्यातील मानवत येथे केला.
मानवत येथे रविवारी (ता. 10 मार्च) झालेल्या कार्यक्रमात त्यांनी राज्य सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) म्हणाले, ‘मला जेलमध्ये टाकण्याचा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा डाव आहे. त्यासाठीच SIT मार्फत चौकशी लावण्यात आली आहे. मात्र, आता त्यांचा कोणताही डाव यशस्वी होऊ देणार नाही. SIT च्या चौकशीला सामोरे जाण्यास मी तयार आहे.
उपोषणादरम्यान चिडचिड होते. एखादे वक्तव्य झालेही असेल. पण, अंतरवालीतील महिलांचे डोके फोडले गेले, त्यावेळी आई-बहीण दिसली नाही का? राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी SIT नेमून मराठा समाजाचे आमदार विरोधात घातले. परंतु करोडोचा मराठा समाज एकीकडे आहे. फडणवीस यांचा राजकीय सुफडासाफ केल्याशिवाय सोडणार नाही, असा इशाराही जरांगे यांनी दिला.
'मराठ्यांना 75 वर्षांत काहीच दिले नाही'
मराठा समाजातील युवकांनी, नागरिकांनी आता जातीसोबत राहिले पाहिजे. राजकीय नेत्यांच्या मागे उभे राहू नका. राजकीय नेत्यांनी मागील 75 वर्षांत मराठा समाजाला काहीच दिले नाही. आताही ते काहीच देणार नाहीत. त्यांना काही मागूही नका, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले.
राज्य सरकारने विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात दहा टक्के आरक्षण दिले आहे. परंतु राज्यामध्ये होत असलेल्या नोकरभरतीत त्याचा लाभ होणार नसल्याने अशा प्रकारचे आरक्षण मला नको आहे. राज्य मागासवर्ग आयोगाने राज्य सरकारला सादर केलेल्या अहवालानुसार मराठा समाज मागास असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण दिले पाहिजे.
'वेळ पडली तर गुन्हे दाखल होऊ द्या'
दहा टक्के आरक्षण स्वीकारण्यासाठी माझ्यावर दबाव आणला गेला; परंतु हे आरक्षण टिकणारे नसल्यामुळे ते स्वीकारण्यास मी नकार दिला आहे. त्यामुळे माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. पण, त्यासाठी माझी तयारी आहे. मी गुन्हे अंगावर घेतले वेळ पडली तर तुम्हीही घ्या, पण आता मागे हटायचे नाही.
Edited By : Vijay Dudhale
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.