Sandeep Kshirsagar Rajendra Maske.jpg Sarkarnama
मराठवाडा

Beed News: बीडमध्ये आमदार क्षीरसागर-जिल्हाध्यक्ष मस्केंमधील दुरावा पुन्हा चव्हाट्यावर; जुन्या नाराजीचं उट्टं की आगामी ZP समीकरणांची चाहूल?

Sandeep Kshirsagar Vs Rajendra Maske : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने बीडमध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला. आमदार संदीप क्षीरसागर यांच्या नियोजनात झालेल्या या मोर्चापासून पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के मात्र दूर राहिले.

Jagdish Pansare

Beed News: गेल्या दीड-दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षांकडून पाहणी दौरे सुरू आहेत, तर विरोधकांकडून कोरडा दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी मोर्चे आणि आंदोलन केली जात आहेत. मात्र, बीडमध्ये दुष्काळाच्या या संवेदनशील प्रश्नावर निघालेल्या मोर्चातही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील अंतर्गत नाराजी पुन्हा चर्चेत आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने बीडमध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला. आमदार संदीप क्षीरसागर यांच्या नियोजनात झालेल्या या मोर्चापासून पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के मात्र दूर राहिले.

मस्के यांच्या अनुपस्थितीमुळे आमदार संदीप क्षीरसागर आणि जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्यातील दुराव्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही नेत्यांमधील राजकीय अंतर बीडच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहे.

एकाच पक्षात, पण सूर जुळेना?

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर बीड जिल्ह्यातील अनेक नेते आणि आमदार अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत गेले. मात्र, आमदार संदीप क्षीरसागर यांनी शरद पवारांची साथ कायम ठेवली.

२०२४च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनवणे यांनी भाजपच्या पंकजा मुंडे यांचा पराभव केला. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत संदीप क्षीरसागर यांनीही आपला मतदारसंघ राखला.

विधानसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी राजेंद्र मस्के यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. भाजपमध्ये असताना जिल्ह्यात निर्माण केलेला संपर्क आणि राजकीय प्रभाव याच्या जोरावर मस्के यांनी क्षीरसागर यांच्या पाठीशी ताकद उभी केली होती.

मात्र, एकाच पक्षात आल्यानंतरही क्षीरसागर आणि मस्के यांच्यातील राजकीय सूर फारसे जुळले नसल्याचे चित्र अनेकदा दिसून आले. दोन्ही नेते एकमेकांच्या कार्यक्रमांपासून दूर राहिल्याची चर्चा स्थानिक पातळीवर आहे.

मस्केंच्या प्रवेशावेळी क्षीरसागर गैरहजर

राजेंद्र मस्के यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला, त्या सोहळ्याला आमदार संदीप क्षीरसागर उपस्थित नव्हते. मात्र, त्यानंतरही मस्के यांनी कोणताही आकस न ठेवता भव्य मेळावा घेत क्षीरसागर यांना निवडणुकीत पाठिंबा जाहीर केला होता.

आता बीडमध्ये पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोर्चाला मस्के अनुपस्थित राहिल्याने ‘मस्केंनी जुन्या अनुपस्थितीचे उट्टे काढले का?’ अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मात्र, ही केवळ राजकीय चर्चा असून मस्के यांनी आपल्या अनुपस्थितीचे कारणही स्पष्ट केले आहे.

काकाविरोधात पुतण्याला साथ

२०१९च्या विधानसभा निवडणुकीत राजेंद्र मस्के यांनी तत्कालीन आमदार आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या विरोधात काम करत संदीप क्षीरसागर यांना मदत केल्याची चर्चा होती. त्यानंतर मस्के यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

मस्के यांच्या पक्षप्रवेशावेळी संदीप क्षीरसागर गैरहजर राहिले असले तरी मस्के यांनी त्यानंतर मेळावा घेत संदीप क्षीरसागर यांच्या समर्थनाची भूमिका घेतली होती. त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय सहकार्य असूनही त्यांच्यातील दुरावा का कायम आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीडमधील राजकीय समीकरणे बदलत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे क्षीरसागर-मस्के यांच्यातील अंतराला स्थानिक राजकारणाची पार्श्वभूमी आहे का, याकडेही लक्ष लागले आहे.

बीडच्या मोर्चाला गैरहजेरी

राजेंद्र मस्के यांच्या अनुपस्थितीची चर्चा अधिक रंगण्याचे आणखी एक कारण म्हणजे ते काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयावर काढण्यात आलेल्या कोरड्या दुष्काळाच्या मोर्चात सहभागी झाले होते. मग बीडमध्ये, म्हणजेच आपल्या जिल्ह्यात आणि पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चाला ते गैरहजर का राहिले, असा प्रश्न उपस्थित झाला.

दरम्यान, राजेंद्र मस्के यांच्या वतीने त्यांच्या अनुपस्थितीचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे आपण बीड शहराबाहेर होतो. त्यामुळे मोर्चाला उपस्थित राहता आले नाही, असे मस्के यांच्या वतीने सांगण्यात आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT