Devendra Fadnavis, Ajit Pawar, Eknath Shinde Sarkarnama
मराठवाडा

Dharashiv Loksabha Election News: ओमराजेंच्या विरोधात ना शिंदे-ना अजितदादा आता फडणवीसच काढणार 'हा' हुकमी पत्ता बाहेर

Sachin Waghmare

Dharashiv News : धाराशिव मतदारसंघातील उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ असलेल्या निष्ठावंत शिलेदार ओमराजे निंबाळकर यांना लोकसभा निवडणुकीत चितपट करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच नव्हे तर भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हेदेखील कामाला लागले आहेत. ठाकरेंच्या या एकनिष्ठ शिलेदाराचा सहजरित्या पराभव होईल या आशेने त्यांच्या विरोधात भाजपने रान पेटवले आहे. त्यामुळेच आता एक हुकमी पत्ता काढला आहे. त्यांच्या विरोधात भाजपने निवृत्त सनदी अधिकारी प्रवीण परदेशीना रिंगणात उतरविण्याची तयारी केली असल्याचे समजते..

लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आता धाराशिव लोकसभा मतदारसंघ कुठल्याही परिस्थितीत जिंकण्याचा निर्धार भाजपने केला आहे. त्यामुळे या मतदारसंघात येत्या काळात तगडा उमेदवार उतरविण्याची तयारी भाजपने केली आहे. या मतदारसंघात महायुतीमध्ये कोण लढणार यावरून तिढा कायम आहे.

या जागेवर भाजप, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने दावा केला आहे. या जागेवरून महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असतानाच ही जागा भाजपला सुटली तर 'निवडून येण्याची शक्यता’ या एकमेव निकषावर सनदी अधिकाऱ्यांचे नाव चर्चेत आले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय निवृत्त सनदी अधिकारी व महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशचे (मित्रा) सीईओ प्रवीण परदेशी यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. धाराशिव लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा जोरात सुरू आहे.

धाराशिव मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून सातत्याने सर्व्हे केला जात आहेत. या सर्व्हेच्या आधारे या ठिकाणी १९९३ च्या भूकंपावेळी जिल्हाधिकारी म्हणून काम केलेल्या सनदी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांना मैदानात उतरविण्याची तयारी भाजपकडून करण्यात आली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्याकडे महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशचे (मित्रा) सीईओ म्हणून सोलापूर, धाराशिव व लातूर जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली होती. या तीन जिल्ह्यांत विविध सरकारी योजनांच्या माध्यमातून काम करीत होते. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची जिल्ह्याच्या राजकारणावर पकड आहे. त्यामुळे त्यांनी भाजपची (Bjp) उमेदवारी घ्यावी, असे सुचविण्यात आले होते. मात्र, ते लोकसभा लढविण्यास इच्छुक नाहीत, तर नुकतेच काँग्रेसमधून आलेले बसवराज पाटील (Basawraj Patil) यांचेही नाव लिंगायत मतांच्या बेरजेतून घेतले जात आहे. मात्र, केवळ तेवढ्या जातीच्या गणितावर निवडून येणे शक्य होणार नाही. त्यामुळे एवढे उमेदवार असतानाही प्रवीणसिंह परदेशी यांचेही नाव चर्चेत आले आहे.

काही महिन्यांपूर्वी किल्लारीतील भूकंपामध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे नाव आपल्याला माहीत आहे का, त्यांचे काम कसे होते वगैरे असे प्रश्न विचारणारे दूरध्वनी येऊन गेले. तेव्हापासून प्रवीणसिंह परदेशी (Pravinsinh Pardeshi) यांचे नाव चर्चेत आहे.

R

SCROLL FOR NEXT