Shivsena-BJP : अब्दुल सत्तार हा चिल्लर माणूस आहे, ते चिल्लर मोजण्यापुरतेच राहिले आहे, त्यांना कामच तेवढं आहे, त्यासाठी त्याला राहू द्या. राणेंची किंमत बाजारात काय आहे हे अब्दुल सत्तारला कळणार नाही, त्याला दाढी काढावी लागेल, असा पलटवार मंत्री नितेश राणे यांनी शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांच्यावर केला. मराठवाडा पदवीधर मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्याविरोधात उघड भूमिका घेत सत्तार यांनी महाविकास आघाडीच्या डाॅ. प्रतापसिंह पाटील यांना पाठिंबा दिला होता. महायुतीची जागा पडल्यामुळे यावरून शिवसेना-भाजपामध्ये जुंपली आहे.
या पार्श्वभूमीवर अब्दुल सत्तार यांनी माध्यमांशी बोलताना नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यावर राणे चिल्लर असल्याची टीका केली होती. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये नितेश राणे यांनी या टीकेला प्रत्युत्तर देत सत्तार यांच्यावर हल्ला चढवला आहे. अब्दुल सत्तार यांनी महायुतीच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेची दखल आमचे वरिष्ठ मंडळी प्रदेशाध्यक्ष, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे आपापल्या पद्धतीने घेणार आहेत.
सत्तार यांना त्याची काय शिक्षा द्यायची आहे, बक्षिस द्यायचे आहे की शाबसकी ती दिली जाणार आहे. राणेंची किमंत बाजारात काय आहे? हे सत्तार यांना कळणार नाही, त्यासाठी त्यांना दाढी काढावी लागेल, असा टोलाही राणे यांनी लगावला. राज्यात झालेल्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या पाच जागांचे निकाल नुकतेच लागले. यात महायुतीची पिछेहाट झाली. महाविकास आघाडीने तीन जागा जिंकल्या तर महायुतीला दोन जागांवर समाधान मानावे लागले.
महायुतीतील घटक पक्षांमध्ये समन्वयचा अभाव, अधिकृत उमेदवाराविरुद्ध बंडखोरांना पाठबळ देण्याचे प्रकार झाल्यामुळे विधान परिषदेच्या पाच जागांच्या निवडणुकीत महायुतीला फटका बसला. त्याचे राजकीय पडसाद आता शिवसेना-भाजपमध्ये (BJP) उमटू लागले आहेत. अब्दुल सत्तार यांनी मराठवाड्यात महायुतीच्या सतीश चव्हाण यांच्याविरोधात भूमिका घेत महाविकास आघाडीच्या प्रतापसिंह पाटील यांना पाठिंबा देत त्याचा उघड प्रचार केला. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी संताप व्यक्त केला. भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनीही सत्तार यांचे नाव घेत त्यांच्यावर टीका केली.
सत्तार यांनी त्याला जशासतसे उत्तर देत दोन महिन्यापूर्वी झालेल्या छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपचे सुहास शिरसाट यांना आपणच निवडून आणल्याचा दावा केला. त्यासोबतच त्यांनी आता महाविकास आघाडीचे प्रतापसिंह पाटील यांना निवडून आणण्यात आपला खारीटा वाटा असल्याचे सांगितले. महाराष्ट्रातील महायुतीला ७० टक्के मतदारांनी नाकारले असल्याचे सांगत सत्तार यांनी घरचा आहेर दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.