Dharashiv News : विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहचला आहे. या निवडणुकीसाठी महायुती व महाविकास आघाडीने मोठी ताकद लावली आहे. त्यातच सत्तधारी व विरोधी पक्षाकडून एकमेकांवर केल्या जात असलेल्या आरोप-प्रत्यारोपामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. प्रचारासाठी अवघ्या काही दिवसाचा अवधी शिल्लक असल्यामुळे चुरस वाढली आहे. त्यातच धाराशिव येथील प्रचार सभेत ओबीसी आरक्षणाचे नेते लक्ष्मण हाके यांनी मोठे विधान केले आहे. (Laxman Hake news)
तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार डॉ. स्नेहा सोनकाटे यांच्या प्रचारासाठी बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या सभेप्रसंगी ते बोलत होते. ज्याठिकाणी वंचितचा उमेदवार नसेल तिथे एक वेळेस भाजपला (BJP) मतदान करु. मात्र, शरद पवारांच्या तुतारीला मतदान करणार नाही. लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार (Sharad Pawar) यांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि त्यांचं आंदोलन मोठे केल्याचे मोठे विधान ओबीसी आरक्षणाचे नेते लक्ष्मण हाके यांनी केले.
देवेंद्र फडणवीस फक्त ब्राह्मण आहेत, त्यामुळे त्यांच्या मुख्यमंत्रीपदाला विरोध का, असा सवाल ओबीसी आरक्षण आंदोलक लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केला. देवेंद्र फडणवीस यांच्यातील क्षमता पाहा. त्यांनी मराठा समाजातील तरुणांना रोजगार दिले असतील तर त्यांनी मुख्यमंत्री व्हायला विरोध का? फक्त ब्राह्मण आहेत म्हणून त्यांच्या मुख्यमंत्री पदाला विरोध का ? असा सवाल ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी यावेळी उपस्थित केला.
येत्या काळात महाराष्ट्रात ओबीसीचे 25 आमदार सत्तेत असतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त करीत, ओबीसी समाज यावेळेला महाविकास आघाडीचा करेक्ट कार्यक्रम करणार आहे. लोकसभेला झालेल्या पराभवाचा बदला विधानसभेला घेतलेला दिसेल. यावेळी भलेभले तुतारीचे उमेदवार आडवे केल्याशिवाय ओबीसी राहणार नाहीत, असेही हाके यावेळी म्हणाले.
होळकरांचे वंशज म्हणून कोणालाही उमेदवारी दिली जात आहे. आमदार रोहित पवार व प्रवीण गायकवाड यांच्या स्क्रिप्टवर चालणारा बाहुला अशी ओळख राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उपाध्यक्ष भूषणसिंह होळकर यांची आहे. होळकरांचे वंशज अमेरिकेत असून ते असल्या राजकारणापासून दूर असल्याचे लक्ष्मण हाके यांनी स्पष्ट केले.
लोकसभा निवडणुकीत मराठा समाज महायुती सरकार आणि भाजपवर नाराज असल्यामुळे मराठवाड्यात महायुतीचे अनेक उमेदवार पडले होते. बीड लोकसभा मतदारसंघात भाजपच्या ओबीसी नेत्या पंकजा मुंडे यांनाही पराभवाचा धक्का बसला होता. त्यामुळे आता विधानसभेला काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.