Loksabha Election 2024 : मुरुम (ता. उमरगा, जि. धाराशिव) येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेले बसवराज विश्वनाथअप्पा मंगरूळे शिक्षणानिमित्त छत्रपती संभाजीनगरला (औरंगाबाद) गेले आणि नंतर तेथेच स्थायिक झाले, पुढे तेथे शिक्षणसंस्थांचे जाळे उभे केले. मात्र त्यांनी आपल्या जन्मभूमीशी नाळ कधीही तोडली नाही. महाविद्यालयीन जीवनापासूनच ते राजकारणात सक्रिय झाले. भाजपचे पक्षकार्य, शैक्षणिक क्षेत्रातील भरारी आणि सामाजिक कामांच्या बळावर त्यांनी छत्रपती संभाजीनगरसह राज्यभरात ओळख निर्माण केली आहे. ते सध्या भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. (Latest Marathi News)
ग्रामीण भागातील तरुणाईसाठी एक 'व्हिजन' घेऊन ते या धाराशिव लोकसभा मतदारसंघात आले आहेत. निवडणूक जाहीर व्हायच्या आधीच धाराशिव लोकसभा मतदारसंघातील अनेक गावांना भेटी देऊन ते समस्या जाणून घेत आहेत, त्यावर काय उपाय करता येतील, याचा विचार करत आहेत. कोरोनानंतर तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात शेतीकडे वळला आहे, हे गावोगावी भेट दिल्यानंतर त्यांच्या लक्षात आले आहे. या तरुणांच्या हाताला काम काम देऊन त्यांना उद्यमशील कसे बनवता येईल, यासाठी ते प्रयत्नशील आहेत.
बसवराज विश्वनाथअप्पा मंगरूळे
7 सप्टेंबर 1963
बीई- इलेक्ट्रिकल
बसवराज मंगरूळे यांचे वडील विश्वनाथअप्पा हे शेतकरी. त्यांच्या मातोश्री सुशीलाबाई आता हयात नाहीत. बसवराज मंगरूळे यांचे शालेय शिक्षण मुरुम येथे आणि महाविद्यालयीन शिक्षण धाराशिव येथे झाले. त्यानंतर अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी त्यांनी छत्रपती संभाजीनगर गाठले. त्यांच्या पत्नी संगीता या गृहिणी आहेत. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. मुलगी ऐश्वर्या हिने अभियांत्रिकीचे पदव्युत्तर शिक्षण घेतले असून, त्यानंतर एमबीए केले आहे. मुलगा अद्वैत हा अभियांत्रिकी पदवीधर आहे. दोघेही वडिलांचा व्यवसाय सांभाळतात. बसवराज मंगरूळे यांना एक बंधू असून त्यांचे नाव शिवराज मंगरुळे आहे. ते सेवानिवृत्त प्राध्यापक आहेत.
मंगरुळे यांनी श्रीयश प्रतिष्ठानच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर येथे २००७ मध्ये अभियांत्रिकी, फार्मसी, एमबीए महाविद्यालय सुरू केले. श्रीयश अभियांत्रिकी महाविद्यालय हे नॅक मानांकन मिळवणारे मराठवाड्यातील पहिलेच ठरले. त्यांचे काका कै. गुंडप्पा मंगरूळे हे काँग्रेस पक्षाकडून मुरुम बाजार समितीचे प्रदीर्घ काळ सभापती होते. त्यांच्या काळात बाजार समितीची भरभराट झाली.
शिक्षण संस्था
धाराशिव
भारतीय जनता पक्ष
जन्मभूमीतूनच मोठी स्वप्ने पाहत छत्रपती संभाजीनगर गाठलेले बसवराज मंगरूळे यांनी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष पदापर्यंत मजल मारली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना 1982-83 मध्ये निवडणूक लढवून ते विद्यापीठ प्रतिनिधी बनले. 1985-86 मध्ये विद्यार्थी संसदेचे अध्यक्ष बनले.
अध्यक्षपदाचा उपयोग विद्यार्थ्यांसह संस्थेलाही व्हावा, या उद्देशाने त्यांनी 1985-86 मध्ये महाविद्यालयाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमास राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव निलंगेकर यांच्यासह कॅबिनेट मंत्र्यांनाही निमंत्रित केले होते. मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू करावा, अशी मागणी मंगरूळे यांनी त्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांकडे केली होती. मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह उभारण्याचीही मागणी त्यांनी केली होती. पाठपुरावा करून या दोन्ही मागण्यांना त्यांनी मंजुरी मिळवून आणली होती.
महाविद्यालयीन जीवनातच नेतृत्वगुणाची चुणूक दाखवल्याने पुढे सक्रीय राजकारणात त्याचा फायदा झाला. छात्रसंघाच्या निवडणुकांपासून सुरू झालेला हा प्रवास भारतीय जनता पक्षापर्यंत पोहोचला. भाजपचा कार्यकर्ता म्हणून ते मराठवाड्यातील पक्षाच्या सर्व कार्यक्रमात सहभागी होत राहिले. दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत त्यांनी पक्षाचे काम सुरू केले. मुंडे साहेब हे मंगरुळे यांच्या पाठिशी आहेत, असे त्यावेळी बोलले जायचे. मी बसवराजच्या मागे नाही, त्याच्या सोबत आहे. कारण, सावली कधीच साथ सोडत नाही, असे याबाबत गोपीनाथ मुंडे म्हणाले होते.
भाजपचे छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष म्हणूनही मंगरुळे यांनी काम पाहिले. मोर्चे, आंदोलने, सामाजिक उपक्रम, वरिष्ठ नेत्यांच्या सभांचे नियोजन, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका, लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतही त्यांनी मोठे योगदान दिले. भाजपने त्यांना धनंजय मुंडे यांच्या विरोधात विधान परिषदेची उमेदवारी दिली होती. मात्र पक्षाच्या आदेशाचे पालन करत त्यांनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला होता. संभाजीनगरमध्ये भाजपसाठी प्रतिकूल परिस्थिती असतानाही महापालिकेत पहिल्यांदाच १८ उमेदवार विजयी झाले होते. त्यावेळी ते पक्षाचे जिल्हाध्यक्ष होते. सर्वपक्षीय नेत्यांशी त्यांचे सौहार्दाचे संबंध आहेत.
लिंगायत समाजाच्या धर्मगुरुंशीही त्यांचे आपुलकीचे नाते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कलम ३७० हटवल्यानंतर संपूर्ण मराठावाडाभर फिरुन त्यांनी या निर्णयाबाबत जनजागृती केली होती. छत्रपती संभाजीनगर, बीड आणि धाराशिवसह मराठवाड्यात त्यांनी सातत्याने संपर्क ठेवला आहे. याची दखल घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांतदादा पाटील यांनी मंगरुळे यांची 2020 मध्ये भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड केली.
नोव्हेंबर 2022 मध्ये संस्थाचालक गटातून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य म्हणून सर्वाधिक मतांनी विजयी झाले. फेब्रुवारी 2023 मध्ये संस्थाचालक गटातून व्यवस्थापन परिषदेवर विक्रमी मतांनी निवडून आले. कर्मभूमीने खूप काही दिले, आता जन्मभूमीसाठी काहीतरी करायचे, हा उद्देश बाळगून ते मूळ गावी मुरूम येथे स्थायिक झाले आहेत. भाजपमधील योगदानाच्या जोरावर आता ''धाराशिव नवपर्वारंभाचे'' स्वप्न त्यांनी बाळगले आहे.
शिक्षणासाठी गाव सोडल्यानंतर आता ते धाराशिव मतदारसंघात स्थायिक झाले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात त्यांनी भरीव सामाजिक काम केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त 2018 पासून ते मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन करत आहेत. कोरोनाच्या महामारीतही आशा वर्कर व कामगार वर्गातील 3500 कुटुंबांना काही महिने पुरेल इतक्या अन्नधान्याचे मोफत वाटप त्यांनी केले.
2011 पासून छत्रपती संभाजीनगरमध्ये ते दरवर्षी रोजगार मेळाव्याचे आयोजन करतात. पहिल्याच वर्षी 400 तरुणांना नोकरी मिळाली होती. देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन पर्यावरणमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून त्यांनी संभाजीनगर येथे पहिली वृक्षदिंडी काढली होती. संभाजीनगरमध्ये त्यांच्या कॅम्पसमध्ये 35,000 झाडांची लागवड करून संवर्धन करण्यात आले आहे. पाणी अडवा-पाणी जिरवा ही मोहिमही राबवली आहे.
निवडणूक लढवली नाही.
निवडणूक लढवली नव्हती.
पूर्वीही संपर्क होता, आता ते मूळ गावी मुरुम येथे स्थायिक झाले आहेत. त्यामुळे मतदारसंघात संपर्क वाढला आहे.
सोशल मीडियावर सक्रिय असतात.
नाही
गोपीनाथ मुंडे
पक्षसंघटनेतील कामाचा मोठा अनुभव. पक्षाच्या राज्य, राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांशी संपर्क. छत्रपती संभाजीनगर येथील शैक्षणिक संकुलामुळे सर्वदूर संपर्क. भरीव सामाजिक कार्य.
विधानसभा किंवा लोकसभा निवडणूक लढवलेली नाही.
उमेदवारी न मिळाल्यास पक्षाच्या विरोधात बंडखोरी करणार नाहीत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.