Environment Minister Pankaja Munde 'People's Chief Minister' birthday banner. Sarkarnama
मराठवाडा

Pankaja Munde : पंकजा मुंडेंचा 'कमबॅक' कोणाला खुपतोय? "जनतेच्या मनातील मुख्यमंत्री" म्हणून पुन्हा बँनरबाजी, फडणवीसांचा फोटोही गायब

Pankaja Munde : पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त लागलेल्या 'जनतेच्या मनातील मुख्यमंत्री' बॅनरमुळे पुन्हा राजकीय चर्चा रंगल्या आहेत. दशकापूर्वी याच घोषणेवरून निर्माण झालेल्या वादाचीही आठवण यानिमित्ताने ताजी झाली आहे.

Jagdish Pansare

Pankaja Munde News : राज्याच्या पर्यावरण मंत्री तथा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचं सध्या बरं चाललंय. पण हे 'बरं' चाललेलं कुणाच्या डोळ्यात खुपतंय का? असा प्रश्न वाढदिवसानिमित्त लागलेल्या 'जनतेच्या मनातील मुख्यमंत्री' अशा शुभेच्छा बॅनरवरून पडत आहे. हे कार्यकर्त्यांचं प्रेम पंकजा मुंडे यांच्याच राजकीय उत्कर्षाच्या आड येऊ शकतं अशी भीती व्यक्त केली जात आहे.

१० वर्षांपूर्वी 'जनतेच्या मनातील मुख्यमंत्री' असं म्हणून पंकजा मुंडे यांनी वरिष्ठांची नाराजी ओढावून घेतली होती. पुण्यातील भारती विद्यापीठाच्या कार्यक्रमात "मला प्रत्यक्षात मुख्यमंत्री होता आलं नसलं तरी, राज्यातील जनतेच्या मनात मुख्यमंत्री म्हणून मीच आहे", असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. याची मोठी राजकीय किंमत त्यांना द्यावी लागली. भाजपासारख्या शिस्तबद्ध पक्षात अशा घोषणा त्यांना अडचणीच्या ठरल्या होत्या.

या वक्तव्यानंतर काही दिवसांतच पंकजा यांच्याकडून महत्त्वाचं खातं काढून ते राम शिंदे यांच्याकडे देण्यात आलं. 29 सप्टेंबर 2019 रोजी बीडच्या सावरगाव घाट येथील दसरा मेळाव्यात अमित शहा यांच्या भाषणादरम्यान समर्थकांनी अशाच प्रकारच्या घोषणा दिल्याने पंकजा मुंडे यांची अडचण झाली होती. या घोषणाबाजीमुळेही भाजपचे वरिष्ठ नेते नाराज झाले होते.

यावर पंकजा मुंडे यांना पत्रकार परिषदेत 'मी कधीही मुख्यमंत्रि‍पदावर दावा केला नाही. पक्षाची परंपरा आणि शिस्त आपल्याला माहित आहे. पण जे लोक मागणी करत होते त्यांना थांबवणे मा‍झ्या हाती नाही', असा खुलासा केला होता. त्यानंतरही 2019 च्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा चुलत भाऊ धनंजय मुंडे यांच्याकडून पराभव झाला. पराभवानंतर 'जनतेनं मला स्वीकारलं नाही' अशी कबुली त्यांनी दिली होती.

धनंजय मुंडे यांच्याकडून झालेल्या पराभवानंतर पंकजा मुंडे राज्यातील आणि अगदी जिल्ह्यातील राजकारणातही बॅकफूटवर गेल्या होत्या. विधान परिषद, राज्यसभेच्या अनेक संधी होत्या झाल्या पण त्यासाठी पंकजा मुंडे यांचा विचार झाला नाही. तब्बल ५ वर्ष त्या राजकीय वनवास भोगत होत्या, अशीच परिस्थिती होती. एक विधान त्यांना कायम चिकटलं आणि स्वपक्षीयांसह विरोधकांनीही त्याचा पुरेपूर वापर केला.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांची राजकारणात नव्यानं एन्ट्रीची तयारी सुरू झाली. प्रीतम मुंडे यांच्याऐवजी बीडमधून पंकजा यांना उमेदवारी दिली. पण राज्यात आरक्षण मुद्यावरून मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष निर्माण झाला. यात ६ हजार मतांच्या फरकाने पंकजा मुंडे यांचा पराभव झाला.

यानंतरही पक्षानं पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर संधी दिली, मंत्रिपद दिलं. ओढावलेली वरिष्ठांची नाराजी दूर करत त्यांनी कसंबसं पुनरागमन केलं. आता फडणवीस यांच्यासह केंद्रातील नेत्यांशीही त्यांचं ट्यूनिंग जुळलं आहे. बीडमध्ये २ वर्षात घडलेल्या राजकीय घडामोडीत धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद गेलं, पण पंकजा मुंडे यांना भाजपानं पाठबळ दिलं. थोडक्यात आता सगळं काही 'बरं' चालेलं दिसत आहे.

पुन्हा झळकले 'जनतेच्या मनातील मुख्यमंत्री' आशयाचे बॅनर्स :

असं असताना पंकजा मुंडे यांच्या वाढदिवासानिमित्त बीडमध्ये 'जनतेच्या मनातील मुख्यमंत्री' अशा आशयाचे बॅनर झळकले आहेत. त्यांच्या विविध कार्यकर्त्यांनी हे बॅनर्स लावल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे यातील काही बॅनर्सवर नरेंद्र मोदी, अमित शाह, जे. पी. नड्डा, नितीन नबीन यांचे फोटो आहेत, पण देवेंद्र फडणवीस यांचा फोटो गायब आहे.

आता यापूर्वी एकदा तोंड पोळल्यानंतर पंकजा यांच्याकडून अशी बॅनरबाजी करायला सांगण्याची शक्यता कमीच आहे. मग हा खोडसाळपणा करतंय कोण? आणि का? पुन्हा जुनाच वाद उकरून काढत त्यांच्या उत्कर्षाच्या मार्गात कोण काटे टाकतोय? याची बीड जिल्ह्यासह राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT