

Beed Crime: जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी, पोलीसांकडून गुन्हे दाखल करण्यास होणारी टाळाटाळ, त्यातून गुंडांची वाढणारी हिंमत या सगळ्यावर लगाम लावण्याचे प्रयत्न वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून सुरू आहेत. पण ग्रामीण, तालुका पातळीवरील काही भ्रष्ट पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमुळे संपुर्ण बीड पोलीस बदनाम होत आहेत. सिरसाळा पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार देण्यासाठी गेलेल्या एका महिला व तिच्या पतीला तेथील कर्मचाऱ्यांनी अक्षरश: हुसकावून लावल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.
तपासाआधीच असे काही घडलेच नाही, तु आम्हाला कायदा शिवकतेस का? असे म्हणत पीडीत महिलेलाच अपमानीत केले. कारवाईची मागणी केली तेव्हा विनयभंग झाल्याची तक्रार नोंदवून न घेता मारहाणीची साधी एनसी दाखल करून घेत बोळवण केल्याचा प्रकार समोर आला आहे. आता या प्रकरणात वरिष्ठांनी लक्ष घातले असून आरोपींविरुद्ध महिलेची तक्रार नोंदवून घेत पुढील कारवाई सुरू केली आहे.
बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था, वाढती गुन्हेगारी, महिला-मुलींवरील अत्याचार, खून, दरोडे आणि या सगळ्या घटना रोखण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस प्रशासनाच्या भूमिकेबद्दल राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बीड जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. एकीकडे पोलीस अधिक्षक नवनीत काँवत व संपुर्ण पोलीस प्रशासन या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अलर्ट आहे. तर दुसरीकडे त्यांचेच पोलीस कर्मचारी सर्वसामान्य महिलेची तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ करत आहे.
परळी तालुक्यातील सिरसाळा पोलीस ठाण्यात २४ जुलै रोजी एक पिडित महिला अनिल, सुनील, विनोद आणि दिनेश पवार या आरोपींच्या विरोधात छेडछाड केल्याची तक्रार देण्यासाठी आपल्या पतीसह गेली होती. पती-पत्नी दोघेही निरक्षर असल्याने गोवर्धन हिवराचे बीट अंमलदार आशिष शेंगुळे, विष्णू घोळवे यांनी उलट पिडित महिलेवरच अरेरावी सुरू केली.
छेडछेडीची तक्रार असताना ती टाळत केवळ महिलेच्या पतीला आरोपींकडून मारहाण झाल्याची साधी एनसी तक्रार दाखल करून घेतली. शनिवारी महिलेने या संदर्भात जाब विचारला तेव्हा तू तुझ्या पतीला घेऊन ये, तसे काही घडलेच नाही, तू आम्हाला कायदा शिकवतेस का? अशी दमबाजी केली. तक्रार नोंदवून न घेता साडेसात तास पिडित महिला, तिचा पती, दीर यांना पोलीस ठाण्यात बसवून ठेवले. उलट तुझ्यावर, सासरा आणि दिरावरच गुन्हा दाखल करून आत टाकू, अशी धमकीही दिली.
हा प्रकार पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक बी. बी. राठोड यांना कळाल्यानंतर त्यांनी सारवासारव केली. महिलेची तक्रार आधीच दाखल करून घेतली होती. सविस्तर पंचनाम्यानंतर आम्ही सविस्तर तक्रार दाखल करून घेणार होतो, असे ते म्हणाले. परंतु घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आपण स्वतः पोलीस ठाण्यात येऊन सदर महिलेची तक्रार नोंदवून घेतली आहे. कायद्यानूसार पुढील कारवाई सुरू केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, पोलीस अधीक्षक नवनीत कावँत यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. या संपूर्ण प्रकाराबाबत मी तातडीने सविस्तर माहिती मागवून घेतो. पीडित महिलेला त्रास देणे किंवा तक्रार घेण्यास टाळाटाळ करणे अत्यंत गंभीर आहे. चौकशीत असे काही घडल्याचे निष्पन्न झाल्यास दोथी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर तत्काळ कडक कारवाई करण्यात येईल, असे काँवत यांनी सांगीतले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.