Beed Political News : 'मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे,' या एका वाक्याने भाजपमध्ये राजकीय कारकीर्द किती धोक्यात येऊ शकते, हे पंकजा मुंडे यांना अनुभवावे लागत आहे. जीएसटी थकवल्याचा आरोपावरून त्यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्यावर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईतून भाजपमध्ये पंकजा मुंडे यांच्यामागील शुक्लकाष्ट पाठ सोडताना दिसत नाही. आता पंकजा यांना घेरण्याचा प्रयत्न भाजपला महागात पडण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू झाली आहे. (Latest Political News)
भाजपचे दिग्गज नेते कै. गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या, माजी मंत्री पंकजा मुंडे या पक्षातील मुख्य प्रवाहातून बाजूला फेकल्या गेल्या आहेत. २०१४ ला राज्यात युतीचे सरकार आले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनले. या पदासाठी आणखी काहीजण इच्छुक होते. त्यात पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, त्यांना कॅबिनेट मंत्रिपदावर समाधान मानावे लागले. एका कार्यक्रमात 'मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे,' असे म्हणत त्यांनी आपल्या मनात काय होते, हे सांगून टाकले.
तेव्हापासून त्यांच्या मागे जी साडेसाती लागली, ती कायम आहे. जीएसटीचे १९ कोटी थकवले म्हणून त्यांच्या परळी (जि. बीड) येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर नुकतीच कारवाई करण्यात आली आहे. 'कर्जासाठी मी बँकांच्या पाया पडत आहे,' असे पंकजांचे वक्तव्य आता समोर आले आहे. हे वक्तव्य भाजपला महागात पडू शकते. यामुळे पंकजांना सहानुभूती मिळू शकते.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांना राज्यभरातून प्रचंड सहानुभूती मिळाली. फुटीर गटातील नेत्यांकडून उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर सातत्याने केल्या जात असलेल्या टीकेमुळे उद्धव ठाकरे यांच्याबाबतची सहानुभूती टिकून राहिल्याचे बोलले जात आहे.
भाजपने शिवसेना फोडली, इथपर्यंत ठीक होते. गणित बिघडले ते अजित पवारांच्या एन्ट्रीमुळे. भाजपच्या या उद्योगाने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. अशा स्थितीत भाजपने पंकजांच्या कारखान्यावर कारवाई करून आपला पाय आणखी खोलात रुतवून घेतला आहे. पंकजा यांनी काही वेगळा निर्णय घेतला, तर भाजपला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागणार आहेत.
महाराष्ट्रात ७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा झाला आहे, त्यातील दोषींना सोडणार नाही, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभेत दिला होता. त्यानंतर अगदी काही दिवसांतच अजित पवार राज्यातील सत्तेत सहभागी झाले. भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची सर्वाधिक गोची इथेच झाली आहे. हे भाजपला महागात पडू शकते.
अजित पवार बाहेर पडल्यानंतर शरद पवार यांनाही राज्यभरातून मोठी सहानुभूती मिळाली. महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये समन्वय असल्याचे चित्र दिसत आहे. उलट लोकसभेच्या एका जागेसाठी भाजपचे अनेकजण इच्छुक असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र, महायुतीतील शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या पक्षांतही यामुळे अस्वस्थता पसरू शकते. (Maharashtra Political News)
भाजप बहुजन समाजात, ओबीसींमध्ये रुजला, त्या नेत्यांमध्ये कै. गोपीनाथ मुंडे यांचे नाव अग्रस्थानी आहे. मराठवाड्यात भाजपने त्यांच्यामुळेच हातपाय पसरले. मात्र, गोपीनाथ मुंडे यांचीही भाजपमध्ये शेवटी शेवटी उपेक्षाच झाली. मुख्यमंत्रिपदाचे ते प्रबळ दावेदार होते, मात्र त्यांना केंद्रात पाठवण्यात आले. त्यांना मानणारा अजूनही मोठा वर्ग आहे. तेच त्यांच्या कन्या पंकजा मुंडे यांच्या पाठीशीही आहेत. २०१४ मध्ये पंकजा मंत्री असताना त्यांच्या विरोधात चिक्की घोटाळा उकरून काढण्यात आला. २०१९ मध्ये परळी मतदारसंघातून पंकजा यांचा पराभव झाला. महायुतीत आता परळी मतदारसंघ कुणाला सुटणार? धनंजय मुंडे यांना सुटला, तर आश्चर्य वाटायचे कारण नाही.
पंकजा मुंडे यांची सातत्याने कोंडी केली जात आहे. त्यांच्याकडे पक्षाचे राष्ट्रीय संघटनात्मक पद आहे. विरोधी पक्ष आणि स्वपक्षातील पंकजा यांच्यासारख्या नेत्यांना जेरीस आणले जात असल्याची भावना मुंडेंच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. दरम्यान, सत्ता असूनही दोन मोठे पक्ष फोडूनही अमित शाह, जे. पी. नड्डा यांना वारंवार महाराष्ट्रात यावे लागत आहे. हे असेच राहिले आणि महाविकास आघाडीतील एकी कायम राहिली तर भाजपला याचा फटका बसू शकतो.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.