पंकजा मुंडे यंदाच्या दसरा मेळाव्यात राजकारणासोबतच पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आवाहन करणार आहेत.
समर्थकांना गुळ, चनाडाळ व गव्हाचे पीठ आणण्याचे विशेष आवाहन केले आहे.
दसरा मेळावा सामाजिक जबाबदारी व राजकीय संदेश यांचा संगम ठरणार आहे.
Pankaja Munde Dasara Melava : राज्यात आणि विशेषत: मराठवाड्यात अतिवृष्टी, पुराने झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी होणाऱ्या दसरा मेळाव्यांकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. सावरगाव घाट येथील भगवान भक्ती गडावर गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला दसरा मेळावा यंदा कसा होतो? याची चर्चा सुरू असतानाच राज्याच्या मंत्री तथा भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी आपल्या समर्थकांना वेगळेच आवाहन केले आहे. त्यांच्या या आवाहनानंतर खरंच यंदाचा दसरा मेळावा वेगळा ठरणार आहे.
पूर परिस्थितीने मराठवाड्यात हाहाकार उडाला आहे. शेती, पिकं, घरंदार, अन्नधान्य आणि जनावरे वाहून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. सरकारी मदतीकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजाला मदतीचा हात देण्याचा प्रयत्न राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते आपापल्यापरीने करत आहेत. पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी दसरा मेळाव्यानिमित्त आपल्या समर्थकांना आवाहन करताना मेळाव्याला येताना गव्हाचे पीठ चणाडाळ आणि गूळ घेऊन येण्यास सांगीतले आहे.
महापुरामुळे मराठवाड्यातील (Marathwada) अनेक जिल्ह्यात भयावह परिस्थिती आहे. सरकारकडून पूरग्रस्तांना मदत केली जात असली तरी अनेक घरांमध्ये चूल पेटणार नाही, अशी स्थिती आहे. अनेक घरात दसऱ्याच्या दिवशी गोडधोड होणार नाही. अशा आपल्या पूरग्रस्त बांधवांना या दसऱ्याच्या दिवशी गोडधोड खाता यावे यासाठी मेळाव्याला येणाऱ्या प्रत्येकाने गुळ, गव्हाचे पीठ आणि चणाडाळ सोबत आणून भगवान बाबांच्या चरणी अर्पण करावे.
हा प्रसाद प्रत्येक गावात पोहोचवण्याचे काम आपल्याला करायचे आहे, असे आवाहन पंकजा मुंडे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून केले आहे. महापुरामुळे मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात, गावात बेताची परिस्थिती निर्माण झाली आहे. पूरग्रस्तांसाठी सरकार योग्य तो निर्णय घेईल. यंदाचा आपला दसरा मेळावा म्हणजे मेळावा नाही, सभा किंवा राजकीय व्यासपीठ नाही. ही एक परंपरा आहे जी भगवान बाबांनी सुरू केली.
पुढे मुंडे साहेबांनी त्या परंपरेला उंचीवर नेलं, माझ्या श्वासात श्वास असेपर्यंत ही परंपरा खंडित होऊ देणार नाही. यंदाचा दसरा मेळावाही उत्साहात होणार, असेही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले. मी भगवान बाबांच्या दर्शनासाठी येणार आहे, भगवान बाबांच्या चरणी त्यांची पूजा करण्यासाठी त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी. आपण ही परंपरा खंडित होऊ देणार नाही, माझ्या भाषणाने तुम्हाला ऊर्जा मिळते तर तुमच्या दर्शनाने मला ऊर्जा मिळते.
तुमच्या विराट रूपाचे दर्शन होते, वर्षभर संघर्ष करण्याची ऊर्जा या मिळून मिळते. माझा दसरा मेळावा साधाच असतो, 18 पगड जाती धर्मांचा संगम असलेली ही परंपरा आहे. त्यामुळे पूरग्रस्त भागात यंदा ज्यांच्या घरात चूल पेटू शकत नाही, दसऱ्याच्या दिवशी पुरणपोळी खाता येणार नाही त्यांच्यासाठी आपण पुढे या, असे पंकजा मुंडे यांनी आपल्या व्हिडिओ संदेशात म्हटले आहे.
Q1. पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याची वैशिष्ट्ये काय असतील?
➡️ यंदा मेळावा सामाजिक उपक्रमाशी जोडलेला असेल, पूरग्रस्त मदतीसाठी आवाहन करण्यात आले आहे.
Q2. कार्यकर्त्यांना कोणते साहित्य आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे?
➡️ गुळ, चनाडाळ आणि गव्हाचे पीठ आणण्याचे आवाहन केले आहे.
Q3. हा उपक्रम कुणासाठी राबवला जात आहे?
➡️ महाराष्ट्रातील पूरग्रस्त कुटुंबांना मदत करण्यासाठी.
Q4. पंकजा मुंडे यांचा मेळावा नेहमीपेक्षा कसा वेगळा असेल?
➡️ राजकीय भाषणांबरोबरच समाजकारणाला प्राधान्य दिले जाणार आहे.
Q5. हा मेळावा कुठे होणार आहे?
➡️बीड जिल्ह्यात पारंपरिक पद्धतीने होणारा दसरा मेळावा आयोजित केला जाणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.