Marathwada Drought News : गेल्या आठवड्यात बीडमध्ये माजी आमदार भीमराव धोंडे, बाळासाहेब आजबे यांच्या नेतृत्वाखाली आष्टी, पाटोदा, शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी जायकवाडीच्या पाण्यासाठी जलहक्क जनआक्रोश मोर्चा काढला होता. या मोर्चावरून मोठे राजकारण आणि आरोप-प्रत्यारोपही झाले.
आष्टीचे भाजपा (BJP) आमदार सुरेश धस यांचा या मोर्चाला विरोध होता. लोकांनी या मोर्चाला जावू नये यासाठी त्यांनी गावातील सरपंचांना फोन केले होते, असा आरोप धोंडे, आजबे यांनी आपल्या भाषणातून केला होता. जायकवाडीचे पाणी या तीनही तालुक्यांना मिळावे, या मागणीला पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी बळ दिले आहे. जायकवाडीचे पाणी पाटोदा तालुक्याला देण्याबाबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
पंकजा मुंडे (Pankja Munde) यांनी दोन दिवसाचा दुष्काळी दौरा केल्यानंतर जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्याशी जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा करून प्रशासन करत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती घेतली. जायकवाडीचे पाणी पाटोदा तालुक्याला देण्याबाबत तसेच पाणी, चारा आणि जलसंवर्धनाची कामे प्राधान्याने हाती घेण्याबाबत त्यांनी जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या.
गेल्या आठवड्यात पंकजा मुंडे यांनी परळी, अंबाजोगाई, केज तालुक्याचा दौरा केल्यानंतर कालपासून बीड, पाटोदा, वडवणी, धारूर, माजलगांव, गेवराई या भागात पाहणी करून दुष्काळी पाहणी केली. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणार असे सांगत त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.
दुष्काळी पाहणी दौऱ्यात आलेले अनुभव व परिस्थिती यावर पंकजा मुंडे यांनी जिल्हाधिकारी आणि संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी यांच्यांशी सविस्तर चर्चा केली. येत्या काही दिवसांत जिल्ह्यात पाण्याचे मोठे दुर्भिक्ष जाणवणार आहे, त्यादृष्टीने आपल्याला तयार रहावे लागेल.
जायकवाडीतून पाटोदा तालुक्याला जीपीएस लावून पाणी पुरवठा व्हावा. यात गोंधळ होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी सूचना त्यांनी केली. रोजगार हमी योजनेतून नद्यांचे खोलीकरण, रुंदीकरण अशी कामे करावीत. भविष्यात पाणी टंचाई होणार नाही, अशा पध्दतीने नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.
पाणी नसणाऱ्या प्रकल्पाचे ऑडिट करा..
जिल्ह्यातील ज्या प्रकल्पात आजच्या स्थितीत अजिबात पाणी नाही अशा प्रकल्पाचे ऑडिट करा, जेणेकरून पावसाळ्यात पाणी थांबेल आणि अडचण दूर होईल. बांधकामासाठी मोठ्या प्रमाणावर पाणी लागते गरज भासल्यास अशा कामांना स्थगिती देण्याचा विचार करावा, असेही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करताना सांगीतले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.