Pankaja Munde  Sarkarnama
मराठवाडा

Pankaja Munde : स्टेजवरची गर्दी विजयाची नांदी नसते, सतीश चव्हाण यांच्या पराभवानंतर पंकजा मुंडे यांच्या त्या विधानाची पुन्हा चर्चा!

Marathwada Graduate Constituency: मराठवाडा पदवीधर निवडणुकीत सतीश चव्हाण यांच्या पराभवानंतर पंकजा मुंडे यांच्या स्टेजवरील गर्दीविषयीच्या विधानाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. प्रचारातील नेत्यांची उपस्थिती आणि प्रत्यक्ष मतदारांशी संपर्क यावर प्रश्न उपस्थित होत आहेत.

सरकारनामा ब्यूरो

नितीन चव्हाण

Marathwada Politics News : तीनवेळा सलग मराठवाडा पदवीधर सारख्या ७६ तालुके आणि आठ जिल्हे असलेल्या महाकाय मतदारसंघातून निवडून येणाऱ्या सतीश चव्हाण यांचा यावेळी मात्र पराभव झाला. शैक्षणिक संस्थांचे जाळे, मजबूत प्रचार यंत्रणा, मतदार, संस्थाचालकांशी असलेला थेट संपर्क आणि आर्थिक ताकद या जोरावर चव्हाण यांनी तीन वेळा बाजी मारली तीच यंत्रणा आणि संपर्क विजयी चौकार साकरण्यासाठी कामी आले नाहीत. याच पार्श्वभूमीवर पर्यावरण मंत्री भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या जुन्या विधानाची चर्चा मराठवाड्यात रंगली आहे.

प्रचारात आघाडी, आठ जिल्हे आणि संपूर्ण तालुक्यात दोन फेऱ्या आणि मतदान करून घेण्यासाठीची सगळी यंत्रणा राबवूनही चव्हाण पराभूत झाले. पदवीधरांचे मेळावे, बैठका आणि प्रचार सभांच्या व्यासपीठावर महायुतीच्या नेत्यांची गर्दी असूनही वाट्याला आलेला पराभव बरच काही शिकवणारा ठरला. सतीश चव्हाण यांच्या प्रचारीतील आघाडी ही लक्षवेधी होती. महायुतीतील मोठमोठे नेते त्यांच्या प्रचारसभेला दिसले होते. मात्र निकालानंतर चव्हाण यांनी लोकमतांचा आदर करत पराभव मान्य केला.

या निमित्ताने राज्याच्या पर्यावरण मंत्री भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर केलेल्या विधानाची चर्चा होते आहे. 'जेव्हा स्टेजवर मोठ्या मोठ्या नेत्यांची गर्दी असते, तेव्हा त्या गर्दीचा आणि नेत्यांच्या उपस्थितीचा प्रभाव निवडणुकीत निश्चित असतो, असा समज अनेकांचा असतो. मात्र, राजकारणात प्रत्येक वेळी ही गर्दी विजयाची पावती असतेच असे नाही, तर कधीकधी हीच गर्दी पराभवाची पायाभरणी ठरू शकते',अशी प्रतिक्रिया पकंजा मुंडे यांनी तेव्हा दिली होती. सतीश चव्हाण यांच्या मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील पराभवानंतर पुन्हा त्या विधानाची चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात बीड मतदारसंघात पंकजा मुंडे यांना अशाच राजकीय वावटळीचा सामना करावा लागला होता. त्यावेळी उमेदवारी अर्ज भरल्यानंतरच्या जाहीर सभेत त्यांनी उघडपणे आपली खंत व्यक्त केली होती. मला भीती वाटतेय, कारण जे गोपीनाथ मुंडे साहेबांच्या आयुष्यभर विरोधात उभे होते, ते आज सर्वच्या सर्व नेते एकाच स्टेजवर गोळा झाले आहेत, असे सांगत त्यांनी स्टेजवरील त्या अवास्तव गर्दीवर आणि गर्दीमागील राजकारणावर बोट ठेवले होते.

दुर्दैवाने, तोच राजकीय प्रभाव त्यांच्या पराभवाचे कारण ठरला आणि त्यांना नवख्या उमेदवाराकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. ​हीच धाटणी आणि इतिहासाची पुनरावृत्ती अलीकडेच बीड येथील सतीश चव्हाण यांच्या एका सभेत पुन्हा पाहायला मिळाली. सतीश चव्हाण यांच्या प्रचारसभेदरम्यान बोलताना पंकजाताईंनी आपले तेच जुने वाक्य पुन्हा एकदा ठणकावून सांगितले होते. सतीश चव्हाणजी, स्टेजवर जेव्हा अशी नेत्यांची गर्दी जमते, तेव्हा विजयाची खात्री वाटण्याऐवजी भीती अधिक वाढायला हवी. नेते संभाळण्यापेक्षा थेट मतदारांना भेटा, असा मोलाचा आणि तितकाच टोकदार सल्ला त्यांनी दिला होता.

पंकजा मुंडे यांचे ते शब्द जणू काही भविष्याची चाहूल देणारेच ठरले आहेत. ​राजकारणातील हाच संदेश अचूक ठरत मराठवाडा पदवीधर मतदारसंघात प्रस्थापितांना जोरदार सुरुंग लागला आहे. सतत तीन वेळा विधान परिषदेचे आमदार राहिलेले मुरब्बी आणि दिग्गज नेते सतीश चव्हाण यांना या निवडणुकीत अखेर पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यांच्या विरोधात मैदानात उतरलेले राष्ट्रवादीचे उमेदवार प्रतापसिंह पाटील यांनी आपल्या शिस्तबद्ध रणनीतीच्या माध्यमातून प्रस्थापित राजकारणाला जोरदार सुरुंग लावला.

​स्टेजवर तुफान गर्दी जमवणारे मातब्बर नेते आणि त्यांची फौज एका बाजूला उभी असताना, दुसरीकडे तळागाळातील मतदारांपर्यंत पोहोचत प्रतापसिंह पाटील यांनी बाजी मारली. प्रस्थापितांना जनतेने कायमचे गिळून टाकले अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात जोरदार रंगली आहे. सतीश चव्हाण यांच्यासारख्या दिग्गजाचा झालेला हा पराभव केवळ एका निवडणुकीचा निकाल नसून, तो स्टेजवरच्या गर्दीच्या राजकारणावर सुजाण पदवीधर मतदारांनी मारलेली सणसणीत चपराक मानली जात आहे. या निकालाने बीडसह संपूर्ण मराठवाड्यात खळबळ उडवून दिली असून, आगामी राजकारणासाठी हा एक मोठा धडा ठरला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT