BJP Beed news : भाजप मंत्री पंकजा मुंडे यांनी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या चुकीच्या कामाला आपले कधीच समर्थन मिळणार नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले.
"ज्याची ऐपत दहा पैशांची आहे, त्याने कष्ट करून पंधरा पैसे करावेत. पण दहाचे शंभर करायला बघणाऱ्यांची जागा तुरुंगात आहे. हे मोदीजींनी गेल्या अनेक वर्षांत दाखवून दिले आहे. त्यामुळे माझ्याकडे चुकीची कामे घेऊन येऊ नका," अशा कडक शब्दांत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना सुनावले.
बीड (Beed) इथल्या अंबाजोगाई इथं भाजपच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते झालं. अंबाजोगाई आणि परळी परिसरातील गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी हे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी कार्यकर्त्यांना आर्थिक व्यवहारांत पारदर्शकता ठेवण्याचे आवाहन केलं.
मंत्री मुंडे (Pankaja Munde) म्हणाल्या, "मी तुम्हाला दहा लाखांचे पत्र दिले, तर त्यात नियमानुसार एक लाख कमवा. पण काम दर्जेदार करा. घराचे मजले कसे चढतात, हे घरच्यांनी आणि बापाने विचारायला हवे. चुकीच्या मार्गाने कमावले तर, कारवाई आणि अटक, अटळ आहे, हे लक्षात ठेवा."
राजकारणातील सद्यस्थितीवर भाष्य करताना मुंडे यांनी विश्वासघातकी प्रवृत्तींवर जोरदार टीका केली. "काही लोक आपल्याला सोडून गेलेत, तर काही लोक आपल्याला वापरून दुसऱ्यांशी संधान साधत गडबड करत आहेत. पण जो माझ्यासोबत कारस्थान करतो, तो कुठे असतो? माझ्या हृदयात पाप नाही. त्यामुळे माझ्या पाठीशी देवाचा आशीर्वाद आहे," असे सांगत त्यांनी विरोधकांना इशारा दिला.
निवडणुकीत पराभव झालेल्या कार्यकर्त्यांना धीर देताना त्यांनी स्वतःचे उदाहरण दिले. "राजकारणात जय-पराजय होतच असतो. मी देखील पडले आहे. पण ज्यांनी हे (कारस्थान) केले, ते आज नकाशावरून गायब झाले आहेत. मला काही करावे लागत नाही, निसर्गच योग्य वेळी काय करायचे ते ठरवतो," असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना पुन्हा जोमाने कामाला लागण्याचे आवाहन केले. चांगले काम करणाऱ्याच्या पाठीशी सर्व शक्ती उभी राहते आणि तुम्हीच माझी खरी शक्ती आहात, असे मंत्री मुंडे यांनी कार्यक्रमाच्या शेवटी म्हटलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.