Beed News, 25 Oct : संपूर्ण शहरातील रस्त्यांवर आणि चौकाचौकात 50-50 फुटांचे डिजिटल बॅनर, झेंडे, आणि कार्यक्रम देखील दणक्यात आणि मग धनंजय मुंडेंच्या नियोजनाची चर्चा. त्यांचे भाषणं देखील तेवढीच आक्रमक.
पण, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अचानक झालेला बदल परळीकरांचा (Parali) चर्चेचा विषय ठरत आहे. अगदी भाजप आमदारांनी विरोध करून देखील जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या बीडला नियोजित 'शासन आपल्या दारी कार्यक्रम' पालकमंत्री झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी परळीतच घेऊन दाखवला.
या कार्यक्रमासाठी अगदी 200 किलोमीटर अंतरावरील आष्टीतून लाभार्थ्यांना परळीत यावे लागले. कार्यक्रमासाठी पाच कोटींचा खर्च शासनाचा झाला असला तरी डंका मात्र धनंजय मुंडे आणि त्यांचे सहकारी वाल्मिक कराड यांचाच होता. राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन असो की राजकीय कार्यक्रम असोत ते मुंडे (Dhananjay Munde) दणक्यातच करत असतात.
मुंडे यांच्या नाथ प्रतिष्ठानच्या गणेशोत्सवात हेमा मालिनीसह इतर सिनेतारकांचे नृत्याच्या कार्यक्रमांवर त्याकाळी राजकीय विरोधक पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी दुष्काळात कार्यक्रम घेतल्याची कडाडून टीका केली होती. तर यंदाच्या कार्यक्रमावर शेतकरी नेत्यांनी अशीच टीका केली तरी धनंजय मुंडे यांनी कोणालाही जुमाणले नाही.
कार्यक्रम धडाक्यातच आणि सातत्याने होत होते. रस्त्यांवर बॅनर आणि झेंड्यांनी सजलेली परळी असे नेहमीचे समीकरण. पण, गुरुवारी परळी विधानसभेत महायुतीकडून उमेदवारी मिळालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सभेची जय्यत तयारी केलेली असताना अचानक अत्यंत साध्या पध्दतीने गाजावाजा न करता उमेदवारी अर्ज भरला.
यामुळे परळीचे नागरीकही अचंबित झाले आहेत. भाषणात देखील धनंजय मुंडे आक्रमकच असतात. 'फडणवीस नाद करा पण पवारांचा करू नका', अशा डायलॉगसह 'मै जब भी बिखरा हु' अशा शेरो शयरीसह ते विरोधकांवर तुटून पडत असतात. पण आता विधानसभेचे पडघम वाजले आणि या दोन्ही बाबी कमालीच्या बदलल्या आहेत.
त्यांच्या प्रचाराची सुरुवात देखील फार गाजावाजा न करता केली आणि आता भाषणात देखील ते 'मला घेरले आहे, माझे राजकीय अस्तित्व नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे.' असे भावनिक आवाहन करत आहेत. या बदलाचे इंगित परळीकरांना कळत नसले तरी याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.