Shiv Sena candidate Saeed Khan receives support from Mahayuti leaders as signs of internal dissent in the Parbhani-Hingoli MLC election begin to fade. Sarkarnama
मराठवाडा

MLC Election : शिवसेनेच्या 'डेंजर झोनमधील' उमेदवाराचे टेन्शन दूर : वरिष्ठांनी डोळे दाखवताच भाजप, राष्ट्रवादीचे स्थानिक नेते ताळ्यावर

MLC Election : परभणी-हिंगोली विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार सईद खान यांच्या उमेदवारीबाबत असलेली नाराजी वरिष्ठ नेतृत्वाच्या हस्तक्षेपानंतर कमी झाल्याचे दिसत आहे. महायुतीत आता एकजुटीचे चित्र निर्माण झाले आहे.

Jagdish Pansare

MLC Election : परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात महायुतीमध्ये जागा कोणाला मिळणार? उमेदवार कोण असणार यावर सुरू झालेल्या चर्चांना शिवसेनेच्या सईद खान यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पूर्णविराम मिळाला. महापालिका निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीने मुस्लिम महापौर करत परभणी जिल्ह्याच्या राजकारणात एक वेगळाच पॅटर्न आणला. शिवसेनेनेही त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत सईद खान यांना उमेदवारी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि जिल्ह्यातील नेते राजेश विटेकर यांनी सर्वाधिक संख्याबळ असल्याचा दावा करत ही जागा राष्ट्रवादीसाठी मागितली होती. मात्र वरिष्ठ पातळीवरून झालेल्या वाटाघाटीत विटेकर यांना माघार घ्यावी लागली. अशीच काहीशी स्थिती भाजपचीही होती. स्वत:चे आणि महायुतीबाहेरील मित्र पक्षांचे संख्याबळ गृहीत धरून भाजपनेही या जागेसाठी हट्ट धरला होता. मात्र एकनाथ शिंदे यांची दावेदारी महायुतीतील भाजप- राष्ट्रवादी या मित्र पक्षांवर भारी पडली. पण यानंतरही सईद खान यांना जाहीर झालेल्या उमेदवारीने परभणी -हिंगोलीच्या जागेवर दावा सांगू पाहणाऱ्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांना 'जोर का झटका'लागला.

परभणीत सईद खान यांचे नेतृत्व मोठे होणे राजेश विटेकर किंवा भाजपमधील काही नेत्यांना रुचणारे निश्चितच नाही. यातून दोन्ही पक्षात सईद खान यांच्या विरोधात नाराजी होती. या नाराजीचा फटका बसणार असे चित्र रंगवले जात गेले. सर्वपक्षीय मतदारांच्या अपेक्षाही उंचावल्या होत्या. मात्र राज्यातील वरिष्ठ नेतृत्वाकडून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नाराजांचे कान पिळल्यानंतर आता महायुतीत ऑल इज वेल असल्याचे चित्र आहे.

सईद खान यांच्यासाठी मतदारांच्या भेटीगाठी आणि बैठकांचे सत्र परभणी आणि हिंगोली या दोन्ही जिल्ह्यांमध्ये सुरू झाले आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांचे नेते शिवसेनेसोबत हिरारीने भाग घेताना दिसत आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडी संख्याबळ नसताना मैदानात दंड थोपटून उतरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमधील नाराजीचा फायदा होतो का? याची चाचपणी महाविकास आघाडीकडून सुरू आहे.

महायुतीचे सईद खान विरुद्ध महाविकास आघाडीचे डॉ. विवेक नावंदर यांच्यात प्रमुख लढत आहे. अपक्ष सुशील देशमुख कुठवर मजल मारतात यावर परभणी हिंगोली विधान परिषदेचा निकाल अवलंबून असणार आहे. संख्याबळ पाहता महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 132 मतांसह सर्वात मोठा पक्ष आहे. भाजपा व इतरांचे संख्याबळ 126 तर शिवसेनेकडे 78 चा आकडा आहे. ही सगळी मते कायम राहिली तर सईद खान यांच्या रूपाने परभणीत विधानपरिषदेवर भगवा फडकणार हे निश्चित.

दुसरीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेस 57 आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 45 असे संख्याबळ आहे. हे संख्याबळ राखतानाच महाविकास आघाडीच्या नाकीनऊ येत असताना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील नाराज मतदार त्यांच्याकडे कितपत वळतील हे सांगणे कठीण आहे. दुसरीकडे महायुतीने आपले संख्याबळ हलू नये यासाठी त्यांना सहलीवर पाठवण्याची तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडीच्या गोटात मात्र अशी कुठलीही हालचाल होताना दिसत नाही.

महाविकास आघाडीने मतदानाआधीच शस्त्र टाकली आहेत का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. दुसरीकडे सईद खान यांनी पायाला भिंगरी लावत परभणी हिंगोली दोन्ही जिल्हे पिंजून काढले आहेत. मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीवर त्यांचा जोर असल्याने महायुती भक्कमपणे या निवडणुकीत वाटचाल करताना दिसत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT