Parbhani Lok Sabha 2024 Sarkarnama
मराठवाडा

Parbhani Lok Sabha 2024 : परभणीच्या लढाईत 'स्थानिक विरुद्ध बाहेरचा' मुद्दा निर्णायक ठरणार...

Lok Sabha Election 2024 : जानकर ठरणार भारी की जाधव हॅट्ट्रीक साधणार?

Jagdish Pansare

Parbhani News : शिवसेना ठाकरे गटाचा बालेकिल्ला असलेल्या परभणी लोकसभा मतदारसंघात महायुतीने रासपच्या महादेव जानकर यांना उमेदवारी जाहीर केली. शिवसेना ठाकरे गटाचे दोन टर्म खासदार असलेल्या संजय उर्फ बंडू जाधव यांच्याविरोधात त्यांची लढत होणार आहे. या निवडणुकीत बाहेरचा विरुद्ध स्थानिक उमेदवार असा मुद्दा पुढे केला जाऊ शकतो. (Lok Sabha election 2024)

महादेव जानकर यांनी जिल्ह्यात रासपची बुथ स्तरावरील बांधणी व संघटनात्मक तयारी असल्याचा दावा करत परभणीतूनच लढण्याची घोषणा केली होती. गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून त्यांच्या पक्षाचे रत्नाकर गुट्टे हे तर तुरुंगात असताना निवडून आले होते. धनगर, ओबीसी समाजाची निर्णायक मते डोळ्यासमोर ठेवून जानकरांनी परभणीतून लढण्याची जोखीम पत्करली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दुसरीकडे ठाकरे गटाने पक्ष फुटीनंतरही एकनिष्ठ राहिलेल्या संजय जाधव यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. संजय जाधव यांच्याविरोधात काही प्रमाणात नाराजी असली तरी बाहेरचा विरुद्ध स्थानिक या मुद्यावर मतदार काय निर्णय घेतात? यावरच त्यांची हॅट्ट्रीक अवलंबून असणार आहे.

महाविकास आघाडीची सत्ता आणि राज्यात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतांना जाधव यांनी जिल्ह्यात राष्ट्रवादीकडून शिवसेनेला दाबण्याचा प्रयत्न केला जातो, विकासकामांना निधी दिला जात नाही, लोकांची आणि सर्वसामान्यांची कामेच होणार नसतील तर खासदार असण्याचा काय उपयोग म्हणत उद्धव ठाकरे यांच्याकडे थेट खासदारकीचा राजीनामाच पाठवून दिला होता. त्यानंतर त्यांची समजूत काढण्यात आली होती.

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड झाले तेव्हाही जाधव यांनी आपल्या 'मन की बात' बोलून दाखवत उद्धवसाहेबांना मुख्यमंत्री व्हायचे होते, तर त्यांनी आदित्य ठाकरेंना मंत्री करायला नको होते, अशी जाहीर भूमिका मांडली होती. एकूणच संजय जाधव हे निर्भीड आणि स्पष्टपणे आपली मते मांडण्यासाठी ओळखले जातात. पक्ष फुटला तरी ते शिवसेनेशी एकनिष्ठ राहिले हीच त्यांच्यासाठी या निवडणुकीत जमेची बाजू ठरु शकते.

मराठा-ओबीसी आरक्षणाच्या वादात उद्धव ठाकरे यांनी संयमित भूमिका घेतल्यामुळे हा मतदार दुरावणार नाही, असा विश्वास जाधव यांच्या समर्थकांना वाटतो. दुसरीकडे जानकर यांच्या उमेदवारीमुळे प्रचारात स्थानिक विरुद्ध बाहेरचा हा मुद्दा ठाकरे गटाकडून प्रामुख्याने समोर आणला जाऊ शकतो. या उलट परभणीची जागा राष्ट्रवादीने स्वतः लढवली असती आणि राजेश विटेकर यांना उमेदवारी दिली असती तर संजय जाधव यांच्या अडचणी वाढल्या असत्या.

सुरवातीपासून परभणीसाठी आग्रही असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी ऐनवेळी या जागेचा आग्रह का सोडला? राष्ट्रवादीच्या कोट्यातून जानकर यांना ही जागा का सोडली? असा प्रश्नही स्थानिक इच्छूक आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना पडला आहे. परभणीतील चित्र आता स्पष्ट झाले आहे.

मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत उमेदवार अथवा कुणालाही पाठिंबा न देण्याची भूमिका जाहीर केली. त्यामुळेही संजय जाधव यांचा जीव भांड्यात पडला असणार. आता प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी परभणीत उमेदवार देणार का? दिला तर तो किती मते घेईल? यावरच संजय जाधव यांची हॅट्ट्रीक किंवा महादेव जानकर यांची परभणीत एन्ट्री होणार का? हे अवलंबून असणार आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT