Parbhani Lok Sabha Constituency
Parbhani Lok Sabha Constituency Sarkarnama
मराठवाडा

Parbhani Lok Sabha Exit Poll 2024 : शिट्टी वाजली, पण जानकरांची गाडी 'सुटली'; परभणीत ठाकरेंचा निष्ठावंतच ठरणार BOSS..

Jagdish Pansare

Lok Sabha exit Poll Results : ओबीसी, वंजारी मतदारांची लक्षणीय संख्या डोळ्यासमोर ठेवून साताऱ्याहून लोकसभेच्या परभणी मतदारसंघात धाव घेणारे राष्ट्रीय समाज पक्षाचे (महायुती) महादेव जानकर पराभूत होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघाचा एक्झिट पोलच्या अंदाजानूसार परभणीत अटीतटीच्या झालेल्या लढतीत शिवसेना ठाकरे गटाचे निष्ठावंत संजय उर्फ बंडू जाधव हेच पुन्हा एकदा विजयी होऊन बाॅस ठरण्याची शक्यता आहे.

प्रचारात आघाडी घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महादेव जानकर यांच्यासाठी शिट्टी वाजवली होती. जानकरांची शिट्टी वाजली असली तरी त्यांची विजयाची गाडी मात्र हुकणार, असे दिसते. लोकसभेच्या परभणी मतदारसंघात जानकरांना उमेदवारी दिल्यापासून बाहेरचा विरुद्ध स्थानिक असा मुद्दा प्रचाराचा प्रकर्षाने पुढे करण्यात आला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विशेषतः महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांनी मतदारांना पोलिस ठाण्यातील काम, तातडीची आरोग्य सेवा किंवा वैद्यकीय मदत लागली तर जानकर साताऱ्यातून येणार आहेत का? असा सवाल जाहीर सभांमधून मतदारांना केला होता. याचा परिणाम तर निवडणुकीच्या मतदानावर झाल्याचे दिसून येतेच, याशिवाय जानकरांच्या उमेदवारीनंतर पहिल्यांदा या मतदारसंघात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष होऊन निवडणूक जातीयवाद कडे वळली.

संजय जाधव यांनी स्वतः याची कबुली देत जानकरांनी जातीयवाद केल्यामुळेच मराठा समाज एकवटला आणि त्याला मला फायदा झाल्याचे जाहीरपणे सांगितले होते. एक लाखापेक्षा जास्त मतांनी आपण विजयी होऊ, असा दावा करतानाच महाविकास आघाडीला मुस्लिम मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे बोलले जाते.

एक्झीट पोलच्या अंदाजातून महादेव जानकर पिछाडीवर तर शिवसेना ठाकरे गटाचे संजय जाधव हे सलग तिसरा विजय मिळवून हॅट्रीकच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे दिसून येत आहे. जानकर पराभूत झाले तर हा विशेषतः भाजपसाठी मोठा धक्का असणार आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाने या मतदारसंघावर दावा केला होता. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे राजेश विटेकर हे दुसऱ्या नंबरवर होते.

परंतु जानकरांचा उपद्रव बारामतीत होऊ नये, यासाठी अजित पवारांनी परभणी मतदारसंघात ताकद असूनही दावा सोडला आणि ही जागा रासपच्या जानकरांना सोडण्याची तयारी दर्शवली होती. जानकर हे रासपचे उमेदवार म्हणून जरी लढत असले तर त्यांच्यासाठी भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे यांच्यासह मराठवाड्यातील अनेक नेत्यांनी ताकद लावली होती.

पंतप्रधान मोदी यांनी परभणीत जानकरांसाठी जाहीर सभा घेत त्यांच्या विजयासाठी शिट्टी वाजवली होती. फडणवीस यांनीही पंतप्रधान मोदींचा संदेश घेऊन आलो आहे, असे म्हणत जानकरांचा विजय भाजपसाठी किती महत्वाचा आहे हे अधोरेखित केले होते. परंतु परभणीच्या मतदारांनी खरी शिवसेना उद्धव ठाकरे यांचीच यावर शिक्कामोर्तब केल्याचे या अंदाजानूसार दिसून येत आहे.

संजय जाधव परभणीतून विजयी झाले तर याचा परिणाम येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत फूट पडल्यानंतर खासदार बंडू जाधव, परभणीचे आमदार राहुल पाटील हे उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिले. परभणीचा मतदार हा गद्दारांना कधीच साथ देत नाही, हा आतापर्यंतचा इतिहास राहिला आहे.

शिवसेनेला पक्ष म्हणून अधिकृत मान्यता आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळवून देणारा हा मतदारसंघ फुटीनंतर चिन्ह बदलले तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब या पक्षाच्या पाठीशी उभा राहिल्याचे एक्झीट पोलच्या अंदाजावरून दिसून येते. जानकरांच्या उमेदवारीमुळे महायुतीत काही प्रमाणात नाराजीचे वातावरण होते. त्याचा फायदा काही प्रमाणात जाधव यांना झाल्याची चर्चा आहे. याही पेक्षा मराठा विरुद्ध ओबीसी या संघर्षात मशालीपुढे शिट्टी कुचकामी ठरताना दिसत आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT