Pamkaja Munde Sarkarnama
मराठवाडा

Parbhani Loksabha Constituency : जानकरांसाठी महायुतीचे सगळे नेते परभणीत, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर तगडे आव्हान!

Mahadev Jankar News : जानकरांवर बाहेरचा, उपरा म्हणून टीका करणाऱ्यांना पंकजा मुंडे यांनी दिलं जोरदार प्रत्युत्तर .

Jagdish Pansare

Loksabha Election 2024 : पक्षफुटीमुळे मिळणारी सहानुभूती, हिंदुत्व आणि निष्ठेच्या जोरावर परभणी लोकसभा मतदारसंघातून विजयाची मशाल पेटवण्याच्या तयारीत असलेल्या ठाकरे गटाला महायुतीने सोमवारी जोरदार शक्तिप्रदर्शनातून तगडे आव्हान दिले. राष्ट्रवादीने तयारी केलेली असताना तडजोडीमध्ये परभणी लोकसभेची जागा 'रासप'च्या महादेव जानकरांना देण्यात आली. परंतु जानकरांची उमेदवारी महायुतीसाठी किती महत्त्वाची आहे, हे आज त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दाखल झालेल्या नेत्यांच्या उपस्थितीवरून स्पष्ट झाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्यासह महायुतीच्या जिल्ह्यातील सगळ्याच नेत्यांनी जानकरांसाठी परभणीकरांकडे मतांचे दान मागितले. महादेव जानकर हे बाहेरचे, उपरे उमेदवार आहेत, या टीकेला पंकजा मुंडे, फडणवीस या नेत्यांनी आपल्या भाषणातून सडेतोड उत्तरही दिले. एकूणच जानकरांच्या(Mahadev Jankar) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने महायुतीने परभणीत महाविकास आघाडीतील शिवसेना पक्षासमोर तगडे आव्हान उभे केल्याची चर्चा यानिमित्ताने होत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

खरंतर राष्ट्रवादीने परभणीतून लढण्याची जोरदार तयारी केली होती. गेल्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या राजेश विटेकर यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती, परंतु महादेव जानकर यांनी दबावतंत्राचा वापर करत महायुतीची विशेषतः अजित पवारांची(Ajit Pawar) कोंडी केली होती. एरवी तुझा करेक्ट कार्यक्रमच करतो म्हणणारे दादा जानकरांसमोर नमलेच. बारामती, सातारा या भागात जानकरांचा उपद्रव नको म्हणून तयारी झालेल्या परभणीच्या जागेवर अजित पवारांनी पाणी सोडले.

आता याच जानकरांना निवडून आणण्यासाठी जिल्ह्यातील राष्ट्रवादी कामाला लागली आहे. भाजपला मतदारसंघ सुटला नाही. म्हणून इच्छुकांनी जानकरांना दगाफटका करू नये, याची काळजी देवेंद्र फडणवीसांनी(Devendra Fadnavis) वाहिली आहे. अगदी आपल्या भाषणात बोर्डीकर, राहुल लोणीकर, राजेश विटेकर यांची नावे घेत सगळ्यांनी कामाला लागण्याच्या सूचना फडणवीसांनी केल्या. पंकजा मुंडे यांनी जानकरांवर बाहेरचा, उपरा म्हणून टीका करणाऱ्यांची तोडं बंद केली.

महायुतीने जानकरांसाठी केलेले शक्तिप्रदर्शन महाविकास आघाडीला धसका घ्यायला लावणारे ठरणार आहे. दुसरीकडे ठाकरे गटाने संजय जाधव यांना परभणीतून तिसऱ्यांदा उमेदवारी देत निष्ठेचे फळ दिले. परंतु उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी आणि जाहीर झाल्यानंतर आठवडा उलटला तरी ठाकरे गटाचा राज्यातील बडा नेता परभणीत फिरकलेला नाही.

उद्धव ठाकरे यांनी हिंगोली, नांदेड, संभाजीनगर, धाराशिव जिल्ह्यांमध्ये संवाद मेळावे घेतले. नांदेड-हिंगोलीत ठाकरे दोन दिवस होते. पण शेजारच्या परभणीसाठी त्यांनी वेळ दिला नाही. आता महायुतीच्या या शक्तिप्रदर्शनाला महाविकास आघाडी विशेषतः ठाकरे गट कसे प्रत्त्युतर देतो, याकडे सगळ्यांचेच लक्ष असणार आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT