Prakash Ambedkar and VBA Sarkarnama
मराठवाडा

Parbhani Loksabha Constituency : ओबीसी उमेदवार देण्याची मागणी करणाऱ्या आंबेडकरांनीच अखेर यू टर्न घेतला!

Prasad Shivaji Joshi

Parbhani News : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात जो पक्ष चौदा लोकसभा मतदारसंघांत ओबीसी उमेदवार देईल, त्या पक्षाच्या पाठीशी राहण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी परभणी येथील जाहीर सभेत केले होते. मात्र, वंचित बहुजन आघाडीने परभणी लोकसभा मतदारसंघातून हवामान अभ्यासक पंजाब डख यांना उमेदवारी देऊन ओबीसी प्रवर्गातील उमेदवार देण्याचे टाळले आहे.(Parbhani Loksabha Constituency)

लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामास प्रारंभ झाला असून, परभणी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना उबाठा गटाचे संजय जाधव हे तिसऱ्यांदा मैदानात उतरले आहेत, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कोट्यात असलेल्या या मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक राजेश विटेकर यांचे जवळपास निश्चित झालेले नाव अखेरच्या टप्प्यात बदलण्यात आले आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.

शिवसेना उबाठा गटासोबत आघाडी जाहीर केलेल्या वंचित बहुजन आघाडीने (VBA) महाविकास आघाडीतील समावेशाबाबत चर्चेच्या फेऱ्या चालू होत्या. मात्र, जागावाटपाबाबत चर्चा यशस्वी न झाल्याने अखेर वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्रपणे निवडणुका लढवण्याचे जाहीर केले, तसेच शिवसेना उबाठा गटासोबत असणारी युतीही संपुष्टात येत असल्याचे जाहीर केले.

शिवसेना (Shivsena) उबाठा गटाची युती तुटल्याचा परिणाम परभणी लोकसभा मतदारसंघात स्पष्टपणे जाणवणार आहे. कारण २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आलमगीर खान यांनी दीड लाखाच्या आसपास मते घेऊन जाधव यांचा विजय सोपा केला होता. आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस,कॉंग्रेस व इतर पुरोगामी विचारांच्या पक्षाची महाविकास आघाडी असल्याने दलित मुस्लिम मते जाधव यांच्याच पारड्यात पडतील अशी शक्यता होती.

मात्र, वंचित बहुजन आघाडीने परभणी लोकसभा मतदारसंघात बाबासाहेब उगले यांना उमेदवारी जाहीर केली. विशेष म्हणजे नाट्यमय घडामोडीनंतर प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब डख यांना उमेदवारी बहाल करण्यात आली. त्यामुळे दलित मतदारांना पर्याय उपलब्ध झाला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ओबीसी समाजाच्या वतीने परभणी येथे एल्गार सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेला संबोधित करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हे उपस्थित होते. त्यांनी जाहीरपणे सांगितले होते की, लोकसभा निवडणुकीसाठी जो पक्ष १४ ठिकाणी ओबीसी उमेदवार देईल त्याच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, अशी भूमिका जाहीर केल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार हा ओबीसी प्रवर्गातीलच असेल, असे निश्चित मानले जात असताना ओबीसी नसलेल्या हवामान अभ्यासक पंजाब डख यांना उमेदवारी दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT