Meghana and Ramprasad Bordikar Sarkarnama
मराठवाडा

Parbhani Loksabha Constituency : परभणी भाजपमध्ये चाललंय काय, बोर्डीकरांना टाळून बैठक?

Prasad Shivaji Joshi

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला असून, पक्षामधील गटतटही उघड होत आहेत. परभणी जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षामध्ये माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर व त्यांच्या कन्या आमदार मेघना बोर्डीकर यांच्या विरोधातील गट छुप्या पद्धतीने सक्रिय होता. मात्र, पक्षाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत पक्षातील गटबाजी उघडपणे समोर आली आहे. पक्षाचे प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर व आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांची अनुपस्थिती होती.

तसेच पक्षाचे जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे व काही तालुकाध्यक्षांनी बैठकीकडे पाठ फिरवली. त्यामुळे बोर्डीकर विरोधी गटाला वरिष्ठांनी आशीर्वाद दिला आहे की काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. रामप्रसाद बोर्डीकर यांची भारतीय जनता पक्षाने(BJP) लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती केली, तर माजी जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम यांच्यावर लोकसभा समन्वयक म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

परभणी लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदाच निवडणूक लढवण्याची संधी असल्याने पक्षातील अनेकांनी जोरदार तयारी सुरू केली. परंतु पक्षपातळीवर आमदार मेघना बोर्डीकर(Meghna Bordikar), युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांच्या नावाचा गांभीर्याने विचार केला जात असल्याची माहिती कार्यकर्ते सांगत होते. मात्र, पक्षातील नेत्यांचा एक गट बोर्डीकर परिवाराविरोधात छुप्या पद्धतीने सक्रिय होता.

लोकसभा समन्वयक डॉ. सुभाष कदम यांचेही नाव संभाव्य उमेदवारांच्या यादीत चर्चिले जाऊ लागले. माजी जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचा दावा केला. तसेच बाबासाहेब जामगे यानीही नेत्यांच्या भेटीगाठी घेत उमेदवारीसाठी आग्रहाने मागणी केली. महायुतीच्या जागावाटपात परभणी लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसला मिळण्याच्या हालचाली सुरू झाल्या. त्यामुळे पक्षातील उत्साहाचे वातावरण काही प्रमाणात थंडावले.

मात्र, दोन दिवसांपासून पक्षातील वातावरण एकदम बदलले आणि शुक्रवार, दि. 21 रोजी पक्षाची तातडीने बैठक बोलवण्यात आली. पक्षाचे प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर यांच्या उपस्थितीत बैठक होणार असल्याचे संदेशात सांगितले गेले. मात्र, या संदेशात लोकसभा निवडणूक प्रमुख रामप्रसाद बोर्डीकर, आमदार मेघना बोर्डीकर यांचे नाव नव्हते. त्याचवेळी अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.

बोर्डीकर यांना टाळून बैठक होत असल्याबाबत समाजमाध्यमात नाराजीचे संदेश येऊ लागले. पक्षाचे जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे यांच्यासह काही तालुकाध्यक्षही बैठकीस उपस्थित नव्हते. बोर्डीकर यांना टाळून घेण्यात आलेल्या बैठकीस पक्षाचे प्रभारी संजय केणेकर यांनी उपस्थित राहून बोर्डीकर विरोधी गटाला आशीर्वाद दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT