Nanded, 23 March : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हळूहळू भाजपमध्ये जम बसवू लागले आहेत. पक्षप्रवेशानंतर 24 तासांत राज्यसभेची उमेदवारी आणि खासदार झाल्यानंतर चव्हाण यांनी नांदेड जिल्ह्यात काँग्रेसमधून जोरदार इन्कमिंग सुरू केले आहे. काँग्रेसमधील समर्थकांना भाजपमध्ये आणतानाच पक्षातील इतर निष्ठावंत दुखावणार नाहीत, याचीही काळजी ते घेत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण पक्षात बऱ्यापैकी सक्रिय झाले असून, आता मेहुणे माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांच्या राजकीय पुनर्वसनासाठी ते सरसावले आहेत.
भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केल्यानंतर अशोक चव्हाणांना (Ashok Chavan) खासदार करून त्यांचे तत्काळ पुनर्वसन केले. पण, त्यांच्यासोबत आलेल्या माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर (Bhaskarrao Patil Khatgaonkar) यांचे पुनर्वसन पक्ष केव्हा व कसे करणार? हा प्रश्न त्यांच्या समर्थकांना पडला आहे. काॅंग्रेसमध्ये असताना डॉ. मीनल पाटील खतगावकर यांनी लोकसभेची तयारी सुरू केली होती. पण, अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर मीनल पाटील खतगावकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
अशोक चव्हाण यांना पक्षात घेतल्यानंतर राज्यसभेची संधी देण्यात आल्यामुळे पुन्हा नांदेड लोकसभा मतदारसंघातून मीनल पाटील खतगावकर यांच्या नावावर विचार होण्याची शक्यता तशी कमीच होती. प्रत्यक्षात घडलेही तसेच, भाजपने गेल्या वेळी विजयी झालेले प्रताप पाटील चिखलीकर यांच्यावरच विश्वास दाखवत त्यांना दुसऱ्यांदा उमेदवारी दिली. त्यामुळे खतगावकर समर्थकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर हे एक वजनदार नेते म्हणून ओळखले जातात. आमदार, खासदार, मंत्री, पदे भूषवत त्यांनी जिल्ह्याच्या राजकारणावर आपला ठसा उमटवलेला आहे. दादा या टोपण नावाने ओळखल्या जाणाऱ्या खतगावकरांनी अशोक चव्हाण यांच्या भाजपमध्ये जाण्याच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवत मी त्यांच्यासोबतच असल्याचे स्पष्ट केले होते. आता भाजपमधून काँग्रेसमध्ये आणि पुन्हा काँग्रेसमधून भाजपमध्ये परतलेल्या खतगावकर यांना पक्ष काय जबाबदारी देतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
काॅंग्रेसमध्ये असताना खतगावकर यांच्या सूनबाई डॉ. मीनल पाटील खतगावकर नांदेडच्या जागेसाठी प्रबळ दावेदार म्हणून चर्चेत होत्या. पण ऐन निवडणुकीच्या तोंडावर अशोक चव्हाण यांनी भाजपत प्रवेश केला, त्यामुळे त्यांच्या मागे भास्करराव पाटील खतगावकर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपने अशोक चव्हाणांना खासदार केले. पण, त्यांच्या सोबत पक्षात गेलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे काय हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहे.
गेल्या निवडणुकीत माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर हे भारतीय जनता पक्षात होते. याचा फायदा चिखलीकरांना झाला होता. त्यांना देगलूर-बिलोली या भागात चांगले मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे गेल्या निवडणुकीतील विजयाची पुनरावृत्ती करण्यासाठी खतगावकरांची भक्कमपणे साथ मिळणे आवश्यक आहे. त्यांची नाराजी परवडणारी नाही, हे लक्षात घेऊन अशोक चव्हाणांनी खतगावकरांची व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घडवून आणली.
आगामी काळात खतगावकरांच्या पुनर्वसनाची गॅरंटी भारतीय जनता पक्षाला घ्यावी लागणार आहे. तरच नांदेडला मिशन 45 यशस्वी होण्यासाठी मदत होईल, असे बोलले जात आहे. या भेटीत फडणवीसांनी खतगावकरांच्या राजकीय पुनर्वसनाचे आश्वासन त्यांना दिले का? हे मात्र समजू शकलेले नाही. आधीच अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे निष्ठावंतांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे, त्यातच खतगावकर यांची भर पडली तर निष्ठावंतांमधील खदखद पुन्हा बाहेर पडू शकते.
Edited By : Vijay Dudhale
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.