Parbhani News : चंद्रपूर महापालिकेच्या महापौर निवडीवेळी मोठ्या नाट्यमय घडामोडी घडल्या. निवडीच्या तासभर आधीच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी युटर्न घेत काँग्रेससोबत न जाता भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. यावेळी एक मताने भाजपचा महापौर निवडून आला तर उपमहापौर पदाच्या निवडणुकीत बरोबरी झाल्याने ईश्वर चिठीच्या मदतीने ठाकरेंच्या शिवसेनेचा उपमहापौर विजयी झाला. त्यामुळे चंद्रपूरमधील घडामोडींचा परिणाम आता परभणीत गुरुवारी होत असलेल्या महापौर पदाच्या निवडणुकीत होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच मोठी अपडेट समोर आली असून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी मोठा दावा केला आहे.
परभणी महापालिकेतील महापौर पदाची निवड 12 फेब्रुवारीला होणार आहे. महापालिकेतील संख्याबळ 65 इतके आहे बहुमतासाठी 33 जागा आवश्यक आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 25 नगरसेवक निवडून आले आहेत तर काँग्रेसचे 12, भाजपचे 12, राष्ट्रवादी काँग्रेसचे11,जनसुराज्य शक्तीचे 3, यशवंत सेनेचा 1, इतर 1 नगरसेवक निवडून आले आहेत. याठिकाणी शिवसेना व काँग्रेसने निवडणूकपूर्व अगदी केली आहे. त्यामुळे याठिकाणी शिवसेना व काँग्रेसची सत्ता येणार आहे. मात्र, चंद्रपूरमधील घडामोडींचा परिणाम आता परभणीत गुरुवारी होत असलेल्या महापौर पदाच्या निवडणुकीत होणार का? याकडे लक्ष लागले आहे.
परभणीतील उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसच्या नगरसेवकांबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. परभणी महापालिकेतील ठाकरे शिवसेना आणि काँग्रेसचे नगरसेवक सहलीवर गेले आहेत. हे सर्व नगरसेवक गुरुवारी सकाळी परभणीत येणार आहेत. त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे. महापौर,उपमहापौर पदाच्या निवडणुकीत कुठलाही दगाफटका बसू नये म्हणून नगरसेवकांना सहलीवर पाठवण्याचा निर्णय दोन्ही पक्षाकडून घेण्यात आला आहे.
दरम्यान, या निवडीपूर्वी प्रसार माध्यमांशी बोलताना खासदार संजय जाधव म्हणाले, 'गुरुवारी ठरल्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा महापौर होणार आहे तर काँग्रेसचा उपमहापौर होईल, असा विश्वास व्यक्त केला. तर दुसरीकडे मंत्री मेघना बोर्डीकर यांनी भाजपच्या बाजूने येथील संख्याबळ नसल्याने या निवडणुकीसाठी प्रयत्न करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता काय होणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
परभणी महापालिकेत सत्ता उद्धव ठाकरे यांची शिवसेना व काँग्रेस या दोन पक्षाचीच असणार आहे. मात्र, भाजपकडून काही नगरसेवकांना संपर्क केला जात असल्याने सत्ता स्थापन करताना कुठलीही अडचण आणि दगा फटका होवू नये म्हणून दोन्ही पक्षांनी आपले नगरसेवक हे सहलीवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
आता दोन्ही पक्षाचे हे सदस्य 12 फेब्रुवारीला थेट निवडीच्या वेळेस सभागृहात पोहचणार आहेत. दरम्यान, चंद्रपूर महानगरपालिकेत महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपला मदत करणाऱ्या नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांना या निर्णयाबद्दल अंधारात ठेवल्याची माहिती आहे. आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून चंद्रपूरमधील नगरसेवकांवर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.