Leaders and elected councillors during post-election discussions as bargaining intensifies over the mayor’s post in Parbhani Municipal Corporation. Sarkarnama
मराठवाडा

Shivsena UBT News : महापौरपदावरून काँग्रेस-राष्ट्रवादीची 'बार्गेनिंग', भाजपही संधीच्या शोधात; बहुमताजवळ असलेली उद्धव ठाकरेंची सेना सावध

Parbhani Municipal Corporation Mayor : परभणी महापालिकेत महापौरपदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी बार्गेनिंग करत असताना उद्धव ठाकरे यांची शिवसेना सतर्क झाली आहे. संधी मिळाल्यास भाजप सत्तास्थापनेसाठी मोठी खेळी खेळू शकते.

Jagdish Pansare

Parbhani Municipal Corporation News : परभणी महापालिका निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस आघाडीने बहुमतासह सत्ता मिळवली. 25 जागा जिंकत शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला, तर काँग्रेसनेही 12 नगरसेवक निवडून आणत आघाडीच्या सत्तेत महत्वाची भूमिका बजावली. महापौर पदासाठीचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता काँग्रेस-राष्ट्रवादीने बार्गेनिंग सुरू केल्यामुळे उद्धवसेना सतर्क झाली आहे. ऐनवेळी दगाफटका नको, यासाठी खासदार संजय जाधव, आमदार राहुल पाटील हे सावध पावलं टाकतं आहेत.

महापालिका निवडणुकीत आघाडीला बहुमत मिळाले असले तरी सत्तेचे वाटप, महापौर पद कोणाला? याचा फॉर्मुला ठरलेला नाही. तर काँग्रेस, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसने अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे प्रथमच सत्तेच्या जवळ आलेली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला दगाफटका होण्याची शक्यता सतावू लागली आहे. त्यामुळे पक्षाचे नेते अतिशय सावधगिरी बाळगत असल्याचे चित्र आहे.

महापालिका निवडणुकीची 16 जानेवारी रोजी मतमोजणी झाल्यानंतर विविध पक्षांच्या विजेत्या उमेदवारांनी, नेत्यांनी जल्लोष केला. सत्कार सोहळे रंगले, परंतु त्यानंतर मात्र सत्ता स्थापनेसाठी फारशा हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे पुन्हा काही वेगळे शिजत आहे का? याबद्दल चर्चा सुरू आहे. महापालिका निवडणुकीत ठाकरेसेना प्रथमच सर्वांत मोठा पक्ष म्हणून समोर आला. तरी देखील त्यांना स्वबळावर सत्ता स्थापनेसाठीची मॅजिक फिगर गाठता आलेली नाही.

निवडणुकीपूर्वी त्यांनी काँग्रेससोबत आघाडी केली असली तरी निवडणूक पश्चात ही आघाडी कायम राहणार का? याविषयी तर्कवितर्क सुरू झाले आहेत. तर 12 जागांवर थांबलेली भाजपा आघाडीत बिघाडी झाली तर काही संधी मिळते का? याकडे लक्ष ठेवून आहे. सत्ता स्थापनेसाठी उद्धव ठाकरेंची सेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांत काही कुरबुरी होतात का? पदे देण्याघेण्यावरून काही वाद निर्माण होतात का? यावर पाळत ठेवली जात आहे. नव्हे तर त्यांच्या काही नगरसेवकांच्या संपर्कातही भाजपचे काही नेते असल्याचे बोलले जाते.

भाजपला थोडीही संधी मिळाल्यास संधीचे सोने करणार हे निश्चित समजले जाते. त्यासाठी कितीही सोने लुटण्याची तयारी भाजपने ठेवल्याचे बोलले जाते. महापालिकेत गेल्या आठ वर्षांपासून सत्तेबाहेर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे केवळ 11 नगरसेवक निवडून आले असले तरी त्यांनाही सत्तेत भागीदार व्हावे असे वाटू लागले आहे. ठाकरेसेनेकडे अपेक्षित संख्याबळ नसल्याची जाणीव राष्ट्रवादीला असून त्यांना सत्तेसाठी निमंत्रित करण्याची अपेक्षा आहे.

काँग्रेस किंगमेकरच्या भूमिकेत

सत्ता स्थापनेबाबत काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची भूमिका सावध असल्याचे दिसून येते. अजून चर्चा झाली नाही, चर्चेनंतर पाहू, असा सूर आता त्यांच्याकडून उमटू लागला आहे. आघाडी करताना ठाकरेसेनेने काँग्रेसच्या नाजूक परिस्थितीचा लाभ घेऊन त्यांना 28 जागा दिल्या होत्या. त्यापैकी बारा ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती झाल्या होत्या. पण निवडणुकीनंतर मात्र काँग्रेस किंगमेकरच्या भूमिकेत आली आहे.

तीघाडी होणार का?

महापालिकेत सत्ता स्थापण्यासाठी शिवसेनेबरोबरच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन सत्ता स्थापना करणार का? यावर देखील तर्कवितर्क लावले जात आहेत. राज्यात सत्तेतील राष्ट्रवादीला सोबत घेतल्यास शासनाची मदत मिळू शकते, असाही सूर काही काँग्रेस व शिवसेनेच्या नेत्यांमधून निघू लागला आहे. भाजपपेक्षा त्यांच्या काही नेत्यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी तिन्ही पक्षांचे काही नेते सकारात्मक असल्याचे बोलले जाते.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व काँग्रेस आघाडी निवडणुकीनंतर एकत्र येणार का? भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेसाठी प्रयत्न करणार का? भाजप ऑपरेशन लोटस राबवणार का? भाजप मोठ्या पक्षाच्या काही नगरसेवकांना फोडणार का? भाजप शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवणार का? का सर्व पक्ष भाजपला रोखण्यासाठी एकत्र येणार? अशा चर्चांना सध्या उधाण आले आहे.

दुसरीकडे ठाकरेसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस गटनेता निवडीसाठी निवडून आलेल्या नगरसेवकांत चाचपणी करीत आहे. कुठल्या नावावर एकमत होते, हे पाहिले जात आहे. ठाकरेसेनेत तर गटनेता, महापौर, स्थायी समिती अध्यक्षांच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसमध्येही सत्तेत गेल्यावर उपमहापौरपदासह काय-काय पदरात पाडून घ्यायचे याची चर्चा आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस गटनेत्याचे नाव निश्चित करण्यात गुंतली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT