Mahavikas Aghadi News : महापालिका निवडणुकीसाठी मतदान पार पडले, मतदारांमध्ये उत्साह दिसून आला असला तरी तो सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. परभणीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभा घेतल्या. शिवसेना-भाजप स्वबळावर लढले. तर अजितदादांच्या राष्ट्रवादीने काकांच्या राष्ट्रवादीशी युती करत मित्र पक्ष आणि आघाडीसमोर आव्हान उभे केले होते. परंतु उद्याच्या निकालात स्वबळावर लढण्याचा निर्णय शिवसेना-भाजपच्या अंगलट येण्याची चिन्ह आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस आघाडी महापालिकेत सत्ता मिळवण्याची अधिक शक्यता आहे.
यंदाच्या महापालिका निवडणुकीत राजकीय रणभूमीकडे मोठ्या उत्सुकतेने पाहिली जात आहे. स्थानिक राजकारणातील परिस्थितीचा अंदाज घेता, काँग्रेस-शिवसेना (ठाकरे) आघाडी 18 ते 20 जागा मिळवून निर्णायक ठरण्याच्या मार्गावर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला 15 ते 18 जागा मिळण्याची शक्यता असून, भाजपला 8 ते 10 जागांवर समाधान मानावे लागणार असे दिसते. स्वबळावर लढणाऱ्या शिंदेंच्या शिवसेनेलाही 7 ते 8 जागा मिळण्याची शक्यता आहे.
भाजप-शिवसेना युती फिस्कटल्याने त्याचा सर्वाधिक फायदा प्रत्यक्षात काँग्रेस-शिवसेना (ठाकरे) आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेसला होण्याची शक्यता आहे. परभणी महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत यंदा राजकीय समीकरणे महत्त्वपूर्ण बदलली दिसत आहेत. भाजप-शिवसेना (शिंदे) युती तुटल्यामुळे दोन्ही पक्षांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. महापालिकेतील पारंपरिक सत्तासमीकरणे लक्षात घेता, मतांचे विभाजन होऊन भाजप-शिवसेनेची ताकद काही ठराविक प्रभागांपुरतीच मर्यादित राहण्याची चिन्हे आहेत.
त्यामुळे या पक्षांचा प्रभाव यंदा पूर्वीसारखा राहणार नाही, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्याउलट, काँग्रेस (Congress) आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षयुती दोन्ही पक्षांसाठी पुरक ठरण्याची शक्यता अधिक आहे. या आघाडीमुळे पारंपरिक मतदारांचा एकसंघ पाठिंबा मिळण्याची शक्यता वाढली असून, थेट लढतींमध्ये ही आघाडी निर्णायक ठरू शकते. खासदार संजय जाधव आणि आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या सक्रिय प्रचारामुळे कार्यकर्त्यांत उत्साह होता.
स्थानिक पातळीवर संघटनात्मक ताकद मजबूत झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या एकत्रिकरणामुळे पक्षाची ताकद वाढली आहे. उमेदवारांची निवड, अनुभवी व माजी नगरसेवकांना संधी देणे आणि प्रभागनिहाय आखलेली रणनीती यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक भूमिका घेऊ शकतो. भाजपचे (BJP) ठराविक पाच-सहा प्रभाग वगळता, बहुतेक प्रभागांत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस-शिवसेना (ठाकरे) यांच्यात थेट लढत झाल्याचे दिसून आले.
भाजपने माजी मंत्री सुरेश वरपडूकर यांच्यावर महापालिकेची जबाबदारी सोपवली होती. पालकमंत्री मेघना बोर्डीकर याही त्यांच्यासोबत आहेत. परंतु परभणीकरांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांना दूर ठेवत विरोध काँग्रेस, शिवसेना (Shivsena-UBT) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जवळ केल्याचा अंदाज आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.