

Mucicipal Corporation News: परभणी महापालिकेचा निवडणुक प्रचार आता रंगू लागला आहे. आरोप प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण तापू लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परभणी महापालिकेतही बारामती पॅटर्नचाच प्रचार सुरू केला आहे.
बारामती-पिंपरी चिंचवडप्रमाणे परभणीचाही चेहरा मोहरा बदलण्याचा दावा या पक्षाकडून केला जात आहे. भाजप आणि इतर विरोधक मात्र परभणी महापालिकेत सत्ता असतांना तुम्हीच या शहराची वाट लावली, असा आरोप राष्ट्रवादीवर करताना दिसत आहेत.
मनपा निवडणुकीचा प्रचार रंगात आला आहे. स्थानिक भाजप नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेससह अन्य पक्षांचे नेते व त्यांच्या कार्यावर टीकेची झोड उठवली आहे. या पार्श्वभूमीवर येत्या काही दिवसात शहरात होणाऱ्या राज्य पातळीवरील नेत्यांच्या विशेषतः दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभांकडे परभणीकरांचे लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शहरात नुकतीच सभा झाली. या सभेत त्यांनी महापालिकेसाठी भविष्यातील विकासाबाबत सुतोवाच करत टिकाटिप्पणी फारशी केली नाही.
मात्र स्थानिक पातळीवरील भाजपच्या पालकमंत्र्यांसह अन्य नेते राष्ट्रवादीसह अन्य पक्षांवर टीकेची झोड उठवत आहेत. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीच्या विकासावर केलेल्या वक्तव्याचा समाचार ते घेत आहेत. त्याचबरोबर ज्या-ज्या प्रभागात भाजपच्याविरुद्ध ज्या-ज्या पक्षाचे उमेदवार आहेत त्या पक्षावर व त्यांच्या स्थानिक नेत्यांवर देखील भाजपची मंडळी तोंड सुख घेत आहेत.
राष्ट्रवादी तसेच अन्य पक्षाचे स्थानिक नेते ज्यांनी परभणीची वाट लावली तेच आता भाजपमध्ये गेल्याचे सांगत आहेत. त्यामुळे शहराचे वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शहरातील भूमिगत गटार योजना व समांतर पाणीपुरवठा योजनेला मंजुरी दिली. त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न सत्तेत असलेले तीनही पक्ष करीत आहेत. आपापल्या नेत्यांनीच हि योजना शहराला दिल्याचे सांगत आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेसचे नेते मात्र या योजनेला आमच्याच काळात मंजुरी मिळाल्याचे सांगतात. परंतु योजना महायुती सरकारने जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवली व आता कुठे निवडणूक डोळ्यासमोर धरून ही योजना जाहीर केली. आचारसंहितेनंतर घाईगडबडीत निविदा काढून आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोपही शिवसेना (यूबीटी) व काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे.
राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीतील तीनही पक्ष परभणी मनपाच्या रणसंग्रामात एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने सुरुवातीपासूनच वेगळे लढण्याची भूमिका जाहीर केली. भाजप व शिवसेनेची महायुती अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी तुटली. त्यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंद भरोसे यांनी युती तुटण्यास भाजपचे नेते सुरेश वरपूडकरांना कारणीभूत धरले. घर गड्यासाठी त्यांनी युती तोडल्याचे सांगितले. तर वरपूडकरांनीही भरोसे यांच्या आडमुठेपणामुळे युती तुटल्याचा पलटवार केला.
भरोसे यांच्या मनाविरुद्ध भाजपचे नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी शहरात केवळ प्रभाग क्रमांक 12 मध्ये शिवसेनेशी युती केल्याचे परस्परच जाहीर करून मुख्यमंत्र्यांच्या सभेत शिवसेनेच्या उमेदवारांनाही व्यासपीठावर जागा दिली. भाजपने एक प्रकारे शिवसेनेचे भरोसे यांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले. त्यामुळेही दोन्ही पक्षात तेढ वाढली आहे. अनेक प्रभागात भाजपच्या नगरसेवकांचा सामना राष्ट्रवादी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, शिवसेना व काँग्रेसशीच होत असल्याने जेथे ज्या पक्षाबरोबर लढत असल्याचे दिसते तेथे त्या-त्या पक्षाच्या नेत्यांवर जोरदार हल्ला भाजप चढवत आहे.
विरोधी पक्षाचे नेते पालकमंत्र्यांनी आपल्या कार्यकाळात महापालिकेला काय दिले? असा प्रश्न उपस्थित करीत आहेत. काँग्रेसचे नेते माजी खासदार ॲड. तुकाराम रेंगे पाटील यांनीही भाजप नेते रामप्रसाद बोर्डीकरांवर घर फोडण्याचा आरोप केला. खासदार संजय जाधव, आमदार डॉ. राहुल पाटील, माजी महापौर प्रताप देशमुख यांनीही भाजप नेत्यांवर विविध सभा-बैठकांत तोंडसुख घेतले. या वार-प्रतिवारामुळे प्रचाराला मात्र चांगलीच धार आली आहे.
महापालिका निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यानंतर शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शहरात सभा होणार आहे. त्या सभेमध्ये हे दोन्ही नेते भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या आरोपांचा कसा समाचार घेतात? हे पाहावे लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.