Parbhani News  Sarkarnama
मराठवाडा

Parbhani News : परभणीच्या राजकारणाचा 'सर्व पक्ष समभाव पॅटर्न' सत्तेसाठी सर्वच पक्षांनी केल्या तडजोडी

Parbhani political pattern all party compromise : परभणीच्या राजकारणात सत्तेसाठी वेगवेगळ्या पक्षांतील नेत्यांमध्ये तडजोडी होत असल्याची चर्चा. ‘सर्व पक्ष समभाव पॅटर्न’मुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पुन्हा चर्चेत.

Prasad Shivaji Joshi

Marathwada Politics : जगात जर्मनी आणि भारतात परभणी हे बिरूद अनेक सार्थ ठरवणाऱ्या अनेक घटना सातत्याने घडत असतात. विशेषतः राजकीय क्षेत्रामध्ये तर संपूर्ण राज्याचे लक्ष वेधणाऱ्या घटना घडत असतात. राज्यात शिवसेनेचे सर्वात प्रथम सहा खासदार निवडून आले होते, त्यावेळी त्यातील एक खासदार परभणीचे होते. शिवसेनेचा बालेकिल्ला असला तरी शिवसेना खासदारांनी पक्ष बदलण्याची परंपरा आहे. मात्र पक्ष बदलल्यानंतर त्यांचे कधीच पुनर्वसन झाले नाही हा सुद्धा इतिहास आहे.

विद्यमान खासदार संजय जाधव व आमदार डॉ.राहुल पाटील यानी मात्र उद्धव ठाकरे यांची साथ आजही सोडलेली नाही. खासदार, आमदार आणि महापौर शिवसेना उद्धव बाळसााहेब ठाकरे पक्षाचा असण्याचे राज्यातील हे एकमेव उदाहरण आहे. कारण राज्यात अन्यत्र कुठेही या पक्षाला महापौर पद मिळू शकलेले नाही. तसेच परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य मतदार संघात अकोला येथील निवासी विप्लव बाजोरिया यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आणि ते निवडूनही आले. निकाल जाहीर झाल्यानंतर परभणीकरांना त्यांचे एकदाही दर्शन झाले नाही.

विधानसभा निवडणुकीत कट्टर विरोध; पंचायत समिती समझौता

राज्यातील नगर परिषद, जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या निवडणुका झाल्या आणि नुकत्याच पंचायत समिती सभापती –उपसभापतीची निवड झाली. यानिमित्ताने सर्वच पक्षांनी सर्व पक्ष समभावचा पॅटर्न राबवला आहे. पाथरी विधानसभा निवडणुकीपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश विटेकर व शिवसेना अल्पसंख्याक आघाडीचे नेते सईद खान यांच्यात वितुष्ट निर्माण झाले होते. पाथरी नगर परिषद निवडणुकीतही दोन्ही नेत्यांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली.

अध्यक्ष पदी शिवसेना शिंदे गटाचे आसेफ खान निवडून आले आहे. तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अचानक दिलजमाई झाली आणि या ठिकाणी स्वीकृत सदस्यपदी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे मोईज अन्सारी यांची निवड झाली.

नगर परिषदेतील व्हिलन पं.स.मध्ये झाला दोस्त

पाथरी नगर परिषदेत आमने सामने असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये पंचायत समिती सभापती आणि उपसभापती निवड करताना मात्र दोस्ती झाली. सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनिता डुकरे यांची तर उपसभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन अंबुरे यांची निवड करताना काँग्रेसने खंबीर साथ दिली.

परभणी मनपा-पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीची 'उबाठा'ला साथ

परभणी महापालिका निवडणुकीत स्वतंत्र लढलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने महापौर निवड करताना 'उबाठा' पक्षाचे उमेदवार सय्यद इक्बाल यांना साथ दिली. विशेष म्हणजे महापौर निवडीसाठी राष्ट्रवादी काँग्रसे पक्षाने भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याविषयी पक्षादेश (व्हीप) बजावला होता. मात्र तो डावलून स्थानिक नेत्यांनी 'उबाठा' पक्षाच्या उमेदवारास पाठिंबा दिला.

तसेच परभणी पंचायत समिती सभापती, उपसभापती निवड करताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहकार्य कायम राहिले आणि सभापती पदी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे रवी चव्हाण यांची तर उपसभापती पदी उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे विवेक रसाळ यांची निवड झाली.

सोनपेठ नगर परिषदेत राष्ट्रवादी विरुद्ध सर्व पक्ष

पाथरी विधानसभा मतदार संघाचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर यांचे होमपीच असलेल्या सोनपेठ नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरुद्ध सर्वच पक्षांनी एकत्र येत आघाडी स्थापन केली आणि नगराध्यक्ष पदासाठी आघाडीच्या उमेदवाराने राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवाराचा पराभव केला.

जिल्हा परिषदेतही घडामोडी वाढल्या

जिल्हा परिषद अध्यक्ष व इतर पदांसाठी पुढील आठवड्यात निवड प्रक्रिया होणार आहे. सर्वात मोठा पक्ष भाजप आहे. मात्र भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी विविध पर्यायांची चाचपणी केली जात आहे. या संदर्भात बैठका, चर्चा होत आहेत. अशा पद्धतीने सत्ता मिळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी तडजोडी केल्या आहेत. परभणीचा हा सर्व पक्ष समभाव पॅटर्न जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT