

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील वाढत्या वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा विकसित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या भागातील रस्ते, पूल, मेट्रो आणि इतर वाहतूक प्रकल्पांना आवश्यक निधी देण्यात येईल आणि कोणत्याही प्रकल्पाला पैशाअभावी थांबू दिले जाणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि हिंजवडी आयटी परिसरात दिवसेंदिवस वाहतुकीचा ताण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर वाहतुकीसाठी मोठे आणि दीर्घकालीन नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे. यासंदर्भात आमदार महेश लांडगे यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना सरकारकडून या भागातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी अनेक महत्त्वाचे प्रकल्प राबवले जात असल्याची माहिती देण्यात आली.
नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले की, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निर्देशानुसार पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसर हा राज्यातील अत्यंत महत्त्वाचा औद्योगिक आणि आयटी हब बनला आहे. येथे एमआयडीसीसह अनेक मोठ्या उद्योगसंस्था आणि आयटी कंपन्या कार्यरत आहेत. त्यामुळे येथील वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने व्यापक विकास आराखडा तयार केला आहे. या नियोजनानुसार 18 मीटर आणि 24 मीटर रुंदीचे नवीन रस्ते उभारण्याचा प्रस्ताव आहे. यामध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाशी संबंधित कामे, रिंग रोड, विकास आराखड्यातील रस्ते, अंतर्गत रस्ते तसेच प्रमुख प्रवेशद्वार मार्गांचा समावेश आहे.
स्वामीनारायण मंदिर ते भुमकर पूल आणि नवले पूल परिसरातील काही कामे सुरू झाली आहेत. तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडे जाणाऱ्या अतिरिक्त सेवा रस्त्यांसाठी निविदा प्रक्रिया आणि भूसंपादन प्रक्रिया सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.
नऱ्हे ते लावण पूल उभारण्यासाठी सुमारे 3660 कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. तसेच नाशिक फाटा ते खेड या मार्गावर 8 पदरी पुलाला मंजुरी मिळाली आहे. रिंग रोड प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनासाठी सुमारे 600 कोटी रुपयांचा निधी सरकारकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
मेट्रो प्रकल्पांमध्येही लक्षणीय प्रगती होत आहे. पीसीएमपी ते फुगेवाडी, फुगेवाडी ते जिल्हा न्यायालय, जिल्हा न्यायालय ते स्वारगेट तसेच वनाज ते गरवारे कॉलेज या मार्गांवर काम सुरू आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाचे सुमारे 98 टक्के काम पूर्ण झाले आहे.
भोसरी गावठाण परिसरातील नाशिक फाटा ते आरटीओ ते जुना मुंबई-पुणे रस्ता या भागातील रस्त्यांचे 100 टक्के भूसंपादन पूर्ण झाले आहे. काही ठिकाणी प्रत्यक्ष कामालाही सुरुवात झाली आहे. भोसरी परिसरातील स्पायरल रस्त्यासाठी सुमारे 69 ते 70 टक्के भूसंपादन पूर्ण झाले आहे.
याशिवाय शहरातील वाहतूक अधिक सुरळीत करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित ट्रॅफिक सिग्नल प्रणाली आणि आधुनिक ट्रॅफिक व्यवस्थापनाचा आराखडाही तयार करण्यात आला आहे. या सर्व प्रकल्पांची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने केली जाणार असून त्यामुळे भविष्यात वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल, असा विश्वास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.