Parbhani ZP  Sarkarnama
मराठवाडा

Parbhani ZP : मराठवाड्यात भाजपला मोठा धक्का, 'ही' जिल्हा परिषद हातातून जाणार; बोर्डीकरांच्या विरोधकांची खेळी

Parbhani ZP NCP Shivsena Vs BJP : सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला जिल्हा परिषदेच्या सत्तेतून बाहेर राहावे लागण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीने शिवसेनेशी हातमिळवनी करत मंत्री बोर्डीकरांना धक्का देण्याचा प्लॅन आखला आहे.

Jagdish Pansare

Marathwada Politics News : परभणी जिल्हा परिषदेत सर्वाधिक 24 सदस्यांसह मोठा पक्ष ठरलेल्या भारतीय जनता पक्षालाच सत्तेतून बोहर ठेवण्याच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. निवडणुकीचा निकाल लागताच पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सत्तेसाठी राष्ट्रवादीला सोबत घेण्याचा प्रश्नच नाही, असे म्हणत शिवसेनेच्या पाठिंब्यावर अध्यक्ष करण्याचा निर्धार बोलून दाखवला होता.

मेघना बोर्डीकर यांच्या खेळीला वरिष्ठ पातळीवरून लगाम घालून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोबत घेण्याच्या सूचना वरिष्ठ पातळीवरून देण्यात आल्या होत्या. त्यामुळे परभणी जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता येणार हे स्पष्ट होते. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्तेबाहेर ठेवण्याच्या प्रयत्नात असलेल्या भाजपालाच आता बाहेर ठेवण्याची खेळी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि एक अपक्ष या सगळ्यांनी केली आहे.

यामुळे महायुतीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. या संदर्भात नुकतीच जिल्ह्यातील सर्वपक्षीय मेघना बोर्डीकर विरोधकांची गुप्त बैठक झाल्याची माहिती आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाला सत्तेपासून रोखण्यासाठी 15 सदस्य निवडून आलेले असताना अध्यक्ष पद शिवसेनेला देऊ केल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीचे आमदार राजेश विटेकर, माजी आमदार विजय भांबळे या कट्टर बोर्डीकर विरोधकांनी कुठल्याही परिस्थितीत भाजपला सत्तेवर बसू द्यायचे नाही, असा चंग बांधला आहे.

यासाठी सत्तेतील शिवसेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस आणि एका अपक्ष सदस्यांच्या मदतीने बहुमताची 28 ही मॅजिक फिगर गाठण्याचे ठरले आहे. राष्ट्रवादीचा हा प्रयोग यशस्वी ठरला तर तो भाजपा आणि पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्यासाठी मोठा धक्का असेल.

पक्षीय बलाबल

भाजप 24 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर शिवसेनेला पाच जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला 15, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 6, काँग्रेसला तीन तर एका जागेवर अपक्ष सदस्य निवडून आला आहे. 54 सदस्यांच्या सभागृहात सत्ता स्थापनेसाठी 28 हा आकडा बहुमतासाठी लागणार आहे.

राष्ट्रवादीला उपाध्यक्ष पद?

राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला अध्यक्ष पद देऊ करत स्वतः उपाध्यक्ष पद स्वीकारण्याची तयारी दर्शवली आहे. तर काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सभापती पद देऊन त्यांचे समाधान केले जाणार असल्याची माहिती आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवड 18 मार्च रोजी होणार असून त्या दिवशी सत्तेचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT