Parbhani Politics News : परभणी झेडपीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला बाहेर ठेवत शिवसेनेच्या मदतीने सत्ता स्थापन करण्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या खेळीला वरिष्ठ पातळीवरून लगाम घालण्यात आला आहे. राज्यात भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युती असल्याने या युती धर्माची आठवण करून देत राज्यातील नेतृत्वाने परभणी झेडपीच्या सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोबत घेण्याच्या स्पष्ट सूचना दिल्याची माहिती आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरल्यानंतर पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सत्तेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोबत घेण्याचा प्रश्नच नसल्याचे विधान केले होते. महायुतीतील मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेला सोबत घेत बहुमताचा आकडा गाठता येत असल्याने बोर्डीकर यांना राष्ट्रवादीला सत्तेतून बाहेर ठेवायचे होते. तशी तयारीही त्यांनी सुरू केली होती.
परंतु यातून जिल्ह्यात आणि राज्य पातळीवरही चुकीचा संदेश जाईल, याची काळजी घेत वरिष्ठांनी जिल्हा परिषदेच्या सत्तेत राष्ट्रवादीलाही सोबत घेण्याचे आदेश दिल्याचे समजते. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठीची समीकरणे बदलणार आहेत. परभणी झेडपीवर आता भाजप- शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीतील तिन्ही पक्षांचा झेंडा फडकणार आहे.
या युतीची चर्चा अंतिम टप्प्यात असून सत्तेचे वाटप कसे करायचे? हे देखील ठरल्याची माहिती आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत जोरदार मुसंडी मारत भाजप 24 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला. तर शिवसेनेला पाच जागा मिळाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसला 15, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 6, काँग्रेसला तीन तर एका जागेवर अपक्ष सदस्य निवडून आला आहे. 54 सदस्यांच्या सभागृहात सत्ता स्थापनेसाठी 28 ही मॅजिक फिगर आवश्यक आहे.
भाजपाला बहुमतासाठी केवळ चार सदस्यांची गरज होती. निकाल जाहीर होताच भाजप-शिवसेना युती होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, राज्य पातळीवरील सूचनांनुसार राष्ट्रवादी काँग्रेसलाही सोबत घेण्याचा निर्णय झाल्याचे समजते. त्यामुळे स्थानिक पातळीवर अनपेक्षित राजकीय समीकरणं आकार घेत आहे. सध्या सुरू असलेल्या चर्चेनुसार अध्यक्षपद भाजपकडे राहण्याची शक्यता आहे. उपाध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसला देण्याची तर सभापतीपद शिवसेनेकडे जाण्याची चर्चा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस युतीत नसती तर उपाध्यक्षपद शिवसेनेला मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र नव्या समिकरणांमुळे पद वाटपात बदल दिसून येत आहेत. जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवड 18 मार्च रोजी होणार असून त्या दिवशी सत्तेचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. तिन्ही पक्ष अधिकृत भूमिका काय घेतात, पद वाटपाचा अंतिम फॉर्म्युला काय ठरतो आणि विरोधकांची पुढील रणनीती काय असेल? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. एकूणच जिल्हा परिषदेत सत्तेचा नवा अंक रंगणार असल्याचे संकेत असून येत्या काही दिवसांत स्थानिक राजकारण अधिकच तापण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.