Parbhani News : परभणी–मुदखेड रेल्वे मार्गाच्या आधुनिकीकरणासाठी भारतीय रेल्वेकडून 163 कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पास मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पाअंतर्गत सुमारे 164 ट्रॅक किलोमीटर मार्गावर विद्यमान 1x25kV विद्युत प्रणालीचे अत्याधुनिक 2x25kV प्रणालीमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे.
यामुळे रेल्वेची कार्यक्षमता, वेग, सुरक्षितता आणि मालवाहतुकीची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार असून भविष्यात 'वंदे भारत'सारख्या आधुनिक रेल्वेगाड्यांच्या अधिक प्रभावी संचालनालाही चालना मिळणार आहे. या प्रकल्पामुळे प्रवाशांना अधिक जलद, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाचा लाभ मिळेल.
परभणीचे खासदार संजय जाधव आणि नांदेड जिल्ह्यातील भाजपाचे नेते राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांनी हा निर्णय म्हणजे मराठवाड्याच्या रेल्वे विकासाला गती देणारा महत्त्वपूर्ण असल्याची उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिली आहे.
मालवाहतुकीची क्षमता वाढल्याने उद्योग, व्यापार, शेती आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठी चालना मिळणार आहे. परभणी- मुदखेड रेल्वे मार्ग हा राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या मालवाहतूक नेटवर्कचा भाग असल्यामुळे या कामाचा फायदा केवळ आपल्या जिल्ह्यालाच नव्हे, तर संपूर्ण मराठवाडा आणि देशाच्या रेल्वे व्यवस्थेलाही होणार असल्याबद्दल खासदार संजय जाधव यांनी सांगितले.
परभणीच्या सर्वांगीण विकासासाठी रेल्वे पायाभूत सुविधांचे बळकटीकरण अत्यंत आवश्यक आहे. याबाबत मी सातत्यपूर्ण पाठपुरावा करत होतो. या निर्णयामुळे भविष्यातील विकासाला नवी दिशा मिळेल आणि प्रवासी तसेच व्यापारी वर्गाला मोठा दिलासा मिळेल, असे सांगत जाधव यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशातील रेल्वे पायाभूत सुविधांच्या आधुनिकीकरणाला आणखी एक महत्त्वपूर्ण गती मिळाली आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील परभणी–मुदखेड मार्गावरील इलेक्ट्रिक ट्रॅक्शन अपग्रेडेशन प्रकल्पासाठी 163 कोटींच्या निधीस मंजुरी मिळाल्याने मराठवाड्याच्या विकासाला नवे बळ मिळणार आहे. या दूरदृष्टीपूर्ण निर्णयासाठी देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे अशोक चव्हाण यांनी आभार मानले आहेत.
मराठवाडा रेल्वे विकासाची कासवगती हा कायम वादाचा मुद्दा राहिला आहे. नवे रेल्वे मार्ग, दुहेरीकरण, विद्युतीकरण व स्थानकांचे आधुनिकीकरण यासाठी मराठवाड्याला कायम संघर्षच करावा लागला. 2019-2024 दरम्यान, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री पद रावसाहेब दानवे यांच्या रुपाने मराठवाड्याला मिळाले होते. या काळात काही प्रमाणात मराठवाड्यातील रेल्वे विकास कामांना गती मिळाली होती. ती कायम राखण्याचा प्रयत्न नव्या सरकारमध्ये राखण्याचे प्रयत्न या भागातील लोकप्रतिनिधींकडून सुरू आहेत. याचाच परिणाम म्हणून परभणी-मुदखेड रेल्वे मार्गाच्या आधुनिकीकरणासाठी 163 कोटींच्या प्रकल्पांना मिळालेल्या मंजूरीकडे बघितले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.