Parbhani Political News : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांचे सध्या ग्रह फिरले आहेत. शिंदेसेनेच्या माजी नगरसेवकाला केलेली मारहाण, पाथरी नगरपरिषदेच्या कमर्चाऱ्यावर समर्थंकासह केलेला हल्ला या प्रकरणात दोन गुन्हे नोंद झाल्याने दुर्राणी अडचणीत सापडले आहेत. हे कमी काय म्हणून आता पाथरीतील त्यांच्या 'बाबा टाॅवर' या व्यापारी संकुलातील बेकायदेशी बांधकामाची एसआयटीकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
काही महिन्यापुर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत बाबाजानी दुर्राणी (Babajani Durani) पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात घरवापसी केली होती. अजित पवारांचा डोक्यावरील हात दूर होताच, दुर्राणी यांचे वासे फिरल्याची चर्चा या निमित्ताने परभणी जिल्ह्याच्या राजकारणात सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून महायुती आणि महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या पाथरीतील स्थानिक नेत्यांनी बाबा टाॅवर या व्यापारी संकुलातील गैरव्यवहाराचा मुद्दा नगरपरिषदेच्या बैठकांमधून उपस्थित केला होता.
यावरूनच शिंदेसेनेचे माजी नगरसेवक अलोक चौधरी आणि त्यानंतर नगरपरिषदेतील कर्मचाऱ्यावर समर्थकांसह हल्ला केल्याच्या घटना घडल्या. (NCP) या प्रकरणी एकाच आठवड्यात बाबाजानी व त्यांच्या समर्थकांवर दोन गुन्हे नोंद झाले होते. दरम्यानच्या काळात बाबाजानी दुर्राणी यांनी आष्टी येथे जाऊन भाजपाचे आमदार सुरेश धस यांचीही भेट घेतली होती. या भेटीची चर्चा होत असतानाच विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बाबाजानी दुर्राणी यांच्या व्यापारी संकुलाची एसआयटी चौकशीचे आदेश देण्यात आले.
काय आहे बाबा टाॅवर प्रकरण?
माजी आमदार बाबाजाणी दुर्रानी यांच्या बाबा टॉवर व्यापारी संकुलातील बेकायदेशीर बांधकाम तसेच विविध प्रकरणांची विशेष तपास पथक (एसआयटी) मार्फत चौकशी करण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी (ता.25) विधानसभेत केली. काँग्रेस आमदार साजिद पठाण यांनी अधिवेशनात लक्षवेधी मुद्दा उपस्थित केल्यानंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यात आला.
पाथरी बस स्थानकाच्या शेजारी असलेल्या सर्वे नं. 9/01 मधील गृहनिर्माण संस्थेच्या जागेत नियमांकडे दुर्लक्ष करून मोठ्या प्रमाणावर फेरफार करत व्यापारी संकुल उभारण्यात आले. या प्रकरणात 2015 मध्ये प्रथम तक्रार दाखल झाली होती. तत्कालीन उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील यांनी केलेल्या चौकशीत हे बांधकाम बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी 8 जुलै 2015 रोजी परभणी जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल सादर करत संबंधित संस्था अध्यक्ष, सचिव आणि मुख्याधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस केली होती.
यानंतर 2022 मध्ये शासनाच्या आदेशानुसार विभागीय आयुक्तांनी या प्रकरणाची पुन्हा चौकशी केली. पुढे 16 जानेवारी 2023 रोजी अप्पर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या अहवालात बाबा टॉवर संकुलाने नगर परिषदेकडून कोणतीही परवानगी न घेता सर्व्हिस रोड आणि ओपन स्पेसवर अतिक्रमण करत बेकायदेशीर 15 दुकाने उभारल्याचे स्पष्ट करण्यात आले. हा अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला असला तरी कोणतीही ठोस कारवाई झाली नव्हती. या प्रकरणात सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने अखेर अकोला येथील काँग्रेस आमदार साजिद पठाण यांनी आज अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला.
त्यांच्या मागणीला प्रतिसाद देत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बाबा टॉवर प्रकरणासह एकूण 30 प्रकरणांची एसआयटी चौकशी होईल, अशी घोषणा केली. माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या विरोधात केवळ बाबा टॉवर प्रकरणच नाही, तर नगरविकास, महसूल, पोलीस आणि इतर विभागांतर्गत असलेल्या 30 प्रकरणांची चौकशी एसआयटी मार्फत करण्यात येईल, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले. या निर्णयामुळे पाथरीसह परभणी जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या या प्रकरणांवर आता ठोस कारवाई होणार आहे.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.