Babajani Durrani Vs Saeed Khan Sarkarnama
मराठवाडा

Babajani Durrani Vs Saeed Khan : पाथरीत 243 कोटींच्या कथित भ्रष्टाचारावरून रणकंदन; सईद खानांचा दुर्राणींना तुरुंगाचा इशारा

Pathri Politics Erupts Over Rs 243 Crore Corruption Allegation : नगरपरिषदेवरील 35 वर्षांच्या सत्ताकाळात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा दावा; प्रकरणाचे पुन्हा ऑडिट आणि चौकशी होणार असल्याचे आमदार सईद खान यांचे वक्तव्य

Pradeep Pendhare

Pathri municipal council controversy : पाथरीतील राजकीय संघर्ष आता अधिक तीव्र झाला असून, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार सईद खान आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्यात आरोप-प्रत्यारोपांची लढाई चांगलीच रंगली आहे.

दुर्राणी गटाच्या नगरपरिषदेवरील तब्बल 35 वर्षांच्या सत्ताकाळाचा हिशोब मांडताना आमदार खान यांनी 243 कोटी रुपयांच्या कथित भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणाची पुन्हा चौकशी आणि ऑडिट होईल, तसेच या प्रकरणात दुर्राणी यांना तुरुंगात जावे लागू शकते, असा दावा खान यांनी केला आहे.

पाथरी नगरपरिषदेवर मागील सुमारे 35 वर्षे काँग्रेसचे (Congress) माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या गटाचे वर्चस्व राहिले. याच कालावधीत मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत आमदार सईद खान यांनी थेट 243 कोटी रुपयांचा आकडा जाहीर केला आहे.

खान यांनी दावा केला की, या कथित भ्रष्टाचाराशी संबंधित पुरावे आपल्याकडे असून, हा मुद्दा आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडेही मांडला आहे. नगरपरिषदेच्या मागील कारभाराचे पुन्हा ऑडिट करून संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

‘भ्रष्टाचाराचा हिशोब द्यावाच लागेल’

दुर्राणी गटाच्या सत्ताकाळातील आर्थिक व्यवहारांची चौकशी झाल्यास अनेक बाबी समोर येतील, असा दावा सईद खान यांनी केला. या कथित गैरव्यवहाराची चौकशी झाल्यानंतर जबाबदार व्यक्तींवर कारवाई होईल आणि दुर्राणी यांनाही त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा त्यांनी दिला. खान यांच्या या आरोपांमुळे पाथरीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत दुर्राणी गटाने सत्ताधारी शिवसेनेवर आणि प्रशासनावर गंभीर आरोप केले होते.

आधी दुर्राणींचा शिवसेनेवर निधीचा आरोप

बाबाजानी दुर्राणी यांनी केंद्र सरकारकडून शहरातील दिवाबत्ती आणि स्वच्छतेसाठी मिळालेल्या 8 कोटी 14 लाख रुपयांच्या निधीचा हिशोब कुठे आहे? असा सवाल उपस्थित केला होता. नगराध्यक्ष, सत्ताधारी शिवसेना आणि मुख्याधिकारी यांच्यावर केंद्राचा निधी हडप केल्याचा आरोपही दुर्राणी गटाने केला होता.

आमदार खान यांचा 243 कोटींचा भ्रष्टाचाराचा आरोप

या आरोपांनंतर दुर्राणी गटाने नगरपरिषदेच्या सभागृहात आक्रमक भूमिका घेत ठिय्या आंदोलन केले. परिस्थिती तणावपूर्ण झाल्यानंतर पोलिसांनाही हस्तक्षेप करावा लागला. त्यानंतर आता आमदार सईद खान यांनी दुर्राणी यांच्यावर थेट 243 कोटी रुपयांच्या कथित भ्रष्टाचाराचा आरोप करत राजकीय संघर्षाला नवे वळण दिले आहे.

पाथरीत आरोप-प्रत्यारोपांची लढाई तीव्र

एकीकडे दुर्राणी गटाकडून सत्ताधारी शिवसेना आणि नगरपरिषद प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे, तर दुसरीकडे आमदार सईद खान यांनी दुर्राणी यांच्या 35 वर्षांच्या राजकीय आणि नगरपरिषद सत्ताकाळावरच गंभीर आरोप केले आहेत.

दुर्राणी कोणता पलटवार करणार

या परस्पर आरोपांमुळे पाथरीतील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत. आता 243 कोटी रुपयांच्या कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांवर दुर्राणी यांची भूमिका काय असणार आणि या प्रकरणात प्रत्यक्ष चौकशी किंवा ऑडिटची प्रक्रिया सुरू होते का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT