Shivsena-Congress News : पाथरी नगरपालिकेवर तब्बल पस्तीस वर्ष एकहाती वर्चस्व राखलेल्या माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांचे संस्थान शिवसेनेचे सईद खान यांनी अखेर खालसा केलेच. गेल्या दोन वर्षापासून पाथरीत दुर्राणी विरुद्ध सईद खान यांच्यात अनेकदा संघर्षाचा भडका उडाला. प्रकरण हाणामारी आणि पोलीसांत गुन्हे दाखल होण्यापर्यंत गेले. नगरपालिका निवडणुक प्रचारातही दुर्राणी-खान समर्थक एकमेकांना भिडले होते. त्यामुळे पाथरीतील या हाय व्होलटेज लढतीत कोण बाजी मारणार? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते.
काल निकाल जाहीर झाल्यांतर अखेर शिवसेनेचे सईद खान हे बाबाजाणी दुर्राणी यांच्यावर भारी पडल्याचे स्पष्ट झाले. पालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस व शिवसेनेत झालेल्या अटीतटीच्या लढतीत शिवसेनेचे आसेफखान यांनी 436 मतांनी विजय मिळवला. माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या पस्तीस वर्षाच्या राजवटीला यामुळे सुरुंग लागला. शिवसेनेचे नेते सईदखान यांनी दुर्राणी यांना मात देत आपले राजकीय वर्चस्व सिद्ध केले.
मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर प्रभाग एक, दोन व तीन मधून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे प्रत्येकी दोन - दोन नगरसेवक निवडून आले. त्यानंतरच्या मतमोजणीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मागे पडला. 23 पैकी काँग्रेसचे 12, शिवसेनेचे 09 तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 02 नगरसेवक निवडून आले. मतमोजणीत नगराध्यक्षपदाचे काँग्रेसचे उमेदवार जुनेद खान दुर्राणी व शिवसेनेचे आसेफखान यांच्यात अटीतटीची लढत झाली.
पहिल्या व दुसऱ्या फेरीअखेर काँग्रेसचे जुनेद खान 682 मतांनी आघाडीवर होते. त्यानंतर शिवसेनेचे आसेफखान तिसऱ्या फेरीत 93 चौथ्या फेरीत 19 पाचव्या फेरीत 123 तर शेवटच्या सहाव्या फेरीत 436 मतांची आघाडी घेत विजयी झाले. त्यांना 10626 तर जुनेद खान दुर्राणी यांना 10190 मते मिळाली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार माजी नगराध्यक्ष मोईज अन्सारी यांना 5372 मते मिळाली.
माजी आमदार बाबाजाणी दुर्राणी यांच्या पॅनेलमधून गतवर्षी निवडून आणलेले अनेक नगरसेवक यंदाच्या निवडणुकीत पराभूत झाले. अखेरच्या टप्प्यात लक्ष्मी दर्शनाचा मोठ्या प्रमाणावर वापर झाल्याची चर्चा पाथरीत रंगली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार राजेश विटेकर यांनी पाथरीची निवडणुक प्रतिष्ठेची केली होती, परंतू त्यांना मोठा पराभव स्वीकारावा लागला.
गेल्या पस्तीस वर्षांपासून पालिकेवर माजी आमदार बाबाजानी दुराणी यांची एकहाती सत्ता होती, पैकीच्या पैकी उमेदवार निवडून आणून त्यांनी महाराष्ट्रात एक वेगळी ओळख निर्माण केली होती. 2021 ते 2025 या कालावधीत पालिकेवरील प्रशासक काळात नागरिकांशी झालेला दुरावा पस्तीस वर्षाच्या एकहाती सत्तेपासून दुर्राणी यांना दूर नेणारा ठरला.
पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) मोठ्या प्रमाणावर असलेल्या अन्सारी बिरादरीचे माजी नगराध्यक्ष मोईज अन्सारी यांना उमेदवारी देऊन पहिल्यापासूनच अन्सारी असा प्रचार केला. त्याचा उलटा परिणाम इतर मतांवर झाल्याचे निकालातून स्पष्ट दिसून आले. अन्सारी बहुल प्रभागातूनही मोईज अन्सारी यांना पाहिजे तसे मतदान मिळाले नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.