Beed, 31 May : बीड जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता गंभीर झाली आहे. पिके, फळबागा पाण्याअभावी जळून खाक होत आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरु आहे. सातशेंवर गावांतील आठ लाख नागरिकांची भिस्त टँकरच्या पाण्यावर आहे. अशा जिल्ह्यातील गंभीर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कृषिमंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे भ्रमणध्वनी माध्यम प्रतिनिधींसमोरच ट्राय केले. मात्र, दोघेही नॉट रिचेबल होते.
बीड (Beed) जिल्ह्यात यंदा तीव्र दुष्काळी परिस्थिती आहे. सातशेंवर गावांत टँकरने पाणी पुरवठा होत आहे. मोसंबीच्या बागा, रेशीम शेतीसाठीच्या तुतींची झाडे पाण्याअभावी जळून खाक झाली आहेत. माणसांच्या व जनावरांच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे. याची पाहणी करण्यासाठी शुक्रवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) बीड जिल्ह्यात आले होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पटोले यांनी माजी मंत्री अशोक पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, महेश बेदरे यांच्यासह गेवराई तालुक्यातील रेशीम हब अशी ओळख असलेल्या रुई गावातील जळालेल्या तुती बागांची पाहणी केली.
काँग्रेसला दुष्काळाचे राजकारण करायचे नाही. मात्र, शेतकऱ्यांच्या वेदना सरकारला कळवायच्या आहेत. शेतकऱ्यांना मदत मिळवून देणे व त्यांना दिलासा देणे हा हेतू आहे. रेशीम उत्पादकांना सरकारने प्रोत्साहन देण्याऐवजी त्यांना दाबण्याचे काम सरकार करत आहे. भाजपप्रणित सरकार शेतकऱ्यांची चेष्टा करत असल्याचा गंभीर आरोपही नाना पटोले यांनी केला.
लोक तडफडून मरत आहेत, भयानक परिस्थिती आहे. शेतकरी चिंतेत आहेत, नुकसान होत आहे. मात्र, शेतकऱ्यांनी चुकीचे पाऊल उचलू नये, असे आवाहनही नाना पटोले यांनी केले आहे. बँका शेतकऱ्यांना कर्ज द्यायला तयार नाहीत. खत-बियाणांचा काळाबाजार होत आहे. सगळी परिस्थिती सरकार शेतकऱ्यांवरच का आणत आहे, असा सवाल करत टँकर माफिया तयार करू नका, जनतेची तिजोरी लुटू नका, असा इशाराही नाना पटोले यांनी सरकारला दिला.
दरम्यान, बीडमधील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करताना येथील दाहकता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना सांगण्यासाठी नाना पटोले यांनी या दोघांनाही फोन लावला. मात्र, मुख्यमंत्री आणि कृषिमंत्री मुंडेंचा फोन नॉट रिचेबल लागला. त्याची चर्चा पटोलेंच्या बीड दौऱ्यात रंगली होती.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.