शितल वाघमारे
Political News : महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या खजिन्यावर दरोडा पडला. मात्र, जिल्ह्यातील एकाही लोकप्रतिनिधींनी सभागृहात त्याबाबत वाच्यता केली नाही. धाराशिव जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या धाराशिव नगरपालिकेच्या भ्रष्टाचाराच्या आकड्यांनी सामान्यांना तोंडात बोट घालावे लागले. तर मराठवाड्यात ख्याती असलेल्या तेरणा कारखान्याचा बॉयलर परत पेटला, ही आश्वासक बाब आहे. उस्मानाबादचे नाव धाराशिव झाले. परंतु सोयी-सुविधांच्या नावाने 'जैसे थे' परिस्थिती आहे.
धाराशिव जिल्ह्याने 2023 या सरत्या वर्षात अनेक धक्कादायक राजकीय घडामोडी अनुभवल्या आहेत. काही घडामोडींनी जिल्ह्याच्या नावलौकीक मिळविला. तर काही घडामोडींनी राज्याच्या नकाशावर जिल्ह्याच्या नावाला धक्का लागला.
ढोकी येथील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना (Terna Sugar Factory) हा जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू होता. मागील काळात तेरणा कारखाना बंद पडला आणि ढोकीचे सत्ताकेंद्र संपुष्टात आले.राज्याचे आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत (Tanjai sawant) यांच्या भैरवनाथ शुगरने तेरणा कारखाना ताब्यात घेतला आणि कमी कालावधीत सुरूही केला. त्यामुळे या परिसरातील राजकीय घडामोडींवर तेरणा कारखाना व परिसरावर प्रा. तानाजी सावंत यांचा दबदबा राहणार यात शंका नाही.
धाराशिव-कळंब विधानसभा मतदारसंघात सर्वात मोठे शहर म्हणजे जिल्हा मुख्यालय. या जिल्हा मुख्यालयाचा कारभार हाकणार्या पालिका प्रशासनातील भ्रष्टाचाराने शहराच्या अब्रूची लक्तरे राज्याच्या राजधानीपर्यंत पोहोचली. पालिकेेचे तत्कालीन मुख्याधिकारी हरिकल्याण येलगट्टे, तत्कालीन लेखाधिकारी सुरज बोर्डे जेलची हवा खात आहेत. या अधिकार्यांनी पदाधिकार्यांना अंधारात ठेवून वेगवेगळ्या बँकेत 125 पेक्षा अधिक खाती उघडली. याचा तपास होणे बाकी आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळातून या गोंधळाबद्दल कोणीच बोलत नाही. पोलीस तपासात पडद्यामागील अनेक सूत्रधार समोर येतात की, दडवले जातात, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.
येणार्या नगरपालिका निवडणुकीत हा कळीचा मुद्दा ठरणार, यात शंका नाही. जिल्ह्याच्या राजकारणात छुटपुटची नुराकुस्ती सोडली तर कधीही खूप काही घडले नव्हते. परंडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत हवेत गोळीबार, तलवारीचा धाक दाखवून सदस्यांची पळवापळवी जिल्ह्याच्या राजकारणाला गालबोट लावून गेली. त्यावरून जिल्ह्याच्या राजकारणाचा बिहार होतो, अशी महाविकास आघाडीच्या पदाधिकार्यांनी ओरड केली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
परंडा कृषी उत्पन्न बाजार समितीतील बंदूक व तलवारबाजी ही रंगीत तालीम असेल आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा हा मतदारसंघ आहे.
उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण झाले. अगदी जिल्ह्याच्या प्रमुख अधिकार्यांसह सर्वांनी ढोल वाजवले. मात्र सर्वसामान्यांच्या निगडीत असलेल्या प्रमुख प्रश्नांची स्थिती आहे, तशीच आहे. आजही जिल्ह्यात काही गावे आणि शहरात महिन्यातून दोन ते तीनवेळा पाण्याचा पुरवठा होतो.
भल्याबुर्या राजकीय घडामोडींनी सरते वर्ष गाजले
महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या खजिन्यावर दरोडा पडला. मात्र, जिल्ह्यातील एकाही लोकप्रतिनिधींनी सभागृहात त्याबाबत वाच्यता केली नाही, अशा अनेक भल्याबुर्या राजकीय घडामोडींनी सरते वर्ष गाजले आणि नव्या वर्षाच्या उंबरठ्यावर जिल्हा येवून थांबला आहे. येणारे वर्ष निवडणुकीचे आहे. उस्मानाबादचे धाराशिव नामकरण झालेल्या जिल्ह्याला आगामी निवडणुकीची रणधुमाळी नक्की कोणते चित्र दाखविणार याची वाट पहावी लागेल.
Edited by: sachin Waghmare