Maratha-Obc Reservation News : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाला यश मिळाले. हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा जीआर सरकारने काढला, त्यानूसार नोंदीचा आधार घेत मराठा कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करण्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या निर्णयावरून ओबीसी समाजामध्ये प्रचंड रोष आहे.
ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ यांनी या जीआरच्या विरोधात न्यायालयात धाव घेण्याची तयारी केली आहे. तर वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनीही सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शवत मराठा आणि ओबीसीचं ताट वेगळं असलं पाहिजे, अशी भूमिका मांडली आहे. सरकारचा निर्णय आपल्याला अजिबात पटलेला नाही. सरकारने घेतलेला निर्णय हा कायद्याला धरून नसल्याचे आंबेडकर म्हणाले.
मुंबईतील आझाद मैदानातील आंदोलनाला यश मिळाल्यानंतर मराठा समाजाकडून सर्वत्र गुलाल उधळला जात आहे. तर याच समाजातील काही अभ्यासक हैदराबाद गॅझेटमुळे एकाही मराठ्याला आरक्षणाचा (Maratha Reservation) लाभ मिळणार नाही, अशी टीका करत आहेत. तर दुसरीकडे ओबीसी नेत्यांनी मात्र सरकारच्या जीआरमुळे ओबीसी आरक्षण संपुष्टात आल्याचा आरोप करत रस्त्यावर आणि न्यायालयात लढण्याची तयारी सुरू केली आहे. वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करत ते गरीब मराठा समाजावर अन्याय करत आहेत, ते श्रीमंत मराठ्याचा लढा लढत असल्याचे म्हटले होते.
आता सरकारच्या हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णयावरही आंबेडकर यांनी आपली परखड भूमिका मांडली. छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सरकारने कायद्याला धरून निर्णय घेतला नाही, असे आपण म्हणालो होतो. ओबीसी आणि मराठा यांचे ताट वेगळे असले पाहिजे, असे सांगतानाच संभाजीनगर खंडपीठाच्या जजमेंटचा दाखलाही दिला. सर्व मराठा समाजाला ओबीसी म्हणून संबोधता येत नाही असे त्यात नमूद करण्यात आले होते आणि त्यावर सुप्रीम कोर्टातही शिक्कामोर्तब झाले असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी नमूद केले.
निझामी मराठा जो सत्तेत बसलेला आहे, त्याला गरीब मराठा आणि ओबीसीमध्ये भांडण लावायचे आहे. निझामी मराठा हे सर्व सत्तेत आहेत ते ओबीसी आणि मराठामध्ये भांडण लावतात. सरकारने जे सर्व मराठा ओबीसी आहेत, ही भूमिका घेतली आहे, त्याला ओबीसी विरोध करत आहेत. भाजपने एका दगडात अनेक पक्षी मारले आहेत. आरक्षण असूच नये असे, गोंधळ यातून घालायला सुरवात केल्याचा आरोपही आंबेडकर यांनी केला.
ओबीसींनी राजकीय धोका ओळखावा..
भारतय जनता पक्ष ओबसी आमचा डीएनए असल्याचे सांगत आहे, पण प्रत्यक्षात ओबीसींनी भाजप आपला सर्वात मोठा शत्रू समजते. ओबीसींनी देखील हे समजून घेतलं पाहिजे. मंडल कमिशन वाचवणे आता ओबीसींच्या हातात आहे. त्यांनी राजकीय अस्तित्व प्रस्थापित केले पाहिजे दोन-चार ओबीसी जिल्हा परिषदेला निवडून येण्यापेक्षा, सर्व बॉडी ओबीसी कशी निवडून येईल, असे प्रयत्न केले पाहिजे. ओबीसींना राजकीय धोका ओळखला पाहिजे, असा सावधानतेचा इशाराही प्रकाश आंबेडकर यांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.