Beed Politics : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके हे गेल्या काही दिवसापासून चांगलेच चर्चेत आहेत. त्याचे कारण त्यांनी केलेली राजकीय संन्यासाची घोषणा. 2029 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणूकीत आपण उमेदवार नसणार, माझ्याऐवजी पुतणे जयसिंह सोळंके हे उमेदवार असतील, असे सोळंके यांनी नुकतेच जाहीर केले. दरम्यान, आपण 2029 मध्ये निवृत्त होणार आहोत. अजून अडीच वर्ष बाकी आहेत, त्यामुळे मंत्रीपदाची संधी मिळाली तर निश्चित घेईल, असे सांगत सोळंके यांनी आपल्या मंत्रीपदाची सुप्त इच्छा बोलून दाखवली.
सोळंके यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीपुर्वी अशीच घोषणा करत पुतण्याला उमेदवारी देणार असल्याचे जाहीर केले होते. परंतु ऐनवेळी ते स्वतः उभे राहिले आणि निवडून आले. त्यामुळे आता दुसऱ्यांदा त्यांनी राजकीय निवृत्तीची घोषणा केल्यानंतर तुम्हीच पुन्हा लढा, असा आग्रह त्यांच्या समर्थकांकडून सुरू झाला आहे. यावर मी आता ७२ वर्षांचा आहे, २०२९ मध्ये पंच्याहत्तर वर्षांचा होईल. त्यामुळे लोकांची इच्छा असली तरी माझे वय आणि शारिरीक क्षमता पाहता मला वेळ देणे शक्य होणार नाही.
लोकांची काम करण्यासाठी वेळ देता येणार नसेल, शरीर साथ देणार नसेल तर काय उपयोग? म्हणून आपण पुढील विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे, असे सोळंके म्हणाले. परंतु निवृत्तीला आणखी अडीच वर्ष असल्याने दरम्यानच्या काळात मंत्रीपदाची संधी मिळाली तर निश्चित घेऊ, असे सोळंके (Prakash solnke) यांनी सांगितले. बीड जिल्ह्याला मंत्रीपद देताना ते विशिष्ट वर्गालाच मिळते, अशी टीका करत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती.
आता थेट मंत्रीपद मिळाले तर आपण निश्चित संधी घेऊ, असे सांगत आपण अजूनही आशावादी व शर्यतीत कायम असल्याचे सोळंके यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या विलिनीकरणाच्या तसेच राज्यमंत्रीमंडळ फेरबदल, विस्ताराच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. परळीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या नावाची चर्चा नव्याने सुरू झाल्यानंतर प्रकाश सोळंके यांनी विशिष्ट वर्गासाठीच बीड जिल्ह्यातील मंत्रीपद आहे का? असा सवाल करत अप्रत्यक्षरित्या मुंडे यांच्या नावाला विरोध दर्शवल्याचे बोलले जाते.
१५ नोव्हेंबर २०२६ रोजी माजलगाव मतदारसंघातील एका विकासकामाच्या भूमिपूजन कार्यक्रमात बोलताना आमदार प्रकाश सोळंके यांनी आपल्या राजकीय भविष्याबाबत स्पष्ट भूमिका मांडली. आगामी विधानसभा निवडणुकीत आपण स्वतः उमेदवार म्हणून जनतेसमोर येणार नाही. त्याऐवजी आपले पुतणे जयसिंह सोळंके यांना कुटुंबाकडून आणि पक्षाकडून उमेदवारी दिली जाईल, असे त्यांनी जाहीर केले. जयसिंह यांना पाठिंबा देण्याचे आवाहनही त्यांनी उपस्थित कार्यकर्ते आणि नागरिकांना केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.