Marathwada Graduate Constituency : गेल्या दोन वर्षांपासून शिक्षकांच्या मुख्यालयी राहण्याच्या मुद्द्यावरून भाजपचे आमदार प्रशांत बंब आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांच्यात राजकीय संघर्ष सुरू आहे. एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी दोन्ही नेत्यांकडून सोडली जात नाही. मात्र, सोमवारी या संघर्षाला वेगळे वळण मिळाले.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून सतीश चव्हाण यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या अर्ज दाखल करण्यासाठी भाजपचे आमदार प्रशांत बंब स्वतः उपस्थित होते. एवढेच नव्हे तर बंब यांनी चव्हाण यांच्याशी हस्तांदोलनही केले. त्यामुळे दोन्ही नेत्यांमधील राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर बंब यांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे.
यावेळी बोलताना बंब यांनी चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मी हजर राहणे हे माझे कर्तव्य आहे, म्हणून मी आलो, असे सांगितले. आमच्यामध्ये असलेला वाद आणि आजचा प्रसंग या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत, असेही बंब यांनी स्पष्ट केले.
या पार्श्वभूमीवर सतीश चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतांना बंब उपस्थित राहणार की नाही? याबद्दल उत्सूकता होती. परंतू बंब यांनी या प्रसंगी हजेरी लावत सतीश चव्हाण यांच्यांशी हस्तांदोलन केले. विजय संकल्प मेळाव्याला ते हजर राहिले नसले तरी उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांची उपस्थिति चर्चेचा विषय ठरत आहे.
सतीश चव्हाण यांची अधिकृत उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी आमदार प्रशांत बंब यांनी आपल्या मतदारसंघातील एका पत्रकार परिषदेत सतीश चव्हाण यांनी अठरा वर्षात काय केले? याची श्वेतपत्रिका काढा, असे आवाहन दिले होते. तसेच सतीश चव्हाण यांची आमदार होण्याची लायकीच नाही, त्यांना घरी बसवा, असे म्हणत बंब यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. या टीकेला सतीश चव्हाण यांनी आज झालेल्या विजय संकल्प मेळाव्यातून उत्तर दिले. मी अठरा वर्षात काय केले? हे विचारणाऱ्यांना मी ही पुस्तिका पाठवून देणार आहे, असा टोला चव्हाण यांनी बंब यांचे नाव न घेता लगावला.
2024 मध्ये सतीश चव्हाण यांनी गंगापूर-खुलताबाद विधानसभा मतदारसंघातून प्रशांत बंब यांच्याविरोधात निवडणूक लढवण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मात्र त्यांचा हा प्रयोग फसला आणि बंब यांनी त्यांचा पराभव केला होता. तेव्हापासून बंब आणि चव्हाण यांच्यातील राजकीय संघर्षाला अधिकच धार चढली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर आज मात्र प्रशांत बंब यांनी सतीश चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना हजेरी लावत पक्षादेश पाळल्याची चर्चा होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.