Manoj Jarange Patil & Dr. Radhakrishna vikhe Patil Sarkarnama
मराठवाडा

Maratha Kunbi Certificate: कुणबी प्रमाणपत्र मिळवताना येणाऱ्या अडचणींवर राज्य सरकारचा मोठा निर्णय : मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात उच्चाधिकार समिती

Radhakrishna Vikhe Patil meets News : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्य सरकारने मराठा समाजाला कुणबी जातीचीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयाची माहिती व लेखी पत्रही दिले.

Jagdish Pansare

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण पाटोदा येथे जाऊन मागे घ्यायला लावण्यात यशस्वी झालेले मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शनिवारी त्यांची छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात जाऊन भेट घेतली. उपोषण स्थगित केल्यानंतर जरांगे पाटील यांच्यावर संभाजीनगरमध्ये उपचार सुरू आहेत. विखे पाटील-जरांगे पाटील यांच्यावर सध्या विरोधक तुटून पडलेले असताना विखे पाटलांनी घेतलेल्या या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

दरम्यान, या भेटीत विखे पाटील यांनी राज्य सरकारने मराठा समाजाला कुणबी जातीचीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयाची माहिती व लेखी पत्रही दिले. माध्यमांनाही विखे पाटील यांनी या निर्णयाची माहिती दिली. त्यानुसार मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी स्तरावर मराठा आरक्षणासाठी कुणबी जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी येणाऱ्या अडचणी, जुन्या नोंदी आणि आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र उच्चाधिकार समिती स्थापन करण्यात येणार आहे. राज्य सरकारने याआधी विभागीय स्तरावर एसओपी तयार केली आहे.

जुनी कागदपत्रे आणि नोंदी शोधण्यात अनेक अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे प्रमाणपत्रांचे वाटप करता येत नव्हते. यावर सरकारने कायमस्वरुपी काढण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी स्तरावर मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात एक विशेष समिती स्थापन करण्यात येणार आहे.

या समितीला कुणबी जात प्रमाणपत्राबाबत आवश्यक अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठीची कागदपत्रे, त्यासंदर्भातील नोंदी सहज उपलब्ध होतील, असा दावा विखे पाटील यांनी केला आहे. या सर्व प्रक्रिया करून याचा शासन निर्णय देखील लवकरच काढणार असल्याचे त्यांनी सांगितले.

काळजी घ्या, सगळं ठरल्याप्रमाणे होईल..

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांना तुम्ही आपल्या तब्येतेची काळजी घ्या, ठरल्याप्रमाणे सगळं होईल, असा विश्वासही विखे पाटील यांनी दिला. तसेच जरांगे पाटील यांच्या प्रकृतीबद्दल त्यांनी डाॅक्टरांशीही चर्चा केली. जरांगे पाटील यांना प्रचंड अशक्तपणा आला होता, परंतु आता त्यांच्या तब्येतीत सुधारणा असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT