bjp, shivsena meeting  Sarkarnama
मराठवाडा

Dharashiv Politics : धाराशिव झेडपीतील सत्तास्थापनेचा तिढा सुटला: तानाजी सावंतांच्या भूमिकेबाबत सस्पेन्स, शिंदे समजूत काढणार?

Tanaji Sawant faction reaction News : भाजपसोबत सहलीवर गेलेले शिवसेनेचे दोन सदस्य घेऊन भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यामुळे आता झेडपीचा अध्यक्ष महायुतीचा होणार हे फायनल झाले आहे.

सरकारनामा ब्युरो

Dharashiv News : धाराशिव जिल्हा परिषदेत महायुतीकडे बहुमत असल्याने सत्तास्थापनेचा तिढा सुटला आहे. येत्या काळात जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व पदाधिकारी महायुतीचे होणार आहेत. गेल्या दोन दिवसातील राजकीय घडामोडी पाहता आता सत्तास्थापनेच्या घडामोडीना वेग आला आहे. भाजपसोबत सहलीवर गेलेले शिवसेनेचे दोन सदस्य घेऊन भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यामुळे आता झेडपीचा अध्यक्ष महायुतीचा होणार हे फायनल झाले आहे.

आता फक्त सत्तास्थापनेच्या फॉर्म्युल्यावर भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सोमवारी स्थानिक पातळीवर चर्चा होणार आहे. त्यामध्ये फॉर्म्युला ठरणार आहे. दुसरीकडे शिवसेनेतील तानाजी सावंत गटाने दोन जिल्हा परिषद सदस्य भाजपसोबत सहलीवर गेल्याने नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे आता तानाजी सावंत काय भूमिका घेणार यावरून सस्पेन्स कायम आहे.

गेल्या 20 दिवसापासून धाराशिव जिल्हा परिषद सत्ता स्थापनेबाबत शिवसेना-भाजप महायुतीमध्ये पेच निर्माण झाला होता. भाजप (BJP) विरोधी गटाने दोन्ही शिवसेना एकत्र येत सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु केल्या होत्या. मात्र, सत्तासमीकरणाचे गणित जुळवताना अडचणी येत होत्या. त्यातच आता भाजपसोबत सहलीवर गेलेले शिवसेनेचे दोन सदस्य घेऊन भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक, शिवसेनेचे संपर्कप्रमुख राजन साळवी, शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले, अपक्ष निवडून आलेले आमदार तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंतही उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे यापूर्वीच शिवसेनेतील तानाजी सावंत गटाने दोन जिल्हा परिषद सदस्य भाजपसोबत सहलीवर गेल्याने आक्षेप नोंदवला होता. त्या दोन्ही सदस्यांनी यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. धाराशिव जिल्ह्यातील आठ पंचायत समितीच्या सभापती निवड अगोदर होणार, त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष पदाबाबत अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती आहे. जिल्हा प्रशासनाकडून जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 6 मार्चला पंचायत समिती सभापती निवड, तर 13 मार्च जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीसाठी बैठक होणार आहे. त्यामुळे आता हालचालींना वेग आला आहे.

एकनाथ शिंदे यांच्या भेटीवेळी महायुतीमधील सर्व नेतेमंडळीत सत्तास्थापनेबाबत एकमत झाले. यावेळी शिंदे यांनी महायुतीमधील तीन मित्र पक्षांना एकत्र बसून सत्तास्थापनेचा फॉर्म्युला ठरविण्यास सांगितले आहे. सोमवारी स्थानिक पातळीवर चर्चा होऊन त्यामध्ये फॉर्म्युला ठरणार आहे. धाराशिवमधील बैठकीत एकमत न झाल्यास मंगळवारी याबाबत मुंबईतील वरिष्ठ पातळीवरून निर्णय घेतला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे आता या फॉर्म्युलाबाबत उत्सुकता लागली आहे.

सत्तास्थापनेत शिवसेना आमदार तानाजी सावंत यांची भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सावंत यांनी सुरुवातीच्या काळात भाजपसोबत सत्तास्थापन करण्यास नकार दर्शवला होता. त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवेसेनेसोबत आघाडी करण्याची तयारी दर्शवली होती. त्यामुळे महायुतीमध्ये ट्विस्ट निर्माण झाला होता. दुसरीकडे भाजपच्या भूमिकेबाबत एकनाथ शिंदे यांच्याकडे उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. मात्र, आता भाजपने महायुती म्हणून एकत्र जाण्याची तयारी दर्शवली आहे. धाराशिव झेडपीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे १५ सदस्य निवडून आले आहेत. त्यामध्ये तानाजी सावंत यांच्या गटाचे ८ तर शिवसेनेचे ७ सदस्य निवडून आले आहेत. त्यामुळे तानाजी सावंत काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT