

Maharashtra News: देशभरातील राज्यसभेच्या 37 आणि महाराष्ट्रातील 7 जागांसाठी येत्या 16 मार्चला निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आल्याचं दिसून येत आहे. यातच भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण 27 फेब्रुवारी 2026 ला तातडीनं दिल्ली दौऱ्यावर गेले होते. चव्हाणांनी अचानकपणे दिल्ली गाठण्यामागं राज्यसभेच्या जागा आणि उमेदवारांच्या निवडी या महत्त्वाची कारणं असल्याचं बोललं जात आहे. याच दिल्ली दौऱ्यादरम्यान महाराष्ट्रातील भाजपच्या राज्यसभा निवडणुकीत मोठा ट्विस्टबाबतचे संकेत समोर येत आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांकरवी महाराष्ट्र भाजपला महत्त्वाचा निरोप दिला आहे. या दौऱ्यात राज्यसभेच्या उमेदवारीवरुन विरोधकांमध्ये एकमत होत नसून आघाडीत सुरू असलेल्या दावे-प्रतिदाव्यांवरही भाष्य करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. हीच बाब हेरून भाजपचे 'चाणक्य' अमित शहांनी एकीकडे महायुतीचा सहा जागांवरील विजय निश्चित मानला जात असतानाच ऐनवेळी सातव्या जागेसाठीही उमेदवार मैदानात उतरवण्याबाबतच्या सूचना राज्य भाजपला दिल्याचं समोर येत आहे.
महाराष्ट्र भाजपच्या कोट्यातील चार जागांसाठी जवळपास 25 नेत्यांनी देव पाण्यात ठेवले आहेत. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत इच्छुकांची यादी निश्चित करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. एकंदरीत संख्याबळावरुन महाविकास आघाडीच्या वाट्याला एकमेव जागा येण्याची शक्यता आहे. पण या राज्यसभेच्या एकाच जागेवरुन विरोधकांमध्ये खटके उडताना पाहायला मिळत आहे.
विरोधी गटात राज्यातील सातव्या जागेच्या उमेदवारीवरुन सुरू असलेल्या गोंधळाचा भाजपचं केंद्रीय नेतृत्व फायदा उचलण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडूनच याबाबतच्या आदेश आल्यानं राज्यातील भाजप चांगलीच कामाला लागल्याचं समोर येत आहे. भाजप किंवा महायुतीला आपला सातवा उमेदवार निवडून आणायचा असेल, तर 20 अतिरिक्त मतांची आवश्यकता आहे. याच मतांच्या जुळवाजुळवीच्या समीकरणांसह सातवी उमेदवारी नेमकी कुणाच्या पदरात पडणार याविषयी राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
सध्यातरी विधानसभेतील एकूण संख्याबळानुसार महायुतीसाठी राज्यसभेच्या 07 जागांपैकी भाजप 04, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) 01 व शिवसेना 01 हा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे. पण राज्यसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून सातवा आणि त्यातही भाजपच्या गोटातून पाचवा उमेदवार दिला जाण्याबाबतच्या सूचना गृहमंत्री अमित शहांनी यांनीच दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे 25 जणांच्या नावांची यादी घेऊन शुक्रवारी (ता.27) अचानकपणे दिल्लीत दाखल झाले होते. राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्यासोबतच्या बैठकीनंतर अंतिम चार नावांची घोषणा दिल्लीतून 2 मार्च रोजी करण्यात येणार असल्याची माहिती रवींद्र चव्हाण यांनी दिली होती. उमेदवारीबाबतचा निर्णय भाजपची केंद्रीय समिती घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. पण अमित शहांच्या सूचनेनंतर भाजपकडून नेमकी कुणाला लॉटरी लागणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
भाजपकडून 25 जणांच्या नावांची यादी केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवण्यात आली आहे. यात नव्यानं काही धक्कादायक नावं समोर आली आहे. यात अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा, चंद्रपूरचे माजी खासदार व ओबीसी आयोगाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज अहीर आणि गडचिरोलीचे माजी खासदार अशोक नेते यांचा समावेश आहे. या तीनही इच्छुकांनी पक्षाकडे राज्यसभेसाठी विचार करावा अशी मागणी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.